मुंबई, 21 जुलै: केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये काही रक्कम जमा करत असते. यासोबतच आता या योजनेमधून शेतकऱ्यांना क्रेडिट कार्डही देण्यात येणार आहे. या कार्डच्या मदतीने शेतकऱ्यांना बँकेकडून कमी व्याजदरात कर्ज मिळू शकतं.
किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजना या पूर्वीच सुरू करण्यात आली आहे (Kisan Credit Card). कोरोना काळात तब्बल दोन कोटी शेतकऱ्यांना या योजनेमधून कार्ड देण्यातही आली आहेत. आता ‘केसीसी’ (KCC) योजना ही ‘पीएम किसान’ (PM KISAN) योजनेसोबत जोडण्यात आली आहे. त्यामुळे किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांनाही केसीसीचा लाभ घेता येणार आहे.
किसान क्रेडिट कार्डसाठी कोण अर्ज करु शकतं?
अल्पभूधारक शेतकरी किंवा संयुक्त शेती करणारेही यासाठी पात्र आहेत. यासोबतच बागायतदार, पट्टेदार आणि बचत गटही यासाठी पात्र ठरतात.
कोणती कागदपत्रं आवश्यक?
किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card Documents) तयार करुन घेण्यासाठी आपली पूर्ण माहिती भरलेला अर्ज आणि आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र यांपैकी एक पुरावा सोबत जोडावा. यासोबतच आपण सध्या कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतलं नसल्याचं अॅफिडेव्हिटही आवश्यक आहे. तसंच, अर्जकर्त्याचा एक पासपोर्ट आकाराचा फोटोही जोडणं आवश्यक आहे.
हे वाचा-सावधान! आता नोकरीसाठी थेट होतेय PM मोदींच्या नावे फसवणूक, उकळली जातेय नोंदणी फी
सध्याच्या कर्जाबाबत द्यावी लागणार माहिती
किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज दाखल करताना या पूर्वी घेतलेल्या कर्जाबाबतही माहिती देणे आवश्यक आहे. ही माहिती लपवून ठेवल्यास तुम्हाला हे क्रेडिट कार्ड मिळणार नाही.
‘पीएम किसान’ लाभार्थ्यांसाठी प्रक्रिया सुलभ
जर तुम्ही ‘किसान सन्मान निधी’चे लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी हे क्रेडिट कार्ड मिळवण्याची प्रक्रिया आणखी सोपी आहे. यासाठी तुम्हाला पिकाचा तपशील, ओळखपत्राची फोटोकॉपी (झेरॉक्स), आणि एक पानी अर्ज एवढं जमा करावं लागणार आहे. यानंतर तुमचं क्रेडिट कार्ड तुम्हाला मिळून जाईल.
हे वाचा-Aadhaar Card वरील मोबाइल क्रमांक अपडेट करायचा आहे का? अशी मिळेल घरपोच सेवा
किसान क्रेडिट कार्डचे फायदे
किसान क्रेडिट कार्ड योजनेमधून 1.60 लाख रुपयांपर्यंत विनातारण कर्ज मिळू शकतं. जर एखाद्या शेतकऱ्याने कर्जाची रक्कम एका वर्षाच्या आत पूर्ण भरली, तर त्याला केवळ चार टक्के व्याज लागू होईल. कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 75 वर्षे वयोगटातील लोकांना केसीसी योजनेचा लाभ घेता येणार आहे. एकदा तयार झाल्यानंतर पाच वर्षांपर्यंत या कार्डचा वापर करता येईल. त्यानंतर पुन्हा नव्या कार्डासाठी अर्ज दाखल करावा लागणार आहे.
सर्व सरकारी, खासगी, सहकारी आणि स्थानिक बँका हे क्रेडिट कार्ड देऊ शकतात. तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटर, म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन यासाठी अर्ज दाखल करु शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.