नवी दिल्ली, 4 एप्रिल : आजारपण, अपघात किंवा घरातील कर्ती व्यक्ती नसेल त्याचं निधन झालं असेल, अशा परिस्थितीत विमा
(Insurance) खूप मदतीचा ठरतो. विम्याच्या मदतीने आपल्याला कमी पैशांत मोठी आर्थिक सुरक्षा मिळते. झपाट्याने बदलणाऱ्या काळात विमा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. अनेक प्रकरणांमध्ये, विमा संरक्षण घेणं कायद्याने आवश्यक आहे. याशिवाय, आर्थिक संकटाच्या वेळी तुम्ही तुमच्या विमा कंपनीकडून कर्जही
(Loan) घेऊ शकता.
तुम्ही कोणत्याही कंपनीकडून लाईफ इन्शुरन्स घेतला असेल, तर तुम्ही त्यावर वैयक्तिक कर्जही घेऊ शकता. भारतीय आयुर्विमा महामंडळ
(Life Insurance Corporation-LIC) आपल्या ग्राहकांना पॉलिसीवर वैयक्तिक कर्जाची सुविधा देतं. विशेष बाब म्हणजे विमा पॉलिसीवर घेतलेल्या वैयक्तिक कर्जाचं व्याज बँकेच्या तुलनेत कमी असतं.
बँका किंवा इतर वित्तीय संस्था
(Financial Company) तुमच्या पॉलिसीचा प्रकार आणि त्यातून मिळालेल्या रकमेवर आधारित कर्ज देतात. बहुतेक बँका विमा पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर मिळणाऱ्या रकमेच्या 80 ते 90 टक्के रकमेवर कर्ज देतात.
एलआयसी पॉलिसीच्या आधारे लोन -
ज्या लोन किंवा कर्जाबाबत सांगतोय ते फक्त विद्यमान एलआयसी पॉलिसीधारकांसाठी उपलब्ध आहे. कर्जाचा व्याजदर विमाधारकाच्या प्रोफाईलवर अवलंबून असतो. कर्जाची रक्कम LIC पॉलिसीच्या सरेंडर व्हॅल्यूवर
(Surrender Value) अवलंबून असते. साधारणपणे कर्जाची रक्कम पॉलिसी व्हॅल्यूच्या 90% पर्यंत असते. पेड-अप पॉलिसीमधील कर्जाची रक्कम पॉलिसी व्हॅल्यूच्या 85% पर्यंत असते.
लोनच्या बदल्यात LIC विमा पॉलिसी गहाण ठेवते. जर अर्जदाराने त्याच्या कर्जाची परतफेड केली नाही तर, विमा कंपनी ठराविक कालावधीसाठी पॉलिसी थांबवू शकते. जर थकित कर्जाची रक्कम पॉलिसीच्या सरेंडर व्हॅल्यूपेक्षा जास्त असेल तर, एलआयसी पॉलिसी समाप्त करण्याचा अधिकार राखून ठेवते. कर्जाची परतफेड करण्यापूर्वी विमा पॉलिसी मॅच्युअर झाल्यास, पॉलिसीच्या रकमेतून कर्जाची रक्कम वजा करण्याचा अधिकार एलआयसीकडे आहे.
LIC च्या टर्म प्लॅनवर लोन मिळत नाही, कारण त्यांच्याकडे हमी असलेली सरेंडर व्हॅल्यू नाही. तुम्ही जीवन प्रगती, जीवन लाभ, सिंगल-प्रिमियम एंडोमेंट प्लॅन, न्यू एंडॉवमेंट प्लॅन, न्यू जीवन आनंद, जीवन रक्षक, लिमिटेड प्रीमियम एंडोमेंट प्लॅन आणि जीवन लक्ष्य यांच्यावर पर्सनल लोन घेऊ शकता.
जर तुम्ही कोणत्याही बँकेकडून विम्यासाठी कर्ज घेऊन परतफेड केली नाही तर तुमची विमा पॉलिसी रद्द होईल. अशा परिस्थितीत, विमाधारकाला कर्जावरील व्याजाव्यतिरिक्त प्रीमियम भरावा लागेल. बँक कर्ज विमा कंपनीच्या विम्याच्या सरेंडर व्हॅल्यूतून वसूल केले जाऊ शकते.
कर्जासाठी अर्ज कसा करायचा?
तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन एलआयसी पॉलिसीवर कर्जासाठी अर्ज करू शकता. तुम्हाला जवळच्या एलआयसी कार्यालयात जावं लागेल आणि तेथे केवायसी कागदपत्रांसह कर्जासाठी अर्ज करावा लागेल. विमा पॉलिसीची मूळ कागदपत्रं फॉर्मसोबत सादर करावी लागतात.
तर, अशाप्रकारे बँकेपेक्षा कमी व्याजदराने LIC पॉलिसीवर लोन घेता येतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.