मुंबई : भारतीय बाजारपेठेत 50पेक्षा जास्त वर्षांचा वारसा लाभलेला स्थानिक शीतपेयाचा कॅम्पा हा ब्रँड गुरुवारी (9 मार्च 2023) रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने (RCPL) री-लाँच केला आहे. कॅम्पा कंपनीचे मूळ युनिट रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने विकत घेतल्यानंतर काही महिन्यांतच कॅम्पाचं रीलाँचिंग झालं आहे.
कॅम्पा पोर्टफोलिओमध्ये सुरुवातीला स्पार्कलिंग बेव्हरेज कॅटेगरीत कॅम्पा कोला, कॅम्पा लेमन आणि कॅम्पा ऑरेंज या पेयांचा समावेश असेल, असं रिलायन्सच्या एफएमसीजी शाखेने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. सर्वसामान्यपणे उन्हाळ्यात शीतपेयं आणि इतर रिफ्रेशमेंट्सच्या विक्रीत वाढ होते. त्यामुळे हे उत्पादन उन्हाळ्याच्या सुरुवातीस लाँच केलं जात आहे.
`द ग्रेट इंडियन टेस्ट` असलेला कॅम्पा ब्ंढ या उन्हाळ्यात पुन्हा दाखल झाला आहे. हे सॉफ्ट ड्रिंक 200ml, 500 ml, 600 ml, 1000 ml आणि 2000ml होम पॅक अशा पाच पॅकमध्ये उपलब्ध असेल, असं `आरसीपीएल`नं सांगितलं. रिलायन्स रिटेलने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दिल्लीस्थित प्युअर ड्रिंक्स लिमिटेडकडून कॅम्पा 22 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.
1970 आणि 80 च्या दशकात हा ब्रँड प्रसिद्ध होता. बाजारपेठेतदेखील त्याचा मोठा वाटा होता. परंतु, 1990 च्या दशकात पेप्सी आणि कोका-कोला या परदेशी स्पर्धकांच्या आगमनामुळे कॅम्पा मागे पडला. आता कॅम्पा पुन्हा रोलआउट केल्यामुळे बेव्हरेजेसच्या मार्केटमध्ये पेप्सी आणि कोका-कोलाविरुद्ध आरसीपीएल असा सामना रंगू शकतो.
`आम्ही कॅम्पाला नवीन अवतारात सादर करून पिढ्यानपिढ्याच्या ग्राहकांना हा खरा आयकॉनिक ब्रँड स्वीकारण्यासाठी प्रेरित करू आणि बेव्हरेज विभागात नवीन उत्साह निर्माण करू अशी आशा आहे. कुटुंबातल्या वृ्द्ध सदस्यांकडे मूळ कॅम्पाच्या गोड आठवणी असतील, तर तरुण ग्राहकांना याची क्रिस्प रिफ्रेशिंग चव आवडेल,` असं आरसीपीएलच्या प्रवक्त्याने सांगितलं.
`झपाट्याने विकसित होत असलेल्या भारतीय बाजारपेठेने संधी निर्माण केल्याने, आम्ही कॅम्पाला रिलाँच करण्यासाठी खरोखरच उत्सुक आहोत. हे आमच्या एफएमसीजी व्यवसायाच्या विस्तारासाठी आणखी एक धाडसी पाऊल आहे,` असंही प्रवक्त्यानं सांगितलं.
`आरसीपीएल`ने गेल्या वर्षी सोस्यो हाजूरी नावाचा आणखी एक स्थानिक पेयाचा ब्रँडदेखील विकत घेतला होता. आंध्र प्रदेश आणि तेलंगणात सुरुवात करून संपूर्ण देशात कंपनीने कोल्ड बेव्हरेज पोर्टफोलिओ रोल-आउट केला आहे. कंपनीच्या विस्तृत एफएमसीजी पोर्टफोलिओमध्ये लोटस चॉकलेट, श्रीलंकेचा आघाडीचा बिस्किट ब्रँड मालिबान, तसंच इंडिपेंडन्स आणि गुड लाइफ यासह स्वतःच्या अन्य ब्रँड्सअंतर्गत रोजच्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. देशात FMCG इंडस्ट्रीचं मूल्य 110 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे. त्यात हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले, ब्रिटानिया आदी आघाडीच्या कंपन्या आहेत. त्यांच्याशी रिलायन्सची स्पर्धा असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Reliance, Social media, Top trending, Viral