Home /News /money /

Gold Jewelry Update: मेकिंग चार्जमुळे सोनं 10% महागलं; या पद्धतीचा वापर केला तर मिळेल स्वस्त

Gold Jewelry Update: मेकिंग चार्जमुळे सोनं 10% महागलं; या पद्धतीचा वापर केला तर मिळेल स्वस्त

देशातल्या अनेक शहरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मेकिंग चार्ज वाढवण्यात येत आहे. काही ठिकाणी हा दर प्रति ग्राम 500 ते 1500 रुपये वाढवला आहे, तर कुठे 10 ते 15 टक्के घेतला जात आहे.

    नवी दिल्ली, 2 डिसेंबर : केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग (Gold Hallmarking) करणं देशभरातल्या ज्वेलर्सना (Jewelers) बंधनकारक केलं आहे. सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये, म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत हॉलमार्किंग नसलेल्या दागिन्यांची विक्री करणाऱ्या ज्वेलर्सचा नफा कमी होत आहे. म्हणून ज्वेलर्सनी घडणावळ (making charges) वाढवून भरपाई करण्यास सुरुवात केली आहे. हॉलमार्क म्हणजे कोणत्याही दागिन्यांची शुद्धता पारखल्यानंतर लावण्यात येणारे बीआयएस (BIS) लोगो. यावरून सोन्याची शुद्धता लक्षात येते. ग्राहकांना नकली माल विकला जाऊ नये यासाठी हॉलमार्किंग महत्त्वाचं आहे. देशातल्या अनेक शहरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मेकिंग चार्ज वाढवण्यात येत आहे. काही ठिकाणी हा दर प्रति ग्राम 500 ते 1500 रुपये वाढवला आहे, तर कुठे 10 ते 15 टक्के घेतला जात आहे. यापूर्वी भोपाळमध्ये मेकिंग चार्जेस हे 10 टक्क्यांपर्यंत असायचे; मात्र आता ते 13 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. तसंच मुंबईतही ज्वेलर्स लेबर चार्जच्या नावाखाली नफा कमवत आहेत. सोनेखरेदीसाठी गेलेल्या दोन ग्राहकांचा अनुभव दिल्लीमध्ये वास्तव्याला असलेल्या अमरजितसिंह यांना आपल्या जवळच्या नातेवाईकाला सोन्याची अंगठी भेट द्यायची होती. यासाठी ते घराजवळच्या चांदनी ज्वेलर्समध्ये पोहोचले. या वेळी 22 कॅरेट सोन्याच्या खरेदीसाठी बाजारभावानुसार त्यांना 22300 रुपये किंमत सांगण्यात आली. यात 2700 रुपये मेकिंग चार्ज होता. हे महाग वाटत असल्याने अमरजित यांनी ब्रँडेड ज्वेलरी दुकान गाठलं. त्या वेळी त्यांना त्याच वजनाची अंगठी 21,400 रुपयांना मिळाली. ब्रँडेड ज्वेलरी शॉपमध्ये मेकिंग चार्ज 1200 रुपये लावण्यात आला होता. त्यामुळे त्यांना तिथे अंगठी कमी किमतीमध्ये मिळाली. याशिवाय, मध्य प्रदेशातले रहिवासी स्नेहा दुबे (नाव बदलले आहे) यांनी घरी लग्न असल्याने नेहमीच्या सुखदेव ज्वेलर्समधून दागिने खरेदी केले. नेहमी तेथूनच खरेदी करत असल्याने त्यांना सुखदेव ज्वेलर्सवर संपूर्ण विश्वास होता. दागिन्यांमध्ये अडीच ग्रॅमची अंगठी होती. या अंगठीवर 17 टक्के मेकिंग चार्ज लावण्यात आल्याचं बिल पाहिल्यानंतर स्नेहा दुबे यांच्या लक्षात आले. यावर त्यांनी ज्वेलर्सकडे विचारणा केली, तेव्हा मेकिंग चार्ज वाढवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. हे ही वाचा-ओमिक्रॉनच्या भीतीनं सोन्याच्या दरात घसरण, विक्रमी उच्चांकाहून 8 हजारांनी स्वस्त दागिने घडवण्यासाठी लागणाऱ्या वेळेनुसार मेकिंग चार्ज ठरवला जातो, असं ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे अध्यक्ष आशिष पेठे यांनी सांगितलं. मेकिंग किंवा लेबर चार्जेस किती आकारायचे हे ज्वेलर्सवर अवलंबून आहे. यासाठी कोणताही नियम नसल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे (IBJA) राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी सांगितलं, की हॉलमार्किंगमुळे कॅरेटनुसार सोन्याची किंमत निश्चित झाली आहे. त्यामुळे ज्वेलर्सचा नफा मार्जिन हे केवळ मेकिंग चार्जेसवर अवलंबून आहे. शिवाय, मेकिंग चार्जेसमध्ये वेगवेगळे घटक असतात. त्यामुळे काही डिझाइन्सवर तो 15 ते 20 किंवा 25 टक्क्यांपर्यंत वाढतो. 'काही ज्वेलर्स पहिल्यापासूनच हॉलमार्किंग करत आले असतील, तर त्यांच्या लेबर चार्जेसमध्ये कोणताही फरक पडलेला दिसून येणार नाही. एखाद्या व्यक्तीने आता मेकिंग चार्जेस वाढवले असतील, तर याचा स्पष्ट अर्थ होतो, की यापूर्वी संबंधित ज्वेलर्स कमी दर्जाच्या दागिन्यांची विकी करत होता,' असं मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन म्हणाले. भोपाळ सराफा फेडरेशनचे सरचिटणीस नवनीत अग्रवाल म्हणाले, की 'हॉलमार्किंगमुळे आता सगळीकडे सारखंच सोनं असणार आहे. त्यामुळे नफा कमी झाला आहे. पूर्वी सरासरी मेकिंग चार्ज 10 टक्क्यांपर्यंत होता. तो आता 13 टक्के झाला आहे.' मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे (Mumbai Jewelers Association) उपाध्यक्ष कुमार जैन म्हणाले, की हॉलमार्किंगमुळे तुम्ही आता कोणत्याही ज्वेलर्सकडून दागिने खरेदी करू शकता. तुमच्या आवडी;x डिझाईन तुमच्या विश्वासू दुकानात उपलब्ध नसेल, तर इतर ज्वेलरी शॉपमधूनही तुम्ही ते खरेदी करू शकता; मात्र ज्वेलरी खरेदी करताना मेकिंग चार्ज किती लावला जात आहे, हे माहिती करून घ्या.

    First published:

    Tags: Gold, Gold and silver

    पुढील बातम्या