नवी दिल्ली, 8 एप्रिल: पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेचा आठवा हप्ता लवकरच थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या योजनेत पात्र होण्यासाठी तुम्ही देखील अर्ज केला असेल तर आपल्या खात्यात 2000 रुपये मिळतील की नाही ते त्वरित तपासा. केंद्र सरकारच्या या योजने अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांचा निधी दिला जातो. 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांत दर चार महिन्यांनी ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातात.
पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेशी संबंधित 11 कोटी 74 लाख लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात आठव्या हप्त्याचे पैसे लवकरच जमा करण्यात येणार आहेत.
कोणाला मिळणार लाभ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर शेत जमीन असणे आवश्यक आहे. जर एखादा शेतकरी शेती करत असेल परंतु शेती त्याच्या नावावर नसून त्याच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावावर असेल तर ती व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. दहा हजार रुपयांहून अधिक पेन्शन मिळवणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी, विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार / मंत्री / महापौर यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. याशिवाय नोंदणीकृत डॉक्टर, अभियंता, वकील, सनदी लेखापाल आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही याचा लाभ मिळणार नाही.
हे पण वाचा: मोदी सरकारचा मोठा निर्णय! 4 लाख रोजगारांची निर्मिती करणाऱ्या योजनेला मंजुरी
तुमचं स्टेटस कसं तपासाल?
प्रधानमंत्री किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आपण आपलं स्टेटस तपासू शकता. आपल्याला आतापर्यंत किती हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत तसेच पुढील हप्त्याची स्थिती काय आहे? जर एखादा हप्ता रोखण्यात आला आहे तर त्यामागचं कारण काय आहे? जर तुम्हाला वाटतं की माहितीमध्ये गडबड आहे तर तुम्ही त्यात सुधारणा सुद्धा करु शकता.
सर्वप्रथम प्रधानमंत्री किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
तेथे उजव्या बाजूला 'Farmers Corner'चा पर्याय दिसेल.
त्यासोबतच 'Beneficiary Status'या पर्यायावर क्लिक करा.
मग नवीन पेज ओपन होईल.
नवीन पेजवर आधार कार्ड क्रमांक, बँक अकाऊंट नंबर किंवा मोबाइल नंबर यापैकी एक पर्याय निवडा.
या तीन क्रमांकाच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात पैसे येतात की नाही हे तपासू शकता.
तुम्ही जो पर्याय निवडला आहे त्या ठिकाणी योग्य तो क्रमांक भरा.
त्यानंतर 'Get Data' या पर्यायावर क्लिक करा.
मग तुम्हाला सर्व व्यवहारांची संपूर्ण माहिती मिळेल.
म्हणजेच कुठल्या बँक खात्यात पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत.
हे पण वाचा: Gold Price Today: सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर आज पुन्हा उतरला सोन्याचा भाव, चांदीही झाली स्वस्त
8वा हप्ता कधीपर्यंत मिळेल?
या योजनेचा पहिला हप्ता हा दरवर्षी 1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीत मिळतो. दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत मिळतो. मोदी सरकारने 24 फेब्रुवारी 2019 रोजी या योजनेची सुरुवात केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Modi government, PM Kisan, PM narendra modi, Scheme