बिस्लेरी ही बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायातील सध्याच्या काळातील आघाडीची कंपनी आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही कंपनी वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. उत्तराधिकारी नाही म्हणून कंपनीचे मालक रमेश चौहान यांनी ही कंपनी विकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर टाटा समूहासोबतही कंपनी करार करणार असल्याचं वृत्तही आलं होतं. त्यातच, बिस्लेरी कंपनीची धुरा रमेश चौहान यांची मुलगी जयंती हिच्याकडे जाणार असल्याचीही नुकतीच चर्चा होती. मात्र, आता रमेश चौहान यांनी कंपनीची धुरा थेट सीईओ अँजेलो जॉर्ज यांच्याकडे सोपवली आहे. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबत वृत्त दिलंय.
बिस्लेरी या पॅकेज्ड वॉटर कंपनीबाबत रोज नवनवीन अपडेट्स येत आहेत. रमेश चौहान यांनी उत्तराधिकारी नसल्यानं ही कंपनी विकायचं ठरवलं असल्याचं वृत्त सर्वात प्रथम आलं होतं. त्यानंतर टाटा आणि बिस्लेरी यांच्यात कंपनीच्या अधिग्रहणाबाबत चर्चा सुरू असून टाटा 7000 कोटी रुपयांना ही कंपनी खरेदी करणार असल्याचं वृत्त आलं. परंतु बिस्लेरीची टाटा बरोबरची चर्चा निष्फळ ठरली आणि करार रद्द झाला. त्यातच, सोमवारी (20 मार्च 2023) नवीन अपडेट आलं की, रमेश चौहान यांची 42 वर्षीय मुलगी जयंती चौहान कंपनीची जबाबदारी सांभाळणार आहे. जयंतीनं बिस्लेरीच्या व्यवसायात रस घेण्यास सुरुवात केलीय, व आता ती कंपनीची जबाबदारी स्वीकारणार नाही. परंतु आता या सर्व प्रकरणात पुन्हा एकदा नवीन ट्विस्ट आलाय. कारण या कंपनीची धुरा थेट सीईओ अँजेलो जॉर्ज यांच्याकडे देण्यात आलीय.
जयंती चौहान यांनी बिस्लेरी कंपनीचा पदभार स्वीकारण्यास नकार दिला. त्यांचे आणि वडील रमेश चौहान यांच्यात मतभेद असल्याची माहिती मिळतेय. त्यानंतर अचानक रमेश चौहान यांनी बिस्लेरीची जबाबदारी कंपनीचे सीईओ अँजेलो जॉर्ज यांच्याकडे सोपवली. विशेष म्हणजे, रमेश चौहान यांना सुरुवातीपासूनच कंपनीची जबाबदारी मुलगी जयंतीकडे सोपवायची होती. पण जयंतीनं पॅकेज्ड वॉटर व्यवसायाची जबाबदारी घेण्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय.
बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, जयंतीनं बिस्लेरीची जबाबदारी घेण्यास नकार दिला. वृत्तानुसार, त्यामुळेच बिस्लेरीची कमान आता जयंती चौहान यांच्याऐवजी सीईओ अँजेलो जॉर्ज यांच्याकडे सोपवण्यात आलीय. दरम्यान, यासर्व प्रकारामुळे रमेश चौहान आणि जयंती यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आलेत. जयंतीला बिस्लेरीचा व्यवसायात रस नसल्याचं समोर आलंय. यासर्व प्रकारामुळे रमेश चौहान यांनी अचानक कंपनीची जबाबदारी सीईओ अँजेलो जॉर्ज यांच्याकडे सोपण्याचा निर्णय घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money