मुंबई, 25 नोव्हेंबर- शासकीय नोकरीतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनातर्फे निवृत्तिवेतन (Pension) दिलं जातं. आपलं पेन्शन नियमित सुरू राहावं, यासाठी दर वर्षी पेन्शनधारकांना आपण हयात असल्याचा दाखला (Life Certificate) बँकेमध्ये जमा करावा लागतो. पेन्शनधारकांसाठी (Pensioners) एक महत्त्वाची बातमी आहे. हयातीचा दाखल जमा करण्यासाठी आता फक्त 5 दिवसांची मुदत शिल्लक आहे. येत्या 30 नोव्हेंबरपूर्वी हयातीचा दाखला जमा करावा लागणार आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत हा दाखला सादर केला नाही, तर तुमचं पेन्शन बंद होईल. तुम्ही अद्याप तुमचा हयातीचा दाखला जमा केलेला नसेल, तर पुढील 5 पद्धतींपैकी कोणतीही एक पद्धत वापरून तुम्ही तो बँकेत जमा करू शकता.
1. जीवन प्रमाण पोर्टलवर जमा करू शकता दाखला
तुम्ही तुमचं लाइफ सर्टिफिकेट म्हणजेच हयातीचा दाखला जमा करण्यासाठी ऑनलाइन यंत्रणेचा आधार घेऊ शकता. https://jeevanpramaan.gov.in/ या वेबसाइटवर हा दाखला सादर करता येतो. यासाठी जीवन प्रमाण हे अॅपही डाउनलोड करावं लागेल. अशा पद्धतीनं दाखला जमा करण्यासाठी तुमच्याकडे व्हेरिफाइड UIDAI फिंगरप्रिंट डिव्हाइस असणं गरजेचं आहे. या अॅपवर नमूद केलेल्या सूचनांचा वापर करून तुम्ही हयातीचा दाखला जमा करू शकता.
2. घरपोच मिळणारी बँकिंग सुविधा
सध्या एकूण 12 बँका पेन्शनधारकांना घरपोच सेवा (Doorstep Service) देत आहेत. बँक अधिकाऱ्याला फोन करून घरी बोलावून तुम्ही तुमचा हयातीचा दाखल देऊ शकता. एसबीआय, पीएनबी, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या बँका आपल्या पेन्शनधारक ग्राहकांना घरपोच सेवा देतात.
3. पोस्टाच्या माध्यमातून जमा करू शकता लाइफ सर्टिफिकेट
पोस्ट विभागानं, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने, डिजिटल लाइफ सर्टिफिकेट जमा करण्यासाठी डोअरस्टेप सर्व्हिस सुरू केली आहे. नोव्हेंबर 2020पासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेच्या मदतीनं तुम्ही पोस्टमनला घरी बोलावून लाइफ सर्टिफिकेट सादर करू शकता.
4. प्रत्यक्ष बँकेत जाऊन
बँकेच्या ज्या शाखेमध्ये तुमचं पेन्शन जमा होतं, त्या शाखेत जाऊन तुम्ही लाइफ सर्टिफिकेट जमा करू शकता. स्वत: जाऊन सर्टिफिकेट जमा केल्यामुळे तुम्हाला कुठलंही शुल्क भरावं लागणार नाही. याच कामासाठी तुम्ही बँकेच्या डोअरस्टेप सर्व्हिचा वापर केला तर मात्र शुल्क भरावं लागेल.
5 पेन्शन ऑफिसमध्ये जमा करा लाइफ सर्टिफिकेट
तुम्ही थेट सेंट्रल पेन्शन ऑफिसमध्येदेखील (Central Pension Office) लाइफ सर्टिफिकेट जमा करू शकता.
वरील विविध पर्यायांपैकी जमेल त्या कोणत्याही पर्यायाचा वापर करून तुम्ही तुमचं लाइफ सर्टिफिकेट म्हणजे हयातीचा दाखला जमा करू शकता. पेन्शन सेवा सुरळीतपणे सुरू राहावी, यासाठी ही गोष्ट अतिशय गरजेची आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Pension scheme