नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर : जगभरात Coronavirus च्या साथीमुळे आर्थिक चक्रही मंदावलं आहे. भारतही त्याला अपवाद नाही. पण तरीही 'कोरोना काळातच भारताने आपली ताकद आणि आपली खरी ओळख जगाला दाखवली आहे. या साथीच्या संकटाला भारताने धीराने तोंड दिलं आणि त्यातूनच खरी ताकद जगाला दिसली, हे शक्य झालं स्थिर आर्थिक धोरणांमुळे', असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातून आलेल्या गुंतवणूकदारांना आश्वस्त केलं. पुढेही भारत याच पद्धतीने जागतिक अर्थचक्राला गती देत राहील, अशी ग्वाही मोदींनी जागतिक गुंतवणूकदार गोलमेज परिषदेत दिली. या Virtual Global Investor Roundtable ला पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली.
भारतात परकीय गुंतवणुकीचा ओघ कायम राहावा आणि त्याबरोबर भारतीय उद्योगांचाही फायदा होऊन अर्थचक्राला चालना मिळावी यासाठी ही जागतिक गुंतवणुकदारांची परिषद Virtual Global Investor Roundtable (VGIR) आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या गोलमेज परिषदेत भारतातील आघाडीचे उद्योजक सहभागी झाले आहेत. यामध्ये मुकेश अंबानी, रतन टाटा, नंदन निलेकणी, दीपक पारेख यासारख्यांचा समावेश आहे. त्याबरोबरच युरोप, अमेरिका, कॅनडा, जपान, कोरिया, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि मध्यपूर्वेतले बडे उद्योजक, गुंतवणूकदार या गोलमेज परिषदेत आहेत.
या वर्षभरात भारताने जगाला संकटाचा सामना करत असतानाच आर्थिक स्थैर्य कसं साधता येतं हे दाखवून दिलं आहे असं मोदी म्हणाले. "भारताचं आत्मनिर्भर होणं, हा फक्त एक दृष्टिकोन नसून तो पूर्वीच ठरवलेल्या आर्थिक धोरणाचा भाग आहे. आमच्या देशातल्या कुशल कामगारांची आणि आमच्या उद्योगांची क्षमता लक्षात घेऊन भारताला जगातला मोठा उत्पादक (global manufacturing powerhouse) बनवण्याची दृष्टी त्यामागे आहे", असं पंतप्रधान म्हणाले.
India has shown remarkable resilience in this pandemic, be it fighting the virus or ensuring economic stability. This resilience is driven by the strength of our systems, support of our people and stability of our policies: PM Narendra Modi at virtual Global Investor Roundtable https://t.co/9NcQ12UXcv pic.twitter.com/SW5TiwMnBo
— ANI (@ANI) November 5, 2020
भारतातले अर्थधोरण ठरवणाऱ्या प्रमुख संस्था, अर्थमंत्रालयातले अधिकारी, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री आदी मान्यवर या परिषदेला आले आहेत. जगभरातले सर्वात मोठे 20 पेन्शन सोव्हरिन वेल्थ फंड्स यामध्ये सहभागी होतील. 600 अब्ज अमेरिकन डॉलर एवढं मूल्य असलेल्या कंपन्यांचे प्रतिनिधी या परिषदेत असतील. VGIR 2020 मधून गुंतवणुकदारांशी थेट संवाद साधण्याचा उद्देश आहे. भारतातले आघाडीचे उद्योजकही यात सहभागी होणार असल्याने भविष्यातल्या जागतिक व्यापारवृद्धीसाठी या परिषदेचा उपयोग होईल. यात सहभागी होणाऱ्या काही देशांमधले गुंतवणूकदार प्रथमच भारतात व्यापाराच्या उद्देशाने येत आहेत. पूर्व आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या खंडातल्या बहुतेक सर्व मोठ्या अर्थव्यवस्था असलेले देश आणि तिथले उद्योजक आणि गुंतवणूकदार यामध्ये सहभागी होणार आहेत.
भारतीय अर्थव्यवस्था आणि गुंतवणूकीच्या दृष्टीने या परिषदेचं महत्त्व मोठं आहे. या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या पाच महिन्यात आतापर्यंतची सर्वाधिक परकीय गुंतवणूक भारतात झाली आहे. आता अर्थचक्राला आणखी चालना देण्यासाठी या गुंतवणूक परिषदेचा VGIR 2020 उपयोग करून घेण्याचा देशातल्या अर्थधोरणाचा उद्देश आहे.