मुंबई, 30 सप्टेंबर- महागाई वाढत असताना सर्वसामान्य माणूस सध्या मेटाकुटीला आलाय. जीवनावश्यक गरजांसाठी आर्थिक तरतूद करताना तारेवरची कसरत करावी लागतेय. त्यातच काही बचत होत नसल्यानं अनेकांना याची चिंता भेडसावत आहे. नुकताच भारतात सेवानिवृती निर्देशांकासंबंधी अभ्यास करण्यात आला. या वेळी केलेल्या सर्वेक्षणात 50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 86 टक्के नागरिकांनी निवृत्तीच्या आधी गुंतवणूक सुरू केलेली नसल्यानं त्यांना याची सल बोचत आहे असं दिसून आलंय ‘आज तक हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलय.भारतीय रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या दरापेक्षा देशातील महागाईचा दर अधिक प्रमाणात वाढल्याचं सध्याचं चित्र आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट बिघडलंय.देशात इंडिया रिटायरमेंट इंडेक्स स्टडीअंतर्गत सर्वेक्षण करण्यात आलंय. यात अनेक महत्त्वपूर्ण बाबी समोर आल्या आहेत. यात वृद्धापकाळासाठी बचत होत नसल्यानं अनेकांच्या चिंतेत भर पडली आहे. एकीकडे महागाई वाढत असताना बचत अधिकाधिक व्हावी म्हणूनही विचार केला जातोय. निवृत्तीनंतरचं आयुष्य जगण्यासाठी आवश्यक तेवढी बचत होत नसल्यानं लोकांची काळजी वाढल्याचं सर्वेक्षणात समोर आलं आहे.
बचत 10 वर्षातच संपणार तर नाही, याची अनेकांना भीती
‘आज तक’शी संबंधित वेबसाईट बिझनेस टुडेमध्ये मॅक्स लाइफ सर्वेक्षणचा अहवाल जाहीर झाला. यात निवृत्तीच्या नंतरचे नियोजन म्हणजेच रिटायरमेंट प्लॅनिंगच्या अनुषंगाने केली जात असलेली बचत 10 वर्षांतच संपून जाईल, असं भारतातल्या 59 टक्के लोकांना वाटतंय. तर इंडिया रिटायरमेंट इंडेक्स स्टडी म्हणजेच आयआरआयएसच्या दुसऱ्या आवृत्तीनुसार, आर्थिक अनिश्चततेच्या वातावरणामुळे बचत तसंच रिटायरमेंट प्लॅनिंग करणं 29 टक्के लोक गरजेचं मानत आहेत. याआधी हा आकडा 18 टक्क्यांवर होता.
(हे वाचा:सातत्याने घसरण सुरू असताना मार्केटमध्ये रिटायरमेंट फंड कसा तयार करायचा? )
रिटायरमेंटसंबंधी गुंतवणुकीत हा आहे खोडा
निरोगी, स्थिर आणि निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आयुष्य जगणाऱ्या नागरिकांची भारतातील नेमकी स्थिती काय आहे, याचा आढावा या सर्वेक्षणात घेतला गेलाय. अहवालात भारताचा रिटायरमेंट इंडेक्स 44 होता. सध्या निवृत्त होताना आपलं कुटुंब, मित्र आणि समाजाचा आधार असावा असं त्यांना वाटायचं प्रमाण वाढलं आहे. रिटायरमेंटसंबंधी गुंतवणुकीशी संबंधित योजनांमध्ये याचाच मोठा खोडा असल्याचं दिसतं.
28 शहरांतील 3220 जणांचा सहभाग
मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनीने मार्केटिंग डाटा आणि अॅनॅलिटिक्स कंपनी KANTAR सोबत हे सर्वेक्षण केलं आहे. निवृत्तीनंतरची आर्थिक व्यवस्था लावण्याच्या दृष्टिने नागरिक आता काय विचार करत आहेत किंवा प्रयत्न करत आहेत हे या सर्वेक्षणातून जाणून घेण्यात आलं. डिजिटल अभ्यासाद्वारे 28 शहरांत राहणाऱ्या 3,220 लोकांनी सर्वेक्षणात सहभाग नोंदवला. या शहरांमध्ये 6 मेट्रो, 12 टियर 1 आणि 10 टियर 2 शहरांचा समावेश होता.
(हे वाचा:Good News : स्मॉल सेविंग स्कीमसाठी केंद्र सरकारने वाढवले व्याजदर )
लोकांना या बाबींची वाटते खंत
सर्वेक्षणातील महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतले तर काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी गुंतवणूक सुरू केली नसल्याची खंत 50 वर्षं वय असलेल्या 86 टक्के नागरिकांना आहे. तर 59 टक्के सहभागी नागरिकांच्या मते, निवृत्तीच्या काळात आरोग्य हा सर्वात महत्त्वाचा घटक वाटतो. तर केवळ 34 टक्के जण आर्थिक बाबींना महत्त्व देत असल्याचं अहवालात म्हटलं गेलंय.
2031 पर्यंत इतकी असेल ज्येष्ठांची संख्या
मॅक्स लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ प्रशांत त्रिपाठी म्हणाले, ‘वय वाढत जातं तसं आरोग्याशी निगडित गोष्टींमध्ये बदल होत जातो. 2031 पर्यंत देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या 41 टक्क्यांनी वाढून 19 कोटी 40 लाख होण्याचा अंदाज आहे. निवृत्तीनंतर आरोग्य आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र जीवन जगण्यासाठी लोकांनी कमी वयातच निवृत्तीची योजना बनवण्याच्या दृष्टीनं विचार करायला हवा.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pension, Rbi latest news