नवी दिल्ली, 26 जानेवारी: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) देशामध्ये आपली डिजिटल करन्सी (Digital Currency) आणण्याबाबत विचार करत आहे. असे झाल्यास अनेक व्यवहारांमध्ये यामुळे बदल पाहायला मिळू शकतो. आरबीआयने म्हटले आहे की वेगाने बदलणारा पेमेंट्स उद्योग, खासगी डिजिटल टोकनची आवक आणि कागदी नोट्स किंवा नाण्यांच्या व्यवस्थापनाशी संबंधित वाढीव खर्चाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक केंद्रीय बँका डिजिटल चलन (CBDC) आणण्याचा विचार करीत आहेत. केंद्रीय बँकेच्या डिजिटल चलनाबाबतच्या शक्यतांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यासाठी आरबीआयने एक आंतर विभागीय समितीही स्थापन केली आहे.
आरबीआयने अशी माहिती दिली आहे की, अशाप्रकारचे चलन व्यापक अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे आहे आणि आपण ते स्विकारायला हवे. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेच्या फायद्यासाठी अशा चलनाला प्रोत्साहन देखील दिले पाहिजे.
(हे वाचा-ही बँक देत आहे खास सुविधा, आयुष्यभरासाठी Credit Card मोफत तर मिळतील या ऑफर्स)
काय आहे CBDC?
CBDC एक कायदेशीर चलन आहे, आणि डिजिटल स्वरूपात सेंट्रल बँकेची देयता आहे जी सार्वभौम चलनात उपलब्ध आहे. बँकेच्या बॅलन्सशीटमध्ये ही करन्सी आहे. ही करन्सी एकप्रकारे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असेल, जी आरबीआयद्वारे रोखीमध्ये रुपांतरित किंवा एक्सचेंज केली जाऊ शकते.
(हे वाचा-पूर्ण करा गाडी घेण्याचं स्वप्न, Second Hand कारवर स्वस्त कर्ज देत आहेत या बँका)
काय होणार फायदा?
डिजिटल करन्सी भारतीय चलनात आल्यास पैशांचे व्यवहार शिवाय इतर व्यवहारांच्या पद्धती बदलू शकतात. काळ्या पैशाला आळा बसेल, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आरबीआयच्या समितीच्या म्हणण्यानुसार, चलनविषय धोरणाचे अनुसरण या डिजिटल करन्सीमुळे अधिक सोपे होईल. यामध्ये डिजिटल लेसर तंत्रज्ञान (डीएलटी) वापरायला हवे. डीएलटीद्वारे परदेशातील व्यवहारांबाबत सहज माहिती मिळेल.