मुंबई: घर, कार खरेदी किंवा अन्य कोणत्याही गोष्टीसाठी लोन अर्थात कर्ज घेणं ही सध्याच्या काळात अगदी सर्वसामान्य गोष्ट आहे. कोणत्याही गोष्टीसाठी कर्ज घेण्यापूर्वी संबंधित व्यक्तीने काटेकोर आर्थिक नियोजन करणं गरजेचं असतं. आज अनेक बॅंका आणि वित्तीय संस्था विविध गोष्टींसाठी कर्जपुरवठा करतात.
प्रत्येक बॅंक किंवा संस्थेचा कर्जासाठीचा व्याजदर वेगवेगळा असतो. त्याचप्रमाणे कर्ज प्रक्रियादेखील वेगवेगळी असते; पण तुम्हाला बॅंका किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज अगदी सहजपणे मिळवायचं असेल तर त्यासाठी तुमचा सिबिल स्कोअर अर्थात क्रेडिट स्कोअर चांगला असावा लागतो. एक छोटी चूकदेखील तुमच्या सिबिल स्कोअरवर परिणाम करू शकते आणि स्कोअर कमी होऊ शकतो.
अशा वेळी सिबिल स्कोअर सुधारणं गरजेचं आहे. हा स्कोअर सुधारण्यासाठी कर्जाची परतफेड वेळेवर करणं आणि आर्थिक देवाणघेवाण काटेकोर ठेवणं आवश्यक आहे. याशिवाय सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्यात. या गोष्टी कोणत्या आहेत, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.
Home loan: कोणत्या बँकेनं किती वाढवले व्याजदर, पाहा PHOTO
कर्ज सहजपणे मिळवण्यासाठी क्रेडिट स्कोअर अर्थात सिबिल स्कोअर चांगला असणं गरजेचं असतं. काही कारणांमुळे तुमचा सिबिल स्कोअर कमी असेल तर तो सुधारण्यासाठी काही गोष्टी तातडीने कराव्यात.
सर्वसामान्यपणे क्रेडिट लिमिट कमी ठेवण्याकडे कर्जदारांचा कल असतो; पण ते जास्त ठेवावं, असा सल्ला बॅंका देतात. यात योग्य निवड म्हणून क्रेडिट लिमिट जास्त ठेवलं पाहिजे. कारण त्यामुळे खर्चाचं व्यवस्थापन करणं सोपं जातं.
कर्ज घेताना दीर्घ कालावधी निवडल्यास, यामुळे ईएमआय कमी होतो आणि कर्ज परतफेड करणं सोपं जातं. अशा परिस्थितीत तुम्ही डिफॉल्टर होण्याची शक्यता कमी होते. तसंच पेमेंट वेळेवर केल्याने क्रेडिट स्कोअरदेखील चांगला राहतो. सिबिल स्कोअर खराब होण्याचं सर्वांत मोठं कारण म्हणजे कर्जाचा ईएमआय भरण्यास उशीर होणं.
गोल्डने वर्षभराचा मोडला रेकॉर्ड, लग्नासाठी खरेदी करणार असाल तर लगेच चेक करा दर
त्यामुळे क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी वेळेवर ईएमआय भरावा. कर्जाची परतफेड केली असेल आणि ते तुमच्या वतीने बंद केलं गेलं असलं, तरीही प्रशासकीय त्रुटींमुळे कर्ज अॅक्टिव्ह दिसत असेल तर या गोष्टीचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो. त्यामुळे ते पूर्ण बंद झालंय याची खात्री करा.
तुम्ही जॉइंट अकाउंट होल्डर असाल किंवा कर्जासाठी जामीनदार असाल तर अशा गोष्टी टाळा. कारण दुसरा पक्ष कोणत्याही कारणामुळे डिफॉल्टर झाला तर त्याचा थेट परिणाम तुमच्या सिबिल स्कोअरवर होतो. गरजेनुसार एका वेळी एकच कर्ज घ्या आणि ते वेळेवर भरा.
एकापेक्षा जास्त कर्जं घेतली तर ईएमआय भरण्यास विलंब किंवा अडचण येण्याची शक्यता असते. या गोष्टीचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होतो. एकच कर्ज असेल आणि त्याची परतफेड वेळेवर केली जात असेल तर सिबिल स्कोअर सुधारतो.
तुमचा सिबिल स्कोअर सुधारायचा असेल तर तुमच्या क्रेडिट कार्डची देय रक्कम मुदतीपूर्वी भरा. त्याचप्रमाणे क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी नियोजन करा. या गोष्टी केल्यास तुमचा सिबिल स्कोअर सुधारेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Credit card, Money