आणखी एक बँक संकटात; खातेदारांना काढता येणार नाही 25 हजारांपेक्षा अधिक रक्कम

आणखी एक बँक संकटात; खातेदारांना काढता येणार नाही 25 हजारांपेक्षा अधिक रक्कम

खासगी क्षेत्रातली मोठी बँक असणाऱ्या लक्ष्मी विलास बँकेवर (laxmi vilas bank) आर्थिक संकट ओढवल्याने सरकारने निर्बंध (moratorium) लादले आहेत.

  • Share this:

मुंबई, 17 नोव्हेंबर : आणखी एक बँक आर्थिक संकटात सापडली आहे. रिझर्व बँकेने केंद्र सरकारशी केलेल्या सल्ला मसलतीनंतर लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध (laxmi vilas bank under moratorium) आणले आहेत. आता खातेदार बँकेतून 25 हजारांपेक्षा अधिक रक्कम काढू शकणार नाहीत. 30 दिवसांसाठी हे निर्बंध (moratorium)असतील. LVB चं संचालक मंडळ (Board of Directors LVB) रिझर्व बँकेने (RBI) बरखास्त केलं आहे.

लक्ष्मी विलास बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली आहे, असं लक्षात आल्यानंतर रिझर्व बँकेने केंद्र सरकारशी चर्चा सुरू केली. आता सरकारने या बँकेवर 16 डिसेंबरपर्यंत निर्बंध आणले आहेत. रिझर्व बँकेच्या सल्ल्यने अर्थ मंत्रालयाने यासंबंधी बँकेला नोटीस देऊन हा निर्णय जाहीर केला आहे. बँक दिवाळखोरीत निघण्याच्या जवळ पोहोचू नये, यासाठी असे कठोर निर्णय आवश्यक असल्याचं सांगितलं जातं. सध्या कॅनरा बँकेचे माजी कार्यकारी अध्यक्ष टी. एन. मनोहरन यांंना लक्ष्मी विलास बँकेवर प्रशासक म्हणून नेमण्यात आलं आहे.

लक्ष्मी विलास बँकेचं मुख्यालय चेन्नई इथे आहे. खासगी क्षेत्रातली महत्त्वाची बँक म्हणून LVB ओळखली जात असे. गेल्या काही महिन्यात अशा प्रकारे कारवाईवा सामोरी जाणारी LVB ही दुसरी मोठी बँक आहे. 5 मार्च 2020 ला अशाच प्रकारे येस बँकेवर (Yes Bank) निर्बंध आणले होते. पण पुढे स्टेट बँकेच्या (SBI) सहयोगाने ही बँक वाचवण्यात आली. यापूर्वी खासगी क्षेत्रातली ग्लोबल ट्रस्ट बँकसुद्धा बुडितखात्यात निघाली होती.  शेवटी ती ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये विलीन करण्यात आली.

RBI या परिस्थितीवर बारिक लक्ष ठेवून आहे. आतासुद्धा लक्ष्मी विलास बँकेच्या खातेदारांचं नुकसान होऊ नये आणि त्यांचं हित जपलं जावं यासाठी RBI योग्य तो निर्णय घेईल, असं रिझर्व बँकेच्या सूत्रांनी मनी कंट्रोलला सांगितलं.

2019 पासून LVB चा संकटकाळ सुरू झाला. इंडिया बुल्स हाउसिंग फायनान्समध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव रिझर्व बँकेने फेटाळून लावला होता. शेअर होल्डर्सनीसुद्धा बँकेच्या संचालक मंडळातल्या बहुतांश संचालकांविरोधात अविश्वास ठराव मंजूर केला होता.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: November 17, 2020, 8:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading