मुंबई, 31 डिसेंबर : प्रत्येक मनुष्य आपल्या घरासाठी, कुटुंबाला सुखात ठेवण्यासाठी कष्ट करत असतो. विशेषत: प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांना सर्व सुखसोयी देता याव्यात यासाठी धडपडत असतात. आजच्या काळात शिक्षणाचा खर्च अमाप वाढल्यानं तसंच महागाईही वाढत चालल्यानं आई-वडील आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद करत असतात. याकरता अनेक आई-वडील मुलांच्या जन्मापासूनच आर्थिक बचत, गुंतवणूक करत असतात. याकरता वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांचा उपयोग केला जातो. सर्वांत सुरक्षित आणि अधिक लाभ देणारा पर्याय म्हणून भारतीय पोस्ट खात्याकडून चालवल्या जाणाऱ्या सरकारी अल्पबचत योजनांना (Post Office Saving Schemes) मोठी पसंती दिली जाते. पोस्ट ऑफिसमधील एका योजनेत पैसे गुंतवल्यास वयाच्या पाचव्या वर्षी तुम्ही तुमच्या अपत्याला लखपती बनवू शकता.
ही योजना आहे रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आवर्तीं ठेव योजना (Recurring Deposit Scheme). अपत्याच्या जन्मापासून आई-वडिलांनी यात काही ठराविक रक्कम भरण्यास सुरुवात केली तर वयाच्या पाचव्या वर्षी पाल्य लखपती (Lakhpati) होऊ शकतो. त्यामुळे आपल्या पाल्याचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी धडपडणाऱ्या पालकांसाठी ही एक चांगली गुंतवणूक योजना आहे.
या योजनेअंतर्गत तुमच्या अपत्याच्या नावावर दरमहा 2 हजार रुपये भरावे लागतील. म्हणजेच दर दिवशी साधारण 67 रुपयांपेक्षा कमी खर्च येतो. सध्याच्या नियमांनुसार, या योजनेवर 5.8 टक्के वार्षिक व्याज उपलब्ध आहे. बचत खात्यातील रकमेवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा याचा व्याजदर (Interest rate) अधिक असून, चक्रवाढ पद्धतीनं हे व्याज मिळते. या योजनेत तुम्ही दरमहा 2 हजार याप्रमाणे पाच वर्षांत 1 लाख 20 हजार रुपये जमा केल्यास मुदत संपल्यानंतर व्याजासह सर्व रक्कम परत मिळते.
या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या योजनेतून मुदतपूर्व रक्कम काढण्याची सुविधा आहे. समजा काही अडचणीमुळे तुम्हाला अचानक या योजनेत जमा केलेल्या पैशांची गरज भासली तर तुम्ही 3 वर्षांनंतर यातील रक्कम काढू शकता. या योजनेत कर्जाची सुविधाही आहे. या योजनेत नियमितपणे एक वर्षभर पैसे भरल्यानंतर तुम्ही त्यावर कर्ज (Loan Facility available) देखील घेऊ शकता.
बाळाच्या जन्मानंतर लगेचच या योजनेत पैसे गुंतवण्यास सुरुवात केल्यास पाच वर्षांनंतर तुम्हाला एक मोठी रक्कम मिळू शकते. ही रक्कम मुलाच्या शाळेत प्रवेशाच्या वेळी कामी येऊ शकते. मराठीतल्या थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीला अनुसरूनही रिकरिंग बचत योजना आहे. थोडे थोडे पैसे बाजूला ठेवले की वेळेला मोठी रक्कम तयार होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Post office saving