नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : लक्ष्मी विलास बँकेचं (LVB bank) विलीनीकरण डीबीएस बँक (DBIS) इंडिया लिमिटेडमध्ये करण्यात आलं आहे. या विलीनीकरणानंतर आता लक्ष्मी विलास बँकेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश डीबीएस बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये केला जाईल असं बँकेनं स्पष्ट केलं आहे. सर्व नियम आणि अटी लक्ष्मी विलास बँकेसारख्याच असणार आहेत.
भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank of India) विशेष अधिकाराचा वापर करत एलव्हीबी बँकेचं विलीनीकरण करण्यात आलं आहे. बँकिंग रेग्युलेशन अक्ट 1949 च्या कलम 45 अंतर्गत लक्ष्मी विलास बँकेसंदर्भात हा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी 27 नोव्हेंबर 2020 पासून झाली आहे.
सर्व बँकिंग सुविधा सुरू -
आरबीआयने (RBI)लक्ष्मी विलास बँकेवर (LVB) लावलेली बंदी 27 नोव्हेंबर रोजी हटवली होती. त्यानंतर बँकेच्या सर्व शाखांमध्ये डिजिटल माध्यम आणि एटीएमसह सर्व सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे लक्ष्मी विलास बँकेच्या सर्व ग्राहकांना बँकेच्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
(वाचा - मोदी सरकारचा नवा प्लॅन; या नियमांचं पालन न केल्यास रद्द होईल गाडीचं रजिस्ट्रेशन)
इतके मिळणार बचत आणि एफडीवर व्याज -
याविषयी डीबीएस बँकेने सांगितलेल्या माहितीनुसार, विलीनीकरणानंतरदेखील लक्ष्मी विलास बँकेच्या दरांनुसारच बचत खात्यावर (Savings Account) आणि एफडी खात्यावर (Fixed Deposits) ग्राहकांना व्याज मिळणार आहे. यामध्ये कोणताही बदल करायचा झाल्यास ग्राहकांना याची माहिती दिली जाणार आहे.
डीबीएसची टीम, लक्ष्मी विलास बँकेच्या कर्मचाऱ्यांबरोबर मिळून काम करणार आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांमध्ये लक्ष्मी विलास बँकेची सिस्टम डीबीएस बँकेत इंटिग्रेट केली जाणार आहे. ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर ग्राहकांना पुन्हा एकदा सर्व सुविधा मिळण्यास सुरुवात होणार आहे.
(वाचा - घरबसल्या पैसे कमवण्याची नवी संधी; swiggy सोबत करता येणार हा व्यवसाय)
2500 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करणार डीबीएस ग्रुप -
याविषयी माहिती देताना बँकेने सांगितलं, आमच्याकडे पर्याप्त स्वरूपात रक्कम असून विलीनीकरणानंतरदेखील ही रक्कम कॅपिटल एडिकेसी रेशियो (CAR)नियमांवरच असणार आहे. त्याशिवाय विलीनीकरण सहजपणे व्हावे, भविष्यात बँकेची वाढ व्हावी यासाठी डीबीएस ग्रुप DBIL मध्ये 2,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Reserve bank of india