मुंबई, 1 जानेवारी : नवं वर्ष (new year) अगदी उंबरठ्यावर येऊन थांबलं आहे. काही दिवसातच आपण 2020 मधून 2021 मध्ये पाय ठेवणार आहोत. मात्र त्याआधी एक महत्त्वाची माहिती जाणून घ्या.
येणाऱ्या वर्षात टिव्ही (TV), वॉशिंग मशिन (washing machine) आणि फ्रिज(fridge) सारख्या काही गोष्टी महाग होण्याची शक्यता आहे. विशेषतः भारतात वेगानं लोकप्रिय होणारा एलइडी टिव्ही महाग होऊ शकतो (price hike) अशी चिन्हे आहेत.
याचं कारण शोधायचं झालं तर सांगता येईल, की या उत्पादनांच्या निर्मितीसाठी लागणारं मुख्य मटेरियल, उदा, कॉपर अर्थात तांबं, अल्युमिनियम आणि स्टीलच्या किंमती वाढणार आहेत. एका अहवालानुसार, यामुळे होम अप्लायन्सेसच्या (home appliances) किंमतीत १० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.
LG, पॅनासॉनिक (Panasonic) आणि थॉमसनसारख्या कंपन्यांचे होम अप्लायंसेस, विशेषतः टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन लोकप्रिय आहेत. या कंपन्यांनी आता स्पष्ट केलं आहे, की जानेवारीपासून या उत्पादनांचे दर वाढतील. मात्र सोनी कंपनीनं (Sony) ती आपल्या होम अप्लायन्स विभागातील उत्पादनांचे दर वाढवेल की नाही ते अजून स्पष्ट केलं नाही.
पॅनसॉनिक इंडियाचे सीइओ मनीष शर्मा यांनी म्हटलं आहे, जानेवारीपासून किंमती 6-7 टक्के वाढतील. मात्र येणाऱ्या काळात या किंमती 10-11 टक्केही वाढू शकतील. शर्मा यांनीही वाढणार असलेल्या किंमतीबाबत उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती वाढणार आहेत हेच कारण दिलं आहे.
LG बाबत बोलायचं, तर त्यांच्या होम अप्लायंसेसच्या किंमतीही १ जानेवारीपासून 7 ते 8 टक्के वाढू शकतात. एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या इंडिया हेडनं सांगितलं, की कंपनी भारतात टीव्ही, वॉशिंग मशिन, फ्रीज अशा सर्व उत्पादनांच्या किंमती 7 ते 8 टक्क्यांनी वाढवणार आहे. रॉ मटेरियलच्या महागण्याव्यतिरिक्त क्रूड ऑईलच्या किंमती हेसुद्धा एक कारण यामागे असू शकतं.
सोनी कंपनीनं अजून याबाबत स्पष्टता दिली नसली तरी येत्या काळात त्यांच्याकडूनही हे धोरण अवलंबलं जाऊ शकतं. भारतात मध्यम आकाराचे एलइडी टीवी जास्त लोकप्रिय आहेत. आणि याच टीव्हींच्या किमतीत सर्वाधिक वाढ होणार आहे. सोनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील नायर म्हणाले, की कंपनी सध्या मार्केटच्या स्थितीचं निरिक्षण करते आहे.