दिल्ली, 27 मार्च : यंदाच्या (2023) अर्थसंकल्पानंतर जुन्या आणि नवीन कर प्रणालींमधील निवडीबाबत करदात्यांमध्ये बराच गोंधळ निर्माण झाला आहे. सरकारनं 2023 च्या अर्थसंकल्पात नवीन कर प्रणालीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी विविध बदल सादर केले आहेत. या बदलांवरून असं निदर्शनास येतं की, करदात्यांनी नवीन कर प्रणालीकडे वळावं आणि जुनी प्रणाली काढून टाकावी हा सरकारचा यामागे हेतू आहे. मात्र, सध्या नवीन कर प्रणाली डीफॉल्ट कर प्रणाली असली तरी जुनी कर व्यवस्था कायम राहणार आहे. अशा स्थितीमध्ये नोकरदारांसाठी कोणती कर प्रणाली चांगली आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पूर्वी दोन्ही कर प्रणाली समजून घेणं गरजेचं आहे.
नवीन कर प्रणाली
क्लिअर टॅक्सनं दिलेल्या वृत्तानुसार, 2023 च्या अर्थसंकल्पात एक नवीन कर प्रणाली लागू करण्यात आली ज्यामध्ये टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात आला आणि करदात्यांना सवलतीच्या टॅक्स रेटची ऑफर देण्यात आली. जे करदाते हे नवीन नियम निवडतील ते HRA, LTA, 80C, 80D सारख्या अनेक सवलती आणि कपातीचा दावा करू शकत नाहीत.
RBI Meeting : एप्रिल महिन्यात पुन्हा वाढणार EMI आणि कर्ज, RBI च्या निर्णयाकडे लक्ष
जुनी कर प्रणाली
नवीन कर प्रणाली लागू होण्यापूर्वी जुनी प्रणाली प्रचलित आहे. या नियमांतर्गत, HRA आणि LTA सह 70 हून अधिक सुटींचे आणि कपातींचे पर्याय करदात्यांसाठी उपलब्ध आहेत. ज्यामुळे करदात्यांचं करपात्र उत्पन्न कमी होऊ शकतं आणि टॅक्सही कमी होऊ शकतो. या सवलतींपैकी 80C ही सर्वात लोकप्रिय सवलत आहे.
जुन्या व नव्या करप्रणालीपैकी कोणती चांगली आहे?
स्क्रिप्ट बॉक्स डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार नवीन आणि जुन्या दोन्ही आयकर स्लॅबचे फायदे आणि तोटे आहेत. हे सर्व तुम्हाला नवीन कर स्लॅब अंतर्गत डिडक्शन आणि सवलतींचा दावा करायचा आहे की नाही यावर अवलंबून आहे. जुन्या कर स्लॅबअंतर्गत कपात आणि सूट मिळण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही टॅक्स भरण्यापूर्वी, दोन्ही कर प्रणालींचं तुलनात्मक मूल्यांकन केलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला ठरवता येईल की, तुमच्यासाठी नवी की जुनी करप्रणाली फायद्याची आहे. पूर्वीच्या कर प्रणालींतर्गत पीपीएफ, ईएलएसएस आणि मेडिक्लेम यांसारख्या विविध प्रकारचे डिडक्शन आणि सुटींचे पर्याय उपलब्ध असल्यामुळे, करदात्याकडे गुंतवणुकीचे बरेच पर्याय होते. नवीन कर प्रणाली असे नवीन गुंतवणूकदार आणि व्यक्तींसाठी तयार केली गेली आहे ज्यांनी नुकतीच त्यांच्या करिअरची सुरुवात केली आहे. त्यामुळे ज्या नोकरदारांना जास्त वर्षांचा अनुभव आहे, त्यांच्यासाठी नवीन कर प्रणाली फारशी फायद्याची ठरणार नाही असं तज्ज्ञांचं मत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Income tax