नवी दिल्ली, 01 मे : तुमच्या कुटुंबातील, मित्र परिवारातील किंवा ओळखीतील कोणाचाही कोरोना (Corona)मुळे मृत्यू झाला असेल तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य 2 लाख रुपयासाठी सरकारकडे क्लेम करू शकतात. प्रधानमंत्री जीवन ज्योति बिमा योजनेच्या (PMJJBY) माध्यमातून हा क्लेम करता येतो. हा एक टर्म इन्शुरन्स (Term Insurance) असून त्याला दरवर्षी रिन्यू करावं लागतं.
या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर जर एखाद्या व्यक्तिचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये मिळतात. देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत जीवन विम्याचा लाभ पोहचवण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने 9 मे 2015 रोजी प्रधानमंत्री जीवन ज्योति बिमा योजनेची सुरुवात केली होती. यामध्ये 18 ते 50 वर्षापर्यंतच्या व्यक्तीला 2 लाखांचे इन्शुरन्स कव्हर मिळते. यासाठी वर्षाकाठी 330 रुपयांचे प्रिमिअम भरावे लागते. हा विमा कोणत्याही बँकेत खातं असणारा व्यक्ती भरू शकतो.
काय म्हणतात जाणकार?
PMJJBYमध्ये विमा काढलेल्या व्यक्तिचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्याला इन्शुरन्स कव्हर मिळतं. हे कव्हर कोरोनासाठी देखील लागू आहे. एखाद्याची हत्या झाली तरी या विम्याचा लाभ मिळतो. बँक बाजार डॉट कॉमचे सीईओ आदिल शेट्टी यांनी सांगितलं की, PMJJBY विमा काढल्याच्या 45 दिवसांच्या आत जर विमाधारकाचा मृत्यू झाला तर तो विमा ग्राह्य धरला जात नाही. मात्र,अपघाती मृत्यू झाल्यास ही अट शिथिल करण्यात येते.
वाचा: कोरोना बाधितांना मोठा दिलासा; एका तासात होणार कॅशलेस क्लेम
इन्शुरन्स क्लेम कसा करायचा?
PMJJBYही एक वार्षिक टर्म पॉलिसी आहे. यामध्ये इन्शुरन्स कव्हरसाठी 1 जून ते 31 मे असे वर्ष ग्राह्य धरले जाते. ज्या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला असेल त्यांनी 2020-21 या आर्थिक वर्षात इन्शुरन्स पॉलिसीचे प्रिमिअम भरले असणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्याचे कुटुंबीय इन्शुरन्स क्लेम करू शकत नाही.
आवश्यक कागदपत्रे
PMJJBYच्या नियमानुसार विमा धारकाचा मृत्यू झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत नॉमिनी अर्थात विम्याच्या वारसदाराला विमा क्लेम करावा लागतो. विमाधारकाचं मृत्यू प्रमाणपत्र, मृत्यूचं कारण याबद्दलची कागदपत्रे गोळा करण्यासाठी 30 दिवसांपेक्षा जास्त वेळ लागतो. मात्र, त्याची चिंता करण्याची गरज नाही. मात्र, नॉमिनीला बँकेच्या संपर्कात राहावे लागेल. इन्शुरन्स कव्हर क्लेम करताना नॉमिनीला नीट भरलेला क्लेम फॉर्म, मृत्यू प्रमाणपत्र, रुग्णालयाकडून डिस्चार्ज मिळाल्याचे बील आणि एक कॅन्सल चेक ही कागदपत्रे द्यावी लागेल. कागदपत्रे स्वीकारल्यानंतर बँक 30 दिवसांच्या आत क्लेम पूर्ण करण्यासाठी संबंधित विमा कंपनीला पाठवते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Insurance