नवी दिल्ली, 21 जानेवारी: सध्याच्या काळात मोबाइलवरून यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) सिस्टीमद्वारे वेगवेगळ्या अॅप्सच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्याचे प्रमाण वाढले आहे. रोख रकमेचे व्यवहार कमी करण्यासाठी भारतातही केंद्र सरकारनं या डिजिटल व्यवस्थेला प्रोत्साहन दिले असून, अनेक कंपन्यांची अॅप्स त्यासाठी उपलब्ध आहेत. या अॅप्सच्या साहाय्याने अगदी सहजपणे आर्थिक व्यवहार केले जात आहेत. या यूपीआय अॅप्समध्ये डिसेंबर महिन्यात फोनपेने (Phone Pe) गुगल पे या महत्त्वाच्या अॅपला (Google Pay) मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. या महिन्यात फोन पेवरून 1.82 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत, तर गुगल पे वरून 1.76 लाख कोटींचे व्यवहार झाले आहेत. फोन पे वरून 902.03 दशलक्ष व्यवहार झाले आहेत, तर गुगल पेवरून झालेल्या व्यवहारांची संख्या 854.49 इतकी आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) ही माहिती दिली आहे.
भारतातील यूपीआय क्षेत्रात ही दोन पेमेंट अॅप्स सर्वाधिक चालतात. डिसेंबरमध्ये पेमेंट अॅप्सच्या माध्यमातून झालेल्या एकूण व्यवहारांच्या संख्येच्या पातळीवर 78 टक्के (नोव्हेंबरमध्ये हे प्रमाण 82 टक्के होते) व्यवहार या दोन अॅप्सवरून झाले, तर मूल्याच्या बाबतीत डिसेंबरमध्ये या दोन पेमेंट अॅप्सवरून झालेल्या व्यवहाराचे मूल्य 86 टक्के (नोव्हेंबरमध्येही हेच प्रमाण) होते.
(हे वाचा-Petrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर)
ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये गूगल पे आघाडीवर होते. गुगल पे वरून या दोन महिन्यांमध्ये अनुक्रमे 857.81 दशलक्ष आणि 960.02 दशलक्ष व्यवहार झाले. डिसेंबरमध्ये मात्र त्याच्यावरील व्यवहारांच्या संख्येत मासिक तुलनेत 11 टक्के घट झाली. त्यामुळे गुगल पेची पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरण झाली. या दोन महिन्यांत फोन पेवरून अनुक्रमे 839.88 दशलक्ष आणि 868.4 दशलक्ष व्यवहार झाले.
या पेमेंट अॅप्सच्या यादीत पेटीएमने (Paytm) तिसऱ्या स्थानावर असून, डिसेंबरमध्ये पेटीएमवरून 31 हजार 291.83 कोटी रुपयांचे 256.36 दशलक्ष व्यवहार झाले. या क्षेत्रात नव्यानेच प्रवेश केलेल्या व्हॉट्सअॅपने (Whatsapp) 29.72 कोटी रुपयांचे 81 लाख व्यवहार केले.
अॅमेझॉन पेने (Amazon Pay) 3 हजार 508 कोटी रुपयांचे 40.53 दशलक्ष व्यवहार केले, तर एनपीसीआयच्या भीम अॅपने (BHIM App) 24.8 दशलक्ष व्यवहारांच्या माध्यमातून 7 हजार 748.29 कोटी रुपयांचे व्यवहार केले आहे.
(हे वाचा-PNB खातेधारकांसाठी मोठी बातमी!1 फेब्रुवारीपासून या ATMमधून नाही काढता येणार पैसे
एकूणच यूपीआयने डिसेंबरमध्ये तब्बल 2.23 अब्ज व्यवहारांच्या माध्यमातून 4.16 लाख कोटींचे विक्रमी व्यवहार झाले आहेत. सलग तीन महिन्यात यूपीआय अॅप्सवरून झालेल्या व्यवहारांची संख्या 2 अब्जांच्या पुढे राहिली आहे. ऑक्टोबरमध्ये 2 अब्ज आणि नोव्हेंबरमध्ये 2.21 अब्ज व्यवहार झाले आहेत. यूपीआयशी संबंधित बँकांची(Banks) संख्याही डिसेंबरमध्ये 207 झाली आहे. नोव्हेंबरमध्ये ही संख्या 200, तर ऑक्टोबरमध्ये 189 इतकी होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.