मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Education Loan: तुम्हीही शैक्षणिक कर्ज घेतलंय का? मग जाणून घ्या कधी आणि कशी करावी लागते कर्जाची परतफेड

Education Loan: तुम्हीही शैक्षणिक कर्ज घेतलंय का? मग जाणून घ्या कधी आणि कशी करावी लागते कर्जाची परतफेड

शैक्षणिक कर्जाची परतफेड कधी आणि कशी करावी वाचा

शैक्षणिक कर्जाची परतफेड कधी आणि कशी करावी वाचा

अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर सहा महिने ते वर्षभराचा अवधी दिला जातो. त्यामुळे या कर्जाचा बोजा पालकांवर पडण्याची शक्यता फार कमी असते.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 30 नोव्हेंबर:  कोणतंही कर्ज (Loan) घेतलं की त्याची परतफेड (Repayment) करणंही निश्चितच असतं. त्याकरता काही वर्षांची मुदत दिलेली असते. त्यात मुद्दल आणि व्याज याच्या एकत्रित रकमेचे मुदतीनुसार समान भाग केले जातात आणि दरमहा ती रक्कम कर्जाचा हप्ता म्हणून वसूल केली जाते. त्यानुसार शैक्षणिक कर्जाची (Education Loan) परतफेडही दरमहा ठराविक हप्त्याने केली जाते, मात्र इतर कर्जे आणि शैक्षणिक कर्ज यात महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे याची परतफेड विद्यार्थ्यांना नोकरी (Job) मिळाल्यानंतर सुरू होते. त्यासाठी त्यांना अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर सहा महिने ते वर्षभराचा अवधी दिला जातो. त्यामुळे या कर्जाचा बोजा पालकांवर पडण्याची शक्यता फार कमी असते. या कर्जाच्या परतफेडीबाबत अधिक माहिती आजच्या या लेखात घेऊया.

उच्च शिक्षणाचा (Higher Education) वाढता खर्च लक्षात घेता आजकाल शैक्षणिक कर्ज (Education Loan) ही सर्वसामान्य बाब झाली आहे. सर्वसामान्य पालकांना उच्च शिक्षणाचा लाखो रुपयांचा खर्च परवडणं अशक्य आहे. त्यातच शिक्षण अधिकाधिक महाग होत आहे. एका अहवालानुसार, 2010-11 मध्ये सरासरी अडीच लाख रुपये शैक्षणिक कर्ज संमत होत होते, तर 2016-17मध्ये शैक्षणिक कर्जाची रक्कम 6 लाखापेक्षा जास्त झाल्याचं आढळून आलं. वार्षिक सरासरी 16 टक्के वाढ झाल्याचं यावरून दिसून येतं. त्यामुळं उच्च शिक्षणाचे किंवा परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचं आपलं स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक शैक्षणिक कर्ज घेतात. त्यामुळे दरवर्षी या कर्जाच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे. सर्व सरकारी बँका, खासगी बँका, बिगर बँकिंग संस्था हे शैक्षणिक कर्ज देतात. लाखो रुपयांपासून ते कोटी रुपयांपर्यंत अगदी सहजतेनं मिळणाऱ्या या कर्जाच्या परतफेडीची पद्धतही सुलभ आहे. हे या कर्जाचे खास वैशिष्ट्य आहे.

गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज या कर्जांची परतफेड कर्ज मिळाल्यानंतर लगेच सुरू होते पण शैक्षणिक कर्जाचे तसे नसते. इतर कर्जांपेक्षा या कर्जाच्या परतफेडीच्या पद्धतीत एक मोठा फरक आहे तो म्हणजे या कर्जाची परतफेड विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर 6-12 महिन्यांनी किंवा त्याला नोकरी लागल्यानंतर यापैकी जे आधी होईल, तेव्हापासून सुरू होते. कर्जाच्या परतफेडीचा कालावधी साधारण 15 वर्षे असतो. प्रत्येक बँक आणि वित्तीय संस्था यानुसार यात फरकही होऊ शकतो. कर्जाची परतफेड समान मासिक हप्ता अर्थात ईएमआय (EMI)पद्धतीने करावी लागते.

