मुंबई, 21 जुलै: आपण जेव्हा नोकरी सुरू करतो, तेव्हा आपल्याला पगाराची सांगितलेली रक्कम आणि प्रत्यक्ष हातात येणारी रक्कम यामध्ये फरक असतो. कारण, पगाराच्या रकमेतून कंपनी पीएफ आणि कराची रक्कम कापून घेत असते. पीएफबाबत जवळपास सर्वांना माहिती असतेच. मात्र, आपल्या पगारातून कापला जाणारा ‘टीडीएस’ (Tax Deducted at Source TDS) तुम्हाला परत मिळू शकतो हे फार थोड्या कर्मचाऱ्यांना माहिती असते. हा टीडीएस परत मिळवण्यासाठी आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयटीआर (ITR) भरावा लागतो (ITR Process). ज्या कर्मचाऱ्यांचं वार्षिक उत्पन्न करपात्र आहे त्यांना आयटीआर भरणं अनिवार्य आहे. ज्यांचं उत्पन्न करपात्र नाही अशा नोकरदारांनी आयटीआर भरला तर त्यांचे आर्थिक व्यवहार योग्य असल्याचं सरकारी परिमाण म्हणून उपयोग होतो.
जर एखाद्या व्यक्तीने कंपनी जॉइन केली, तर त्याच्या वार्षिक उत्पन्नावर लागू होणाऱ्या टॅक्सला 12 ने भागून दरमहिन्याला टीडीएस (TDS) कापला जातो. हा टीडीएस कर्मचाऱ्याच्या सीटीसीवर (CTC) अवलंबून नसतो तर करयोग्य पगारावर अवलंबून असतो. यामुळे नोकरदाराने केलेली गुंतवणूक, खर्च हे पण कंपनीतील अधिकारी गृहित धरतात आणि मग टीडीएस कापतात. आयटीआर भरल्यावर पगारातून कापलेला कर टीडीएस त्यांना परत मिळू शकतो. ज्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती असते, त्यांचीही आयटीआर भरण्याची शेवटची तारीख (ITR deadline) जवळ आल्यानंतर तारांबळ उडते.
हे वाचा-Gold Jewellery बाबतचा हा निर्णय होणार रद्द? वाचा काय आहे सरकारचं स्पष्टीकरण
फॉर्म 16 काय असतो?
आयटीआर अर्ज जमा करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांपैकी सर्वात महत्त्वाचं कागदपत्रं म्हणजे फॉर्म-16. (ITR Form 16) आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्याला जे टीडीएस सर्टिफिकेट दिलं जातं, तोच फॉर्म-16. यामध्ये कर्मचाऱ्याचा पगार आणि त्याला लागू होणाऱ्या करांबाबत माहिती दिलेली असते. कर आणि गुंतवणूक तज्ज्ञ बळवंत जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर कर्मचाऱ्याने आपले गृह कर्ज, मुलांच्या शाळेची फी याबाबतची माहिती कंपनीला दिली नसेल तर आयटीआर भरताना तो याबाबत क्लेम करू शकतो.
हे वाचा-EPFO: पीएफ खातेधारक असाल तर तुम्हालाही मिळेल पेन्शनचा लाभ, वाचा काय आहे नियम
त्रासापासून वाचण्यासाठी योग्य माहिती द्या
कर्मचाऱ्याला फॉर्म-16 देण्यापूर्वी एचआर विभागाकडून असं विचारलं जातं, की त्याला प्राप्तीकराच्या जुन्या नियमांनुसार तो हवा आहे, की नव्या नियमांनुसार. या दोन्हीपैकी कोणताही पर्याय निवडण्याची मुभा कर्मचाऱ्यांना असते. कोणती योजना फायदेशीर आहे याचा विचार करुन कर्मचारी आपल्या सोयीनुसार योजना निवडू शकतो. केवळ टीडीएससाठी (TDS) हे विचारलं जातं. जर एखाद्या कर्मचाऱ्याने एका वर्षात दोन कंपन्या बदलल्या आहेत, तर त्याला दोन फॉर्म-16 भरावे मिळतात. जैन यांनी सांगितले, की आयटीआर भरताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी कर्मचाऱ्याने आपल्या नव्या कंपनीला जुन्या कंपनीत मिळणाऱ्या पगाराबाबत सर्व माहिती देणे आवश्यक आहे.
हे वाचा-नोकरी शोधणाऱ्यांसाठी Good News!याठिकाणी फक्त 4 तास काम करुन महिन्याला कमवा 60000
फॉर्म-16 चे दोन भाग असतात. यातील भाग-अ मध्ये मालकाचे/कंपनीचे नाव, पत्ता, पॅन क्रमांक, कर्मचाऱ्याचा पॅन क्रमांक (PAN NO.), कंपनीचा/मालकाचा टीएएन नंबर, सध्याच्या कंपनीसोबत किती दिवस काम करत आहात ती माहिती आणि आतापर्यंत जमा केला गेलेला कर अशी सगळी माहिती असते. तर, फॉर्म-16 च्या ‘ब’ भागात पगाराची सविस्तर माहिती आणि सेक्शन दहा अंतर्गत मिळणारे भत्ते यांची विस्तृत माहिती दिलेली असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Income tax, Tax