मराठी बातम्या /बातम्या /मनी /RBI ची इंटिग्रेटेड लोकपाल योजना; बँका आणि अन्य संस्थांविरोधात कशी करायची तक्रार?

RBI ची इंटिग्रेटेड लोकपाल योजना; बँका आणि अन्य संस्थांविरोधात कशी करायची तक्रार?

मुंबई, 17 नोव्हेंबर : भारतीय रिझर्व्ह बँकेने अलीकडेच इंटिग्रेटेड लोकपाल योजना (Integrated Lokpal System) सुरू केली आहे. ही एक प्रकारे 'एक देश-एक लोकपाल' यंत्रणा आहे. बँका (Banks), नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनीज (NBFC) आणि पेमेंट सर्व्हिस ऑपरेटर्स (Payment Services Operators) यांच्याबद्दल ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारींचं निवारण करणारी यंत्रणा मजबूत करणं हा या यंत्रणेचा उद्देश आहे.

सर्वत्र टेक्नॉलॉजीजचे संस्थापक, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मंदार आगाशे सांगतात, 'नवनव्या पद्धतीची पेमेंट सिस्टीम आणि तंत्रज्ञान सध्याच्या काळात येत आहे. या पार्श्वभूमीवर एक देश-एक लोकपाल यंत्रणा ग्राहकांसाठी खूप महत्त्वाची भूमिका निभावेल. ग्राहक आता कोणतीही बँक आणि पेमेंट सिस्टीमच्या (Payment System) विरोधात एकाच ठिकाणी तक्रार दाखल करू शकतील, त्या तक्रारीवर काय कार्यवाही झाली, याचं ट्रॅकिंग करू शकतील आणि त्यावरचा फिडबॅकही मिळवू शकतील. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा या दोन्हींमध्ये बचत होणार आहे.'

ग्राहक या लोकपाल यंत्रणेत कशा प्रकारे तक्रार दाखल करू शकतात, याची माहिती घेऊ या.

तक्रार कुठे करायची?

बँकिंग लोकपालकडे (Banking Lokpal) तक्रार करण्याचे अनेक मार्ग आहेत. ऑनलाइन तक्रार दाखल करण्यासाठी https://cms.rbi.org.in या वेबसाइटवर जावं. तसंच, CRPC@rbi.org.in या ई-मेल आयडीवर ई-मेल पाठवून किंवा 14448 या टोल फ्री नंबरवर कॉल करूनही आपली तक्रार दाखल करता येऊ शकते. ऑफलाइन पद्धतीनेही तक्रार दाखल करता येते. भारतीय रिझर्व्ह बँकेने चंडीगडमध्ये केंद्रीकृत रिसीट अँड प्रोसेसिंग सेंटर स्थापन केलं आहे. तिथे फॉर्म पाठवून तक्रार दाखल करता येते.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या CMS वेबसाइटवर तक्रार दाखल करण्यासाठी मोबाइल नंबर ओटीपीच्या साह्याने व्हेरिफाय करावा लागतो. त्यानंतर ऑनलाइन फॉर्ममध्ये व्यक्तिगत माहिती भरावी आणि ज्या संस्थेबद्दल आपल्याला तक्रार करायची आहे त्या संस्थेचं नाव निवडावं. ज्या तारखेला तुम्ही पहिल्यांदा त्या संस्थेच्या विरोधात तक्रार दाखल केली होती, त्या तारखेसह तक्रारीचा तपशील द्यावा. त्यानंतर तक्रारीची प्रत अपलोड करावी.

तक्रार दाखल करताना कार्ड नंबर, कर्ज खाते क्रमांक, बँक खाते क्रमांक यापैकी जी माहिती देणं आवश्यक असेल, ती माहिती द्यावी. त्यानंतर तक्रारीचा प्रकार निवडावा. उदाहरणार्थ, कर्ज आणि अॅडव्हान्स अथवा मोबाइल बँकिंग, इत्यादी. ड्रॉपडाउन मेनूमधून यापैकी कोणताही एक पर्याय निवडू शकता. त्यानंतर योग्य ती सब-कॅटेगरी निवडावी. उदाहरणार्थ, तुम्ही घेतल्या गेलेल्या शुल्काबद्दलच्या तक्रारीची निवड सब-कॅटेगरी 1 मध्ये केली असेल, तर ड्रॉप डाउन मेनूमध्ये तुम्हाला तक्रारीचं कारण निवडावं लागेल. उदा. क्रेडिट कार्ड, इत्यादी. तक्रारीचा नेमका तपशीलही द्यावा. वाद किती रकमेबद्दलचा आहे आणि काही नुकसानभरपाई मागायची असल्यास ती किती आहे याचाही तपशील द्यावा. सगळं झाल्यानंतर तक्रारीची समरी अर्थात सारांश पाहावा आणि त्यानंतर ती सबमिट करावी. या दाखल केलेल्या तक्रारीची नोंद आपल्याकडे राहण्यासाठी पीडीएफ डाउनलोड करून घ्यावी आणि सेव्ह करावी.

First published:

Tags: Financial fraud, Rbi, बँक