'पेट्रोलची किंमत 40 रुपये लीटर करावी', भाजपा नेत्यानेच मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या
गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध शहरात पेट्रोलचे दर प्रति लीटर 90 रुपयांपेक्षा जास्त आहेत. सोमवारी तेल कंपन्यांनी पेट्रोलचे दर प्रति लीटल 30 पैसे तर डिझेलचे दर 26 पैसे प्रति लीटरने वाढवले होते.
नवी दिल्ली, 08 डिसेंबर: देशात पेट्रोल-डिझेलचे भाव (Petrol-Diesel Price Today in India) गगनाला भिडले आहेत. आज जरी देशामध्ये इंधनाचे भाव वाढले नसले तरी गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध शहरात पेट्रोलचे दर प्रति लीटर 90 रुपयांपेक्षा जास्त आहेत. सोमवारी तेल कंपन्यांनी पेट्रोलचे दर प्रति लीटल 30 पैसे तर डिझेलचे दर 26 पैसे प्रति लीटरने वाढवले होते. रविवावी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी अशी माहिती दिली होती की, अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका आणि काही देशातील अंतर्गत समस्येमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. राज्यातही परभरणीमध्ये पेट्रोलचे दर सर्वाधिक स्तरावर होते, याठिकाणी दर 92.14 रुपये प्रति लीटर झाले होते.
नागरिकांकडून वाढत्या इंधनाच्या दरामुळे रोष व्यक्त केला जात आहेच, पण त्याचबरोबर आता भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी देखील पेट्रोलचे दर 40 रुपये प्रति लीटर असावेत अशी मागणी केली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, 'पेट्रोलचे दर 90 रुपये प्रति लीटर असणं हे देशातील लोकांची पिळवणूक आहे. पेट्रोलची एक्स-रिफायनरी किंमत 30 रुपये प्रति लीटर आहे. सर्व कर आणि पेट्रोल पंप कमिशन मिळून ही किंमत 60 रुपयांनी वाढते आहे. माझ्या मते पेट्रोल 40 रुपये प्रति लीटरने विकले जावे.
Petrol price at Rs. 90 per litre is a monumental exploitation by GoI of the people of India. The price ex-refinery of petrol is Rs. 30/litre. All kinds of taxes and Petrol pump commission add up the remainder Rs.60. In my view petrol must sell at max. Rs. 40 per litre.
सुब्रमण्यम स्वामींनी असे गणित मांडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सोशल मीडियावर यामध्ये अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी त्यांनाच इंधनाच्या किंमतीचं गणित समजावून सांगितलं आहे.
रविवारी धर्मेंद्र प्रधान यांनी असा अंदाज वर्तवला आहे की, पेट्रोलियम निर्यातक देशांचे संघटन असणाऱ्या Organization of the Petroleum Exporting Countries ने अलीकडेच कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर इंधनाचे दर स्थीर होतील. त्यांनी असं म्हटलं आहे की, 'ओपेकने दोन दिवस आधीच असा निर्णय घेतला आहे की ते कच्च्या तेलाचं उत्पादन दररोज पाच लाख बॅरलने वाढवणार आहेत. याचा आपल्याला फायदा मिळेल आणि आमचा अंदाज असा आहे की दर स्थीर होतील. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढतात तेव्हा इथे (भारतात) देखील (इंधनाचे) दर वाढतात.'