मराठी बातम्या /बातम्या /मनी /

FD मुदतीआधी मोडायचीय? पण दंडही टाळायचाय? मग हे पर्याय वाचा!

FD मुदतीआधी मोडायचीय? पण दंडही टाळायचाय? मग हे पर्याय वाचा!

Fixed deposit

Fixed deposit

(Fixed Deposits) FD हा गुंतवणुकीचा एक निश्चितचं चांगला पर्याय आहे; मात्र जर काही कारणास्तव तुम्हाला एफडी मॅच्युरिटीअगोदर (Maturity) मोडायची वेळ आली, तर नुकसान आपण कसं टाळू शकतो?

नवी दिल्ली, 5 फेब्रवारी: मुदत ठेवी (Fixed Deposits - FD) हा निश्चित उत्पन्न मिळण्याचा एक चांगला मार्ग आहे; मात्र कोरोना लॉकडाउनच्या काळात सगळीच परिस्थिती बिघडल्यामुळे एफडीवरील व्याजदरांनी (Interest Rate) खालची पातळी गाठली. त्यातही काही कारणांनी एफडी मॅच्युरिटीअगोदर (Maturity) मोडायची वेळ आली, तर अधिक नुकसान होतं. कारण अशा परिस्थितीत दंड भरावा लागतो. मग नुकसान टाळण्यासाठी काय करायचं, याचे काही मार्ग पाहू या.

बँकेच्या मुदत ठेवींची मुदत सात दिवसांपासून सुरू होते आणि ती अगदी 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीतही उपलब्ध असते. मुदत ठेवीमध्ये मुद्दल एका निश्चित व्याजदराने गुंतवली जाते. गुंतवणूकदाराला त्या रकमेवर वाढत जाणारे व्याज मिळतं.

एफडी मुदतीआधी मोडायची झाली, तर मात्र दंडाची रक्कम (Penalty) भरल्याशिवाय मोडता येत नाही. तसंच, आपली त्या वेळची गरज भागल्यानंतर हातात आलेली रक्कम पुन्हा गुंतवायची असेल, तर तेव्हा व्याजदार कमी झालेला असण्याची शक्यता असते. एफडीवर मिळणारा व्याजदर हा त्या मुदतीपुरताच मर्यादित असतो. या पार्श्वभूमीवर, एफडीमध्ये गुंतवणूक करताना काही वेगळं धोरण अवलंबणं आवश्यक आहे. फायनान्शियल एक्स्प्रेसने त्याबाबतची माहिती दिली आहे.

हे आहेत काही मार्ग -

मुदतीआधी एफडी मोडण्याची वेळ आली, तर ती मोडण्याऐवजी एफडीच्या अगेन्स्ट कर्ज (Loan Against FD) घ्यायचा पर्याय स्वीकारावा. अनेक बँका त्यांच्या एफडीवर कर्ज घेण्याचा पर्याय देतात. एफडीवर घेतलेल्या कर्जाचा व्याजदर साधारणपणे त्या एफडीवरील व्याजदराच्या एक ते दोन टक्के अधिक असतो. अर्थात बँकेनुसार तो वेगवेगळा असतो. पर्सनल लोन घेण्यापेक्षा गुंतवणूकदाराला एफडीवरील कर्जाचा पर्याय फायदेशीर ठरू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कारण एफडीवरील कर्जाचे व्याजदर पर्सनल लोनच्या व्याजदरापेक्षा साधारणतः कमी असतात. कारण त्यांना ठेवींची सुरक्षितता असते.

गुंतवणूकदार स्वीप-इन (Sweep In)एफडी अकाउंटचा पर्यायही वापरू शकतात. स्वीप-इन अकाउंट्सना टू इन वन अकाउंट किंवा मनी मल्टिप्लायर अकाउंट असंही म्हणतात. कारण त्यातून बचत खात्याच्या तरलतेचा लाभ तर मिळतोच, शिवाय एफडीचा व्याजदरही मिळतो. स्वीप इन एफडी अकाउंटचे व्याजदर रेग्युलर एफडीसारखेच असतात, शिवाय गुंतवणूकदारांना बचत खात्याच्या लिक्विडिटीचा लाभही घेता येतो. स्वीप इन अकाउंटमधील निधी वापरण्यासाठी किंवा मुदतीआधी काढून घेण्यासाठी दंड आकारला जात नाही.

हे देखील वाचा -  RBI कडून व्याजदरात कोणताही बदल नाही, तुमच्या कर्जाच्या EMI वर काय होईल परिणाम?

टू इन वन सेव्हिंग्ज अकाउंटमधील थ्रेशोल्ड लिमिटवरील (Threshold Limit) रक्कम आपोआप गुंतवणूकदाराच्या एफडी अकाउंटमध्ये हस्तांतरित केली जाते. तसंच, सेव्हिंग अकाउंटमध्ये पुरेसे पैसे नसतील, तर एफडी अकाउंटमधून पैसे काढून ते सेव्हिंग्ज अकाउंटमधील कमतरता भरून काढण्यासाठी वापरले जातील. त्यामुळे सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये पुरेशी रक्कम ठेवणं आवश्यक आहे, जेणेकरून एफडीमधील रकमेला हात लावला जाणार नाही.

आणखी पर्याय आहे तो लॅडरिंग अॅप्रोचचा. (Laddering Approach) याअंतर्गत गुंतवणूकदार त्याची गुंतवणूक विविध मुदतींमध्ये करतो. म्हणजेच एकाहून अधिक प्रॉडक्टमध्ये वेगवेगळ्या तारखांना मॅच्युअर होईल अशा पद्धतीने गुंतवणूक करता येते. एक वर्षाच्या कालावधीऐवजी एक, तीन आणि पाच वर्षांच्या पर्यायातही गुंतवणूक करता येते. मॅच्युअर झालेली एफडी रिन्यूही करता येते आणि प्रत्येक वेळी तीच पद्धत वापरली जाते.

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून फिक्स्ड डिपॉझिट लोन्सवर डेली रिड्युसिंग बॅलन्सवर आधारित व्याजदर दिला जातो आणि तोही प्री-पेमेंट पेनल्टी किंवा प्रोसेसिंग फीशिवाय. फिक्स्ड डिपॉझिटच्या व्याजदरापेक्षा एक टक्का जास्त व्याजदर त्या लोनसाठी आकारला जातो. लोन अगेन्स्ट एफडी हा पर्याय अवलंबताना काही बँका फिक्स्ड डिपॉझिटच्या 90 टक्क्यांपर्यंतची रक्कम काढण्याची सुविधाही देतात.

First published:

Tags: Fixed Deposit, Money, Pay the loan, Sbi fixed deposit, State bank of india