कशाप्रकारे ट्रॅक कराल तुमच्या Income Tax रिफंडचं स्टेटस, अशी आहे ऑनलाइन प्रक्रिया

कशाप्रकारे ट्रॅक कराल तुमच्या Income Tax रिफंडचं स्टेटस, अशी आहे ऑनलाइन प्रक्रिया

इनकम टॅक्स रिफंडचा (Income Tax Refund) दावा करायचा असेल तर इनकम टॅक्स रिटर्न (ITR) फाईल करणं ही रिफंड परत मिळवण्यासाठीची पहिली पायरी आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 नोव्हेंबर: जर तुम्ही करपात्र असाल तर इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Returm) भरणं तुमच्यासाठी अनिवार्य आहे. खास करून टॅक्स रिफंडचा दावा करायचा असेल तर रिटर्न फाईल करणं ही रिफंड परत मिळवण्यासाठीची पहिली पायरी आहे. तुम्ही इनकम टॅक्स  रिटर्न भरल्यानंतर आयकर विभाग तुमच्या खात्याची संपूर्ण पडताळणी करतो आणि तुम्ही भरलेली रक्कम तुमच्या उत्पन्नावर लागणाऱ्या करापेक्षा जास्त असेल तर ही अधिकची रक्कम तुम्हाला आयकर खात्याकडून परत केली जाते.

टॅक्स रिफंडचा दावा केव्हा आणि कसा करावा?

करदात्याने माहिती भरून दिलेली असते. त्यावरून मिळकतीच्या स्रोतानुसार आयकराची रक्कम कपात केली जाते. मिळकतीचे स्रोत जसं की पगार, व्याज, कमिशन, भाडं, ब्रोकरेज, प्रोफेशनल फी, रॉयल्टी आणि इतर. पगाराचं उदाहरण घेतल्यास प्रत्येक घटकासाठी ठरवून दिलेल्या आयकराच्या स्लॅबनुसार टॅक्स डिडक्टेड अॅट सोर्सचा (TDS) दर ठरत असतो.

एकदा का टीडीएस कपात झाली की केंद्र सरकारच्या खात्यात ठराविक वेळेच्या आत नोंदला जातो. काही वेळा करदाता त्याच्या खर्चाचे आणि गुंतवणुकीचे योग्य डिक्लेरेशन देत नाही, ज्यामुळे त्याची करयोग्य रक्कम कमी होण्यास मदत होईल. अशावेळी हा जादाचा करभरणा केलेली रक्कम तुम्ही रिफंड म्हणून मागू शकता. पण त्यासाठी आधी तुम्हाला इनकम टॅक्स रिटर्न फाईल करावा लागेल. तसे न केल्यास तुम्ही रिफंडचा दावा करू शकत नाहीत.

रिफंड रकमेवर व्याज मिळवता येऊ शकते का?

तुमच्या रिफंडची रक्कम ही तुम्ही भरलेल्या एकूण आयकर रकमेच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर या रिफंडच्या थकीत रकमेवर सरकार तुम्हाला व्याज देते. आयकर कायदा 1961च्या सेक्शन 244 अ नुसार ही तरतूद आहे. रिफंड रकमेवर दरमहा 0.5 टक्के एवढे व्याज दिले जाते. अॅसेसमेंट इअरच्या पहिल्या दिवसापासून ते रिफंड मंजूर होण्याच्या तारखेपर्यंत हे व्याज दिले जाते.

रिफंडचे स्टेटस कसे ट्रॅक करता येते?

एकदा का तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न फाईल केलात आणि टॅक्स रिफंडसाठी दावा दाखल केला की रिफंडचं स्टेटस तुम्ही ऑनलाईन पाहू शकता. www.incometaxindia.gov.in किंवा www.tin-nsdl.com या दोन्हीपैकी कोणत्याही वेबसाइटवर लॉग ऑन करा. 'स्टेटस ऑफ टॅक्स रिफंड'वर क्लिक करा. त्यानंतर ज्या वर्षासाठीचा रिफंड थकित असेल ते आर्थिक वर्ष आणि तुमचा पॅन नंबर तिथे टाका.

रिफंडची प्रक्रिया आयकर विभागाने पूर्ण केलेली असेल तर मोड ऑफ पेमेंट, रेफरन्स नंबर, स्टेटस आणि परताव्याची तारीख असलेला मेसेज तुम्हाला येईल. रिफंडची प्रक्रिया झालेली नसेल किंवा दावा फेटाळला गेला असेल तर तसा मेसेज तुम्हाला येईल.

रिफंडला उशीर होण्याची कारणे काय असू शकतात?

आयकर खात्याकडून रिफंड मिळण्यात किंवा दावा फेटाळला जाण्यास उशीर होण्यासाठी वेगवेगळी कारणं असू शकतात. बऱ्याचदा रिटर्न फाइल करताना बँक खात्याच्या तपशीलात चुका राहून जातात. बँकेचं नाव, खाते क्रमांक आणि आयएफएस कोडमध्ये या चुका असू शकतात. परदेशात बँक खाते असल्यास इंटरनॅशनल बँक अकाऊंट नंबरमध्ये काही त्रूटी राहून जातात. हा तपशील अचूक भरला पाहिजे. रिफंडसाठी निवडण्यात आलेले बँक खाते इ-फाइलिंगसाठी वैध आहे आणि तुमच्या पॅनशी जोडलेले असल्याची खात्री आधीच करून घ्या.

रिफंड परत मागण्याआधी चुका दुरुस्त करता येतात का?

रिटर्न फाईल करताना बँक खात्याच्या तपशीलात काही चूक झालेली असेल तर स्टेटस रिपोर्ट ती तुम्हाला दाखवून देईल. अशा वेळी तुम्हाला ही चूक दुरुस्त करण्याची मुभा असते. यासाठी इ-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करा. (www.incometaxindiaefiling.gov.in) या ठिकाणी माय अकाऊंटवर जा. नंतर रिफंड रिइश्यू रिक्वेस्टवर क्लिक करा. स्टेप्स फॉलो करत ज्या खात्यात तुम्हाला रिफंड हवा असेल त्या बँक खात्याच्या तपशीलातील चुका दुरुस्त करता येतील. त्यानंतर तुमची ही रिक्वेस्ट सबमिट करा. तुमचे सर्व तपशील अचूकपणे रिटर्न फाईलमध्ये नमूद केलेले असतील तर रिफंड तुमच्या खात्यावर जमा होण्यासाठी काही दिवस तरी तुम्हाला वाट पाहावी लागेल.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 5, 2020, 8:32 AM IST

ताज्या बातम्या