• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Reliance खरेदी करणार स्टर्लिंग अँड विल्सन सोलर कंपनीचा 40 टक्के हिस्सा

Reliance खरेदी करणार स्टर्लिंग अँड विल्सन सोलर कंपनीचा 40 टक्के हिस्सा

रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड ही कंपनी स्टर्लिंग अँड विल्सन सोलर लिमिटेड (SWSL) या कंपनीत गुंतवणूक करून, त्या कंपनीचा 40 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे.

  • Share this:
मुंबई, 11 ऑक्टोबर: रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड ही कंपनी स्टर्लिंग अँड विल्सन सोलर लिमिटेड (SWSL) या कंपनीत गुंतवणूक करून, त्या कंपनीचा 40 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. रविवारी (10 ऑक्टोबर) रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड (RNESL) या कंपनीने शापूरजी पालनजी अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड (SPCPL) आणि खुर्शीद दारूवाला यांच्यासोबत या संदर्भातल्या करारावर शिक्कामोर्तब केलं. रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Insudtries Limited) मालकीची आहे. भारतीय ग्राहकांना किफायतशीर हरित ऊर्जा (Green Energy) उपलब्ध करून देण्याच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मोठ्या नियोजनाला या निर्णयामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या यंदाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी कंपनीच्या या संदर्भातल्या मेगा प्लॅनबद्दल सांगितलं होतं. गुजरातमधल्या जामनगर इथं अपारंपरिक ऊर्जानिर्मिती (Renewable Energy) करणाऱ्या चार गिगा फॅक्टरीज उभ्या करण्यासाठी येत्या तीन वर्षांत 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा अंबानी यांनी त्या सभेत केली होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाला आहे. 'हरित ऊर्जेमध्ये सर्वांत अत्याधुनिक आणि किफायतशीर तंत्रज्ञानांच्या साह्याने भारताला जागतिक पातळीवर अव्वल बनवण्यासाठी रिलायन्स कटिबद्ध आहे,' असं रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडकडून रविवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे. तसंच, 'जामनगरमध्ये चार मोठ्या गिगा फॅक्टरीज उभारण्याची रिलायन्स केलेली घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी या भागीदारीमुळे इंजिनीअरिंग क्षमता (Engineering Capabilities) वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे,' असंही रिलायन्सने त्यात म्हटलं आहे. रिलायन्स न्यू एनर्जी सोलर ही कंपनी स्टर्लिंग अँड विल्सन सोलर या कंपनीतला 40 टक्के हिस्सा खरेदी करणार, यामुळे नेमकं काय होणार? - रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्राथमिक गुंतवणूक, सेकंडरी पर्चेस आणि ओपन ऑफर अशा माध्यमांतून कंपनी स्टर्लिंग अँड विल्सन सोलर कंपनीतली 40 टक्के हिस्सेदार होणार आहे. - याअंतर्गत रिलायन्स न्यू एनर्जी सोलर कंपनीला 2.93 कोटी इक्विटी शेअर्सची (Equity Shares) प्रेफरन्शियल अलॉटमेंट (Preferential Allotment) मिळेल आणि प्रति शेअर किंमत ₹375 असेल. (हे पोस्ट प्रेफरन्शियल शेअर कॅपिटलच्या 15.46 टक्क्यांना सममूल्य असेल.) त्याशिवाय कंपनी त्याच किमतीला शापूरजी पालनजी अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेडकडून 1.84 कोटी इक्विटी शेअर्स किंवा 9.70 टक्के वाटा खरेदी करील. तसंच, कंपनी नंतर सेबीच्या नियमांनुसार, स्टर्लिंग अँड विल्सन सोलर लिमिटेड कंपनीचे 4.91 कोटी इक्विटी शेअर्स (25.9 टक्के) खरेदी करण्यासाठी ओपन ऑफर जाहीर करील. यात यशस्वी झाल्यास रिलायन्स न्यू एनर्जी सोलर कंपनी स्टर्लिंग अँड विल्सन सोलर कंपनीत 40 टक्के भागीदार होईल. - या भागीदारीमुळे जागतिक दर्जाचं टॅलेंट, इंजिनीअरिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्किल्स कंपनीला उपलब्ध होणार असून, डिजिटल टेक्नॉलॉजी, इंजिनीअरिंग आणि प्रकल्प अंमलबजावणीतल्या रिलायन्सच्या बलस्थानांना त्यामुळे ऊर्जा मिळणार आहे. - स्टर्लिंग अँड विल्सन सोलर लिमिटेड या कंपनीला इंजिनीअरिंगमधला पाच दशकांहून अधिक काळाचा अनुभव आहे. तसंच त्या कंपनीने जगभरात 11 गिगावॉटहून अधिक सौर ऊर्जानिर्मिती करणारे प्रकल्प राबवले आहेत. त्यामुळे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातली आंतरराष्ट्रीय पातळीवरची ही नावाजलेली कंपनी आहे. ही कंपनी सोलर इंजिनीअरिंग, प्रोक्युअरमेंट, कन्स्ट्रक्शन (EPC) या प्रकारची एंड टू एंड सेवा पुरवणारी आहे. प्रोजेक्ट डिझाइन आणि इंजिनीअरिंग या विषयांवर लक्ष केंद्रित करून युटिलिटी स्केल सौर ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीसाठी ती कंपनी सेवा पुरवते. - या करारामध्ये रिलायन्स कंपनीसाठी AZB आणि K Law यांनी कायदेशीर सल्लागार म्हणून, Ernst and Young यांनी अकाउंटिंग आणि टॅक्स डिलिजन्स अॅडव्हायझर म्हणून आणि Edelweiss यांनी आर्थिक सल्लागार म्हणून काम पाहिलं. स्टर्लिंग अँड विल्सन सोलर लिमिटेड आणि त्यांच्या सेलिंग शेअरहोल्डर्ससाठी DAM Capital यांनी आर्थिक सल्लागार म्हणून, तर Desai & Diwanji यांनी कायदे सल्लागार म्हणून काम पाहिलं.
First published: