आजच फुल करा गाडीची टाकी, पेट्रोल आणि डिझेल महागण्याची शक्यता

आजच फुल करा गाडीची टाकी, पेट्रोल आणि डिझेल महागण्याची शक्यता

पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढल्याचा आपल्याला चांगलाच फटका बसू शकतो. इंधनांच्या किंमती वाढल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीचा काटा आणखी वर जाण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 7 डिसेंबर : महागाईच्या झळा वाढत चालल्या आहेत. कांद्याच्या किंमती कमी होण्याची चिन्हं नाहीत. त्यातच आता आणखी एक बातमी आलीय. पाम ऑइलच्या किंमती वाढल्याने खाद्यतेल महाग होऊ शकतं. आता कच्च्या तेलाचं उत्पादन करणाऱ्या तेलउत्पादक देशांच्या समूहाने म्हणजेच ओपेक ने तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

OPEC च्या सदस्यांच्या बैठकीत प्रतिदिन 5 लाख बॅरल कच्च्या तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्याने ओपेकने हा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्याने या महागाईचा दुहेरी फटका बसू शकतो.

पेट्रोल-डिझेल महागणार

केडिया कमोडिटीचे संचालक अजय केडिया यांच्या मते,ओपेकच्या या निर्णयानंतर कच्च्या तेलाचे दर 4 डॉलर प्रतिबॅरल एवढे वाढले आणि डॉलरच्या तुलनेत रुपयात चढउतार झाले तर भारतात पेट्रोल- डिझेलच्या किंमतींवर त्याचा परिणाम होऊ शकतो. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 रुपयांची वाढ होऊ शकते.

(हेही वाचा : खूशखबर! मोदी सरकार इनकम टॅक्समध्ये करणार कपात, अर्थमंत्र्यांचे संकेत)

अमेरिका उत्पादन वाढवणार

ओपेक देशांनी तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता अमेरिकेने तेलाचं उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 2020 मध्ये हे उत्पादन वाढेल, असं अमेरिकेने जाहीर केलं. या स्थितीत कच्च्या तेलाच्या दरावर फार काही परिणाम होणार नाही.

ही सगळी स्थिती पाहता आपल्याला मात्र पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढल्याचा फटका बसू शकतो. इंधनाच्या किंमती वाढल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीचा काटा आणखी वर जाण्याची शक्यता आहे. महागाईच्या या दिवसांत सामान्यांच्या खिशाला चाट पडतेय. त्यामुळे घरातलं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.

=======================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2019 05:09 PM IST

ताज्या बातम्या