Home /News /money /

Omicron च्या वाढत्या धोक्यामुळे सरकारचा मोठा निर्णय, या तारखेपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद!

Omicron च्या वाढत्या धोक्यामुळे सरकारचा मोठा निर्णय, या तारखेपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद!

जगभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) व्हॅरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन भारताने आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर (International Flights) घातलेले निर्बंध आणखी वाढवण्यात आले आहेत.

नवी दिल्ली, 19 जानेवारी: जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) व्हॅरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन भारतानं आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर (International Flights) घातलेले निर्बंध आणखी वाढवले आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (Director General of Civil Aviation) एका परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. कोविड-19 च्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानवाहतुकीवरची बंदी आता 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत कायम राहणार असल्याचं या परिपत्रकात म्हटलं आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ही बंदी पुन्हा वाढवण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर तो निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय मालवाहक विमान (International Cargo Flights) सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही. 'डीजीसीए'नं मंजूर केलेल्या फ्लाइट्सनादेखील हा निर्णय लागू नसेल. यासोबतच 'एअर बबल'अंतर्गत (Air Bubble) असलेल्या विमानवाहतुकीवर बंदी घालण्यात येणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. यापूर्वी 'डीजीसीए'ने 31 जानेवारी 2022 पर्यंत आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. हे वाचा-तुम्हालाही खरेदी करायची आहे नवीकोरी कार? या बँका स्वस्तात देतायंत Car Loan मार्च 2020 पासून बंद आहे विमान वाहतूक कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर 23 मार्च 2020 पासून भारतातून होणारी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद आहे. तथापि, जुलै 2020 पासून सुमारे 28 देशांसोबत झालेल्या एअर बबल करारांतर्गत विशेष आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू आहे. कोरोना पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत या नियमांचं काटेकोर पालन करावं लागेल, असं सरकारचं म्हणणं आहे. 20,000 कोटींचं नुकसान शक्य कोरोनाची तिसरी लाट (Third Wave) आणि विमान इंधनाच्या (Fuel) दरात झपाट्यानं होत असलेल्या वाढीमुळे चालू आर्थिक वर्षात विमान कंपन्यांचा तोटा 20,000 कोटी रुपयांपर्यंत वाढू शकतो. 'क्रिसिल'च्या म्हणण्यानुसार, या आर्थिक वर्षात विमान कंपन्यांची वाटचाल 20,000 कोटी रुपयांच्या म्हणजेच आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या निव्वळ तोट्याकडे (Loss) होत आहे. गेल्या आर्थिक वर्षातल्या 13,853 कोटी रुपयांच्या तुलनेत हा तोटा 44 टक्क्यांनी अधिक आहे. किमान 2022-23 पर्यंत तरी विमान कंपन्या यातून सावरू शकत नाहीत, असा इशारा देशांतर्गत विमान वाहतुकीत 75 टक्के वाटा असणाऱ्या इंडिगो, स्पाइसजेट आणि एअर इंडिया या कंपन्यांवर आधारित अहवालात देण्यात आला आहे. हे वाचा-Income Tax Return: करदात्यांना आता ऑनलाइनच भरावा लागेल ITR- CBDT देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय देशात गेल्या 24 तासांत 2,82,970 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. या कालावधीत कोरोनामुळे 441 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हॅरिएंटचे (Omicron Variant) 8961 रुग्ण देशात आढळले आहेत. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट (Positivity Rate) 15.13 टक्के आहे. अॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patients) संख्या वाढून 18,31,000 वर पोहोचली आहे. ही संख्या गेल्या 232 दिवसांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
First published:

Tags: Airplane, Domestic flight, Travel by flight

पुढील बातम्या