नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : जर तुम्ही जनधन खातं सुरू केलं असेल, आणि ते आधारशी लिंक नसेल, तर लगेचच तुमच्या आधारशी ते लिंक करून घ्या. अन्यथा 1.30 लाख रुपयांचं नुकसान होऊ शकतं. सरकारकडून सुरू करण्यात येणाऱ्या या अकाउंटमध्ये ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. हे बँक खातं झिरो बॅलेन्स बचत खातं असतं. त्याशिवाय ओव्हरड्राफ्ट आणि रूपे कार्डसह अनेक खास सुविधा मिळतात.
जनधन खात आधारशी लिंक न केल्यास, 1.30 लाख रुपयांचं नुकसान -
या खात्यात ग्राहकांना रूपे डेबिट कार्ड दिलं जातं, ज्यात 1 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळतो. पण जर तुम्ही हे खातं आधारशी लिंक केलं नसल्यास, हा फायदा तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे 1 लाख रुपयांचं नुकसान होईल. त्याशिवाय खात्यावर 30000 रुपयांचा मिळणारा ऍक्सिडेंटल डेथ इन्शोरन्स कवरही मिळणार नाही. त्यामुळे आधार कार्ड जनधन खात्याशी लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे.
कसं कराल आधार कार्ड लिंक -
बँकेत जाऊन आधार कार्ड लिंक करू शकता. यासाठी आधार कार्डची एक कॉपी, पासबुक घेऊन जावं लागेल. अनेक बँका आता मेसेजद्वारेही आधार लिंक करण्याची सुविधा देत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून मेसेज बॉक्समध्ये जाऊन UID<SPACE>आधार नंबर<SPACE>अकाउंट नंबर लिहून 567676 या क्रमांकावर पाठवू शकतात. आधार आणि बँकेत दिलेला मोबाईल नंबर वेगवेगळा असल्यास तो लिंक होणार नाही. त्याशिवाय, ग्राहक आपल्या जवळच्या एटीएममधूनही आपलं बँक अकाउंट आधारशी लिंक करू शकतात.
अशी मिळते 5000 रुपये काढण्याची सुविधा -
पंतप्रधान जन धन अकाउंटवर (PMJDY) ग्राहकांना 5000 रुपयांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते. या सुविधेचा फायदा घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. त्याशिवाय PMJDY अकाउंट आधारशी लिंक असणं गरजेचं आहे. प्रत्येक कुटुंबासाठी एक बँक अकाउंट सुरू होणं हा या योजनेमागचा उद्देश होता.
जनधन खातं सुरू करण्यासाठी -
नवीन जनधन खातं सुरू करण्यासाठी आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे. पॅन कार्ड, वोटर कार्ड, NREGA जॉब कार्डही देता येतं. नवीन खातं सुरू करण्यासाठी बँकेत जाऊन एका फॉर्म भरावा लागेल. त्यात नाव, मोबाईल नंबर, बँक ब्रांच नाव, अर्जदाराचा पत्ता, नॉमिनी, व्यवसाय, वार्षिक उत्पन्न, कुटुंबियांची संख्या, पीन कोड अशी संपूर्ण माहिती भरावी लागेल.