Amazon, Flipkart ला कोर्टाचा मोठा दणका; ऑनलाइन शॉपिंगचं भवितव्य बदलू शकतो हा निर्णय

Amazon, Flipkart ला कोर्टाचा मोठा दणका; ऑनलाइन शॉपिंगचं भवितव्य बदलू शकतो हा निर्णय

अवाजवी सवलती देताना ठराविक सेलर्सना झुकतं माप देणं आणि स्पर्धात्मकता नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल या दोन बड्या कंपन्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

  • Share this:

बंगळुरू, 11 जून: Amazon आणि Flipkart या मोठ्या ई-कॉमर्स उद्योगांना धक्का देणारी बातमी आहे. भारतात विस्तारत असलेल्या E Commerce अर्थात ऑनलाइन शॉपिंग उद्योगाला थोडी खीळ घालणारा मोठा निर्णय कर्नाटक हायकोर्टाने दिला आहे. CCI म्हणजे कॉम्पिटेटिव्ह कमीशन ऑफ इंडिया या दोन कंपन्यांविरुद्ध कारवाई करू शकते, असा निर्वाळा उच्च न्याायालयाने दिला आहे.

अवाजवी सवलती देताना ठराविक सेलर्सना झुकतं माप देणं आणि स्पर्धात्मकता नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल या दोन बड्या कंपन्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. साधारण दीड वर्षांपासून हे प्रकरण सुरू होतं. दिल्लीच्या व्यापार महासंघाने (DVM)अमेझॉन आणि फ्लिपकार्टविरोधात ही तक्रार दाखल केल्यानंतर CCI ची कारवाई सुरू होणार होती, पण त्यापूर्वी या दोन कंपन्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि तपासणी-कारवाईची प्रक्रिया थांबवण्याची विनंती केली. पण आता त्यांची ही याचिका फेटाळत CCI च्या कारवाईचा मार्ग हायकोर्टाने मोकळा केला. आता अमेझॉन आणि फ्लिपकार्टपुढे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे किंवा सर्वोच्च न्यायालयात जायचा मार्ग खुला आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या या निकालानंतर अमेझॉनच्या प्रवक्याने प्रतिक्रिया देताना सांगितलं की, 'आम्ही या निकालाचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यानंतरच पुढे काय करायचं ते ठरवू.'

स्मार्टफोनवरच्या प्रचंड सवलतींवर व्यापारी नाराज

ऑक्टोबर 2019 मध्ये दिल्ली व्यापारी महासंघाने सर्वप्रथम Amazon आणि Flipkart विरोधात तक्रार नोंदवली. स्पर्धा कायद्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या कलमाखाली(Sections 3 and 4 of the Competition Act) ही तक्रार नोंदवली. विशेषतः स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवर अवाजवी सवलती देऊन अमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या इ कॉमर्स कंपन्या बाजार काबीज करू इच्छितात. या वर्चस्ववादातून छोट्या दुकानदार आणि व्यापाऱ्यांना संपवण्याचा डाव असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.

हे भलेमोठे डिस्काउंट आणि ऑफर्स देताना E commerce कंपन्या ठराविक सेलर्सना झुकतं माप देतात, त्यांना प्राधान्य देतात, असेही आरोप होते. त्यातून स्पर्धात्मकता संपते, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं होतं.

आतापर्यंत या खटल्यावर झालेल्या सुनावणीत अमेझॉन आणि फ्लिपकार्ट दोन्ही कंपन्यांनी सर्व दावे फेटाळत आम्ही कुठलीही चुकीची किंवा अवैध पद्धत राबवत नाही, असं सांगितलं आहे.

First published: June 11, 2021, 10:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या