पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली होणार जागतिक गुंतवणुकदारांची परिषद; अंबानी, टाटा, निलेकणी होणार सहभागी

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली होणार जागतिक गुंतवणुकदारांची परिषद; अंबानी, टाटा, निलेकणी होणार सहभागी

युरोप, अमेरिका, कॅनडा, जपान, कोरिया, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि मध्यपूर्वेतले बडे उद्योजक, गुंतवणूकदार या गोलमेज परिषदेत (VGIR 2020) असतील. त्याबरोबरच मुकेश अंबानी, रतन टाटा, नंदन निलेकणी, दीपक पारेख यासारखे भारतातील आघाडीचे उद्योजकही यात सामील होणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर : भारतात परकीय गुंतवणुकीचा ओघ कायम राहावा आणि त्याबरोबर भारतीय उद्योगांचाही फायदा होऊन अर्थचक्राला चालना मिळावी यासाठी एक जागतिक गुंतवणुकदारांची परिषद Virtual Global Investor Roundtable (VGIR) आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या गोलमेज परिषदेत भारतातील आघाडीचे उद्योजक सहभागी होणार आहेत. त्याबरोबरच युरोप, अमेरिका, कॅनडा, जपान, कोरिया, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि मध्यपूर्वेतले बडे उद्योजक, गुंतवणूकदार या गोलमेज परिषदेत असतील. 5 नोव्हेंबरला ही परिषद व्हर्च्युअल पद्धतीने होणार आहे.

भारतातले अर्थधोरण ठरवणाऱ्या प्रमुख संस्था, अर्थमंत्रालयातले अधिकारी, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री आदी मान्यवर या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

जगभरातले सर्वात मोठे 20 पेन्शन सोव्हरिन वेल्थ फंड्स यामध्ये सहभागी होतील. 600 अब्ज अमेरिकन डॉलर एवढं मूल्य असलेल्या कंपन्यांचे प्रतिनिधी या परिषदेत असतील. VGIR 2020 मधून गुंतवणुकदारांशी थेट संवाद साधण्याचा उद्देश आहे. भारतातले आघाडीचे उद्योजकही यात सहभागी होणार असल्याने भविष्यातल्या जागतिक व्यापारवृद्धीसाठी या परिषदेचा उपयोग होईल. यात सहभागी होणाऱ्या काही देशांमधले गुंतवणूकदार प्रथमच भारतात व्यापाराच्या उद्देशाने येत आहेत. पूर्व आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या खंडातल्या बहुतेक सर्व मोठ्या अर्थव्यवस्था असलेले देश आणि तिथले उद्योजक आणि गुंतवणूकदार यामध्ये सहभागी होणार आहेत.

भारतीय अर्थव्यवस्था आणि गुंतवणूकीच्या दृष्टीने या परिषदेचं महत्त्व मोठं आहे. या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या पाच महिन्यात आतापर्यंतची सर्वाधिक परकीय गुंतवणूक भारतात झाली आहे. आता अर्थचक्राला आणखी चालना देण्यासाठी या गुंतवणूक परिषदेचा VGIR 2020 उपयोग करून घेण्याचा देशातल्या अर्थधोरणाचा उद्देश आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: November 3, 2020, 7:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading