कोविड मृत्यू नंतर क्लेमसाठी आवश्यक कागदपत्रांच्या अटी LICने केल्या शिथिल

कोविड मृत्यू नंतर क्लेमसाठी आवश्यक कागदपत्रांच्या अटी LICने केल्या शिथिल

इतर मृत्यू प्रकरणांमध्ये मात्र नगरपालिकेचा मृत्यूचा दाखला आवश्यक असेल, असंही एलआयसीनं नमूद केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 मे: सध्या देशात पसरलेल्या कोरोना विषाणू साथीची (Corona Virus Pandemic) तीव्रता अधिक असल्यानं परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. रुग्णसंख्येचे प्रमाण अधिक असून, मृतांची संख्याही वाढती आहे. अशा परिस्थितीत मृतांच्या कुटुंबियांना विमा रक्कम (Insurance Claim) तातडीनं मिळावी, विमा दावे लवकरात लवकर निकाली निघावेत यासाठी एलआयसी (LIC) अर्थात आयुर्विमा महामंडळानं ही प्रक्रिया सुलभ आणि त्रासमुक्त करण्यासाठीअनेक नियम शिथिल केले आहेत. त्यामुळं आता विमा दावे त्वरेनं मिळण्यास मदत झाली आहे.

यापूर्वी दावे निकाली काढण्यासाठी महापालिकेनं दिलेला मृत्यूचा दाखला सादर करणं अनिवार्य होतं. आता कोविड साथीच्या काळात कोविडमुळे मृत्यू झाला असल्यास त्या व्यक्तीच्या विमा दाव्यासाठी एलआयसीनं अन्य पुराव्यांना परवानगी दिली आहे. आता सरकारी, ईएसआय, लष्करी किंवा खासगी रुग्णालयानं जारी केलेलं मृत्यूची तारीख आणि वेळ याचा स्पष्ट उल्लेख असलेलं प्रमाणपत्र एलआयसीच्या क्लास वनअधिकारी किंवा 10 वर्षे डेव्हलपमेंट ऑफिसर असलेल्याअधिकाऱ्याच्या स्वाक्षरीसह सादर केल्यास ते ग्राह्य धरलं जाणार आहे. यासह, अंत्यसंस्कार प्रमाणपत्र किंवा संबंधित प्राधिकरणाद्वारे दिलेली रिसीट असणं आवश्यक आहे, असं एलआयसीनं स्पष्ट केलं आहे. इतर मृत्यू प्रकरणांमध्ये मात्र नगरपालिकेचा मृत्यूचा दाखला आवश्यक असेल, असंही एलआयसीनं नमूद केलं आहे.

वाचा: रत्नागिरीतील लोटे MIDCमध्ये कोरोनाचा उद्रेक; एकाच कंपनीतील 40 कर्मचाऱ्यांना Corona

अ‍ॅन्युइटीसाठी, 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत हयातीच्या दाखल्यास (Life Certificates) मुभा देण्यात आली असून, इतर प्रकरणांमध्ये ईमेलद्वारे हयातीचा दाखला पाठवल्यास मान्य करण्यात येणार असल्याचं एलआयसीनं म्हटलं आहे.

दावा प्रक्रिया जलद गतीनं पूर्ण होण्यासाठी आता एलआयसीचे ग्राहक जवळच्या शाखेमध्ये जाऊन कागदपत्रं सादर करु शकतात. पॉलिसीधारकांना विमा दाव्यांसाठीची कागदपत्रे सेवा शाखेच्या कार्यालयात जाऊन सादर करण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी, जवळपासच्या कोणत्याही एलआयसी कार्यालयात कागदपत्रं सादर करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचंही एलआयसीनं स्पष्ट केलं आहे. तसंच एलआयसीनं ग्राहकांना कस्टमर पोर्टलच्या (Customer Portal) सहाय्यानं ऑनलाइन एनईएफटी रेकॉर्ड (Online NEFT Record) तयार करून ते सबमिट करण्याची सुविधाही उपलब्ध केली आहे. जेणेकरून ग्राहकांचे विम्याचे पैसे जलदगतीनं त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील.

विमा पॉलिसी खरेदी करणे, प्रीमियम भरणे, कर्जासाठी अर्ज करणे, कर्ज आणि कर्जावरील व्याजाची परतफेड करणे, एनईएफटी नोंदणी, पॅनकार्डचा तपशील अद्ययावत करणे अशा अनेक सुविधाही ऑनलाइन उपलब्ध असून, त्यासाठी ग्राहक www.licindia वर लॉग इन करू शकतात.

15 एप्रिल 2021 रोजी केंद्र सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एलआयसीला दर शनिवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून, 10 मेपासून हा नियम लागू करण्यात आला आहे. आता एलआयसीची सर्व कार्यालये सोमवार ते शुक्रवार सकाळी दहा ते संध्याकाळी 5.30 या वेळेत कार्यरत असतील.

First published: May 11, 2021, 11:09 PM IST

ताज्या बातम्या