नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे (Crude Oil Price) देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर विक्रमी (Petrol Diesel Price Hike) पातळीवर पोहोचले आहेत. देशातल्या अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पुढे पोहोचले आहेत. पेट्रोल-डिझेलची गेल्या काही दिवसांत सातत्याने भाववाढ होत असल्यामुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. एकीकडे भारतात सातत्याने पेट्रोलच्या किंमती वाढत असताना जगात काही देशांमध्ये पेट्रोलच्या किमती त्या वेगाने वाढत नाहीयेत किंवा काही देशांत त्या कमीही होताहेत.
भारतात एखाद-दुसरं शहर वगळता जवळपास सर्वच शहरांमध्ये पेट्रोलच्या एक लीटरच्या (Petrol Diesel Price Hike in India) भावाने शंभरी पार केली आहे. पेट्रोल जवळपास दररोज 35 पैशांनी (35 paise per day) महाग होत आहे. 4 ऑक्टोबर 2021 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत पेट्रोलच्या दरात सरासरी 8 रुपयांनी वाढ झाली आहे. हे जाणून आश्चर्य वाटेल, की जगात सर्वांत स्वस्त पेट्रोल विकणाऱ्या टॉप-10 देशांमध्ये या काळात पेट्रोलच्या किंमतीमध्ये केवळ 3 ते 40 पैशांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात (Crude Oil Price in international market) कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्या तरी भारताच्या शेजारी असणाऱ्या श्रीलंका आणि नेपाळसारख्या गरीब देशांत पेट्रोल महाग होण्याऐवजी स्वस्त झालं आहे.
हे वाचा-सामान्यांसाठी खूशखबर! दिवाळीआधी स्वस्त झालं खाद्यतेल, मुख्य कंपन्यांनी घटवले दर
ग्लोबल पेट्रोल प्राइस डॉट कॉमने पेट्रोलच्या दरांबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार पाकिस्तानमध्ये एक लीटर पेट्रोलची किंमत 25 ऑक्टोबरला फक्त 59.27 रुपये होती. 21 दिवसांपूर्वी म्हणजेच 4 ऑक्टोबर रोजी येथे पेट्रोलची किंमत 55.61 रुपये प्रति लीटर होती. म्हणजेच 3 आठवड्यांत केवळ 4 रुपये 64 पैसे किंमत वाढली आहे. श्रीलंकेत 4 ऑक्टोबरला पेट्रोलची किंमत 68.62 रुपये होती आणि 25 ऑक्टोबरला ती 68.35 रुपये प्रति लीटर झाली आहे. म्हणजेच इथे पेट्रोल महाग होण्याऐवजी 27 पैशांनी स्वस्त झालं. भूतानसारख्या गरीब देशात 4 ऑक्टोबर रोजी पेट्रोलचा दर 77 रुपये प्रति लीटर होता. 25 ऑक्टोबर रोजी येथे पेट्रोल 81.54 रुपये प्रति लीटरवर पोहोचलं. म्हणजे 21 दिवसांत भूतानमध्ये पेट्रोल 4.54 रुपयांनी महागलं आहे. नेपाळबद्दल विचार केल्यास 4 ऑक्टोबरला एक लीटर पेट्रोलची किंमत 81.51 रुपये होती आणि 25 ऑक्टोबरला ती 81.28 रुपये झाली. म्हणजेच इथेही पेट्रोल स्वस्त झालं.
भारताचा विचार केल्यास ग्लोबल पेट्रोल प्राइस डॉट कॉमवरील आकडेवारीनुसार 4 ऑक्टोबर 2021 रोजी भारतात पेट्रोलची सरासरी किंमत 100 रुपयांच्या जवळ होती, जी 25 ऑक्टोबरपर्यंत 108.42 रुपये प्रति लीटर झाली. म्हणजेच 21 दिवसांत सरासरी 8 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
हे वाचा-Nykaa IPO allotment: तुमच्या खात्यात शेअर्स आले की पैसे? अशाप्रकारे तपासा
येथे आहे सर्वांत स्वस्त पेट्रोल (दर 25 ऑक्टोबरचे)
>> व्हेनेझुएला देशात 4 ऑक्टोबर रोजी एक लिटर पेट्रोलचा दर 1.49 रुपये होता. 25 ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या दरानुसार, सध्या येथे किमतीमध्ये कोणतीही वाढ नाही.
