Mutual Funds इंडस्ट्रीवरही कोरोनाचं सावट; SIP गुंतवणुकीत चार हजार कोटी रुपयांची घट

Mutual Funds इंडस्ट्रीवरही कोरोनाचं सावट; SIP गुंतवणुकीत चार हजार कोटी रुपयांची घट

2020-21 या आर्थिक वर्षात म्युच्युअल फंडात सिस्टमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (Systematic Investment Plan) केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीत चार टक्क्यांनी घट झाली. या वर्षात 96 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक एसआयपीद्वारे (SIP) करण्यात आली.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 एप्रिल : कोविड-19 महामारीमुळे (Covid 19 Pandemic) प्रत्येक क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. म्युच्युअल फंड क्षेत्रही (Mutual Fund Sector) त्याला अपवाद नाही. 2020-21 या आर्थिक वर्षात म्युच्युअल फंडात सिस्टमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (Systematic Investment Plan) केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीत चार टक्क्यांनी घट झाली. या वर्षात 96 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक एसआयपीद्वारे (SIP) करण्यात आली.

मार्च 2021 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात एसआयपीद्वारे 96 हजार 80कोटी रुपये गुंतवण्यातआल्याचं स्पष्ट झालं. त्या आधीच्या म्हणजेच 2019-20 या आर्थिक वर्षात एक लाख 84 कोटी रुपये या माध्यमातून गुंतवले गेले होते. म्हणजेच 2020-21 या आर्थिक वर्षात यात चार टक्क्यांनी घट झाली. 2020-21 या आर्थिक वर्षात एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलं जाण्याचं प्रमाण मासिक आठ हजार कोटी रुपये एवढं होतं. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (Association of Mutual Funds in India) यांच्यातर्फे ही आकडेवारी उपलब्ध झाली आहे.

वास्तविक गेल्या काही वर्षांपासून म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये एसआयपीचं योगदान सातत्याने वाढत होतं. 2016-17 मध्ये एसआयपीद्वारे 43,921 कोटी रुपये गुंतवले गेले होते. 2017-18 मध्ये 67,190 कोटी रुपये, तर 2018-19 मध्ये 92,693 कोटी रुपये एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवले गेले होते. 2019-20 मध्ये हा आकडा एक लाख कोटी रुपयांहून अधिक होता. मात्र 2020-21 मध्ये कोरोना महामारीच्या काळात लॉकडाउन (Lockdown) लागू करावा लागल्यामुळे सर्वच क्षेत्रांवर आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी एसआयपीच्या गुंतवणुकीत चार हजार कोटी रुपयांनी घट झाली.

(वाचा - Ration Card: रेशन कार्डमध्ये असं जोडा नवीन सदस्याचं नाव; जाणून घ्या सोपी पद्धत)

'फायर्स'मध्ये संशोधन विभागाचे प्रमुख असलेले गोपाल कवाली रेड्डी यांनी सांगितलं, की आगामी काळात कोरोना प्रतिबंधक लशीची सफलता, अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न आदी कारणांचा प्रभाव एसआयपीद्वारे गुंतवणुकीवर दिसून येऊ शकेल. जीएसटी कलेक्शन, वाहनं आणि घरांची विक्री आदी अर्थव्यवस्थेचे सकारात्मक संकेत आहेत. औद्योगिक उत्पादन निर्देशांक (Index of Industrial Production),तसंच महागाईचा दर (Inflation Rate) आदींचा परिणाम चालू आर्थिक वर्षातल्या आर्थिक प्रगतीवर दिसू शकतो, असंही त्यांनी सांगितलं.

(वाचा - फक्त 156 रुपयांत कोरोनावर उपचार; या योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंतचा खर्च मिळणार)

नजीकच्या भूतकाळातल्या काही वर्षांत छोट्या बचत योजना, एफडी आणि बचत खात्यांचे व्याज दरही घटत आहेत. कोरोना काळात तर त्यात आणखी घट झाली. त्या तुलनेत म्युच्युअल फंडातून मिळणारा परतावा जास्त आहे. म्युच्युअल फंडातल्या गुंतवणुकीत जोखीम असली, तरी एसआयपीमध्ये ती जोखीम काही प्रमाणात कमी होऊ शकते. तसंच,अनेक अर्थविषयक संस्थांनी अॅपद्वारेही एसआयपी किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची सोय उपलब्ध केल्यामुळे अगदी झटक्यात गुंतवणूक करता येते आणि झटक्यात ती काढूनही घेता येऊ शकते. त्यामुळे गुंतवणुकीसाठी या पर्यायाचा वापर गेल्या काही वर्षांत वाढला आहे. गेल्या वर्षी आर्थिक स्थितीवर परिणाम झाल्याने गुंतवणूक घटली असली, तरी सध्याचे अन्य योजनांचे व्याजदर पाहता लोकांकडून एसआयपीद्वारे गुंतवणुकीचा पर्याय स्वीकारण्याचं प्रमाण पुन्हा वाढू शकतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

First published: April 16, 2021, 1:19 PM IST
Tags: money

ताज्या बातम्या