RD Interest rate : रिकरिंग डिपॉझिटवरील व्याज दर मोजण्यासाठी वापरा `हे` सूत्र

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा ते बारा महिन्यांनी कर्जफेडीची सुरूवात होत असली तरी शिक्षण चालू असतानाच व्याजाची रक्कम (Interest)भरावी लागते. बहुतांश वेळा पालकच (Parents) हे व्याजाचे हप्ते भरतात. त्याचा त्यांना करबचतीसाठी फायदा होतो. पाल्यासाठी भरलेल्या शैक्षणिक फीवर पालकांना प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 सी अन्वये कर सवलत (Tax Benefit)मिळते. तसेच पालकांनी नियमित आणि वेळेवर व्याज भरले, तर काही बँका व्याज दरात एक टक्का सवलत देतात.अनेकदा पालकांना हा आर्थिक भार सोसणे शक्य नसते तेव्हा विद्यार्थ्यांनाच याची जबाबदारी घ्यावी लागते. त्यातही विद्यार्थी परदेशी शिक्षण घेत असेल तर कर्जाची रक्कमही मोठी असते पर्यायाने व्याजाची रक्कमही जास्त असते. त्यामुळे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोपातील अनेक देशांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी छोट्या- मोठ्या नोकऱ्या करून कमाई करतात आणि त्यातून याची परतफेड करतात. व्याजाची नियमित परतफेड केल्यास काही बँका, वित्तीय संस्था व्याजदरात सवलत देतात. त्याचाही मोठा फायदा होतो. या कर्जाचा व्याजदरही इतर कर्जांच्या तुलनेत कमी असतो आणि परतफेडीचा कालावधी दीर्घ असल्यानं मासिक हप्ता कमी असतो. त्यामुळे शिक्षण संपल्यानंतर 6 महिने किंवा वर्षभरात नोकरी लागल्यानंतर याचे हप्ते फेडणे सहज शक्य असते. त्याचप्रमाणे अपवादात्मक परिस्थितीत नोकरी मिळत नसेल तर बँका किंवा वित्तीय संस्था परतफेड सुरू करण्याचा कालावधी वाढवूनही देऊ शकतात. सध्या कोरोना साथीच्या संकटामुळे अनेक विद्यार्थ्यांवर ही परिस्थिती ओढवली होती. शिक्षण पूर्ण झाले तरी नोकऱ्या मिळणेच कठीण झाल्यानं अनेकांना कर्जाची परतफेड सुरू करणं शक्य नव्हतं अशावेळी या मुदतीत थोडी वाढ करण्यात आली होती.

शैक्षणिक कर्जाची मुदतीआधी अंशत: एकरकमी परतफेड (Pre payment)करण्याची सुविधाही उपलब्ध असते. यामुळे दीर्घ काळ परतफेड करण्यामुळे द्याव्या लागणाऱ्या व्याजाच्या रकमेत बचत होते. शिक्षण संपल्यानंतर भरभक्कम पगाराची नोकरी मिळाल्यानं अनेक विद्यार्थी मुदतीआधी मोठी रक्कम देऊ शकतात. त्यामुळे ते प्री पेमेंटचा पर्याय स्वीकारतात आणि कर्जाचा भार हलका करतात. मात्र यात बँकांचा तोटा होत असल्यानं यासाठी काही अटी असतात तसंच प्रक्रिया शुल्कही आकारलं जातं.

या कर्जाची परतफेड करण्यासाठी इंटरनेट बँकिंग (Internet Banking), डायरेक्ट डेबिट (Direct Debit), डिमांड ड्राफ्ट (Demand Draft)आणि धनादेश (Cheque) या मार्गांचा वापर करता येतो. विद्यार्थी परदेशात असतील तरीही इंटरनेट बँकिंगमुळे वेबसाइट किंवा मोबाइल अॅपद्वारे ऑनलाइन पेमेंट करू शकतात. विद्यार्थी देशातच असतील तर धनादेशाद्वारे म्हणजे बँकेच्या खात्यात चेक भरून हप्ता भरता येतो. त्याचप्रमाणे तुमच्या बँक खात्यातून थेट हप्ता जमा करण्यासाठी बँकेला सूचना देता येतात. त्यामुळे दर महिन्याच्या ठराविक तारखेला तुमच्या बँक खात्यातून कर्जाच्या हप्त्याची रक्कम वजा होते. डिमांड ड्राफ्ट अर्थात डीडीद्वारेही हप्ता भरता येतो. प्रत्येक बँक किंवा वित्तीय संस्थेची कर्ज परतफेडीची पद्धत वेगळी असू शकेल.

कर्ज घेताना याबाबत खात्री करून घेणं आवश्यक आहे.

Income Tax : 16 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करायचंय? 'असं' करा नियोजन

देशात पैशाअभावी बुद्धीमान, होतकरू मुलांची शिक्षण घेण्याची संधी जाऊ नये, म्हणून शैक्षणिक कर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. बहुतांश बँका, वित्तीय संस्था लाखो रुपयांचे कर्ज अगदी सहज देतात. त्यामुळे देशातील लाखो विद्यार्थी आपले उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करू शकतात. या कर्जामुळे आपण आपलं शिक्षण, स्वप्न पूर्ण करू शकलो ही जाणीव ठेवून प्रत्येक विद्यार्थ्याने हे कर्ज परत करणे आवश्यक आहे.

First published:

Tags: Education, Loan, Money