>> जगातल्या सर्वांत स्वस्त पेट्रोलच्या बाबतीत इराणचं नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे 4 ऑक्टोबरला एक लीटर पेट्रोल 4.46 रुपयांना मिळत होतं; मात्र आता 25 ऑक्टोबरला ते 3 पैशांनी वाढलं असून, त्याची किंमत 4.49 रुपये झाली आहे.
>> अंगोलामध्ये 4 ऑक्टोबर रोजी एक लीटर पेट्रोलची किंमत केवळ 17.20 रुपये होती. परंतु 25 ऑक्टोबर रोजी ती सुमारे 3 रुपयांनी वाढून 20.10 रुपये झाली.
>> अल्जेरियामध्ये एक लीटर पेट्रोल 25.04 रुपये प्रति लिटर होते. 21 दिवसांत ते 7 पैशांनी महागलं असून, 25.11 रुपयांवर पोहोचलं.
>> सर्वांत स्वस्त पेट्रोल विकणाऱ्या देशांमध्ये कुवेतचं नाव पाचव्या क्रमांकावर आहे. येथे 4 ऑक्टोबर रोजी एक लीटर पेट्रोलची किंमत 25.97 रुपये होती. 21 दिवसांत ती 26.13 रुपये झाली. म्हणजेच तीन आठवड्यांत केवळ 16 पैशांची वाढ झाली आहे.
>> नायजेरिया सहाव्या क्रमांकावर आहे. येथे 4 ऑक्टोबर रोजी एक लीटर पेट्रोलची किंमत 29.93 रुपये होती. ती 25 ऑक्टोबर रोजी 30.14 रुपयांवर पोहोचली.
>> पेट्रोल स्वस्त असलेल्या देशांमध्ये तुर्कमेनिस्तानचं नाव सातव्या क्रमांकावर आहे. येथे 4 ऑक्टोबर रोजी एक लीटरची किंमत 32.01 रुपये होती. येथे 21 दिवसांत पेट्रोलच्या दरात केवळ 10 पैशांनी वाढ झाली आहे.
>> या यादीत कझाकस्तान आठव्या क्रमांकावर आहे. येथे एक लीटर पेट्रोलची किंमत 34.20 रुपये आहे.
>> इथिओपिया नवव्या क्रमांकावर आहे. येथे पेट्रोलचा दर 4 ऑक्टोबरला 34.70 रुपये प्रति लीटर होता, जो 25 ऑक्टोबरला 34.40 रुपयांवर गेला आहे.
हे वाचा-दिवाळीच्या आधी सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज 3000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं
>> मलेशिया 10व्या स्थानावर आहे. 4 ऑक्टोबरला येथे पेट्रोलचा दर 36.62 रुपये प्रतिलीटर होता. 25 ऑक्टोबरला मलेशियामध्ये पेट्रोलची किंमत 37.04 रुपये प्रति लीटर झाली आहे. हा देश सध्या 11 व्या क्रमांकावर आहे. येथे 21 दिवसांत पेट्रोल केवळ 42 पैशांनी वाढले.
भारतामध्ये पेट्रोल-डिझेलची भाववाढ होण्यामागे दोन मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे कच्चे तेल आणि दुसरं म्हणजे आकारला जाणारा टॅक्स. भारतात केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे पेट्रोल आणि डिझेलवर टॅक्स आकारला जातो. व्हॅट आणि उत्पादन शुल्कासह, टॅक्स 60 टक्क्यांहून अधिक आहे. याशिवाय, पाकिस्तान आणि बांगलादेशसह बहुतेकशा दक्षिण आशियाई देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर 45 ते 60 टक्के टॅक्स आहे. त्यामुळे काही दिवसांपासून येथील किमती सातत्याने वाढल्या आहेत. दुसरीकडे, एसबीआयने त्यांच्या अहवालात सरकारने इंधनावर लावण्यात येणाऱ्या टॅक्सचा आढावा घेण्याचा सल्ला दिला आहे. टॅक्समध्ये कपात केली गेली नाही आणि दुसरीकडे तेलाच्या किमती वाढल्यास ग्राहकांना आणखी पेट्रोल दरवाढीला सामोरे जावे लागू शकते.
पेट्रोल-डिझेलची सातत्याने भाववाढ होत असल्याने देशातले सर्वसामान्य नागरिक वैतागले आहेत. या भाववाढीचे राजकीय पडसादसुद्धा उमटत आहेत. पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेत, यासाठी आंदोलनंही करण्यात येत आहेत; मात्र पेट्रोलचे भाव कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचं चित्र आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol and diesel prices continued to rise