Lakshmi Vilas Bank: बँकेच्या खातेधारकांचं आणि शेअर होल्डर्सचं काय होणार? वाचा सविस्तर

Lakshmi Vilas Bank: बँकेच्या खातेधारकांचं आणि शेअर होल्डर्सचं काय होणार? वाचा सविस्तर

भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India RBI) मंगळवारी लक्ष्मी विलास बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध लागू केले. ज्यामुळे ग्राहकांच्या मनांत हजारो प्रश्न उपस्थित झाले आहेत

  • Share this:

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर: भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India RBI) मंगळवारी लक्ष्मी विलास बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध लागू केले. ज्यामुळे खातेधारकांच्या आणि बँकेच्या शेअर होल्डर्सच्या मनांत हजारो प्रश्न उपस्थित झाले आहेत. आमच्या पैशांचं काय होईल, ज्यांच्याकडे बँकेचे शेअर आहेत त्यांचं काय, आता बँक बंद होणार का अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात ग्राहक आहेत. रिझर्व्ह बँकेने आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या लक्ष्मी विलास बँकेच्या (Lakshmi Vilas Bank) व्यवहारांवर निर्बंध लागू केले आहेत. ग्राहक 16 डिसेंबरपर्यंत बँकेतून 25 हजार रुपयेच काढू शकतात. अर्थ मंत्रालयाने अशी माहिती दिली आहे की,  बँकेवर 16 डिसेंबरपर्यंत निर्बंध लागू आहेत. यासंबंधी काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.

कोणत्या खात्यांवर निर्बंध लागू?

रिझर्व्ह बँकेने घातलेल्या निर्बंधांच्या आदेशानुसार लक्ष्मी विलास बँक आरबीआयच्या परवानगीशिवाय बचत, करंट किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या खातेधारकाला 25 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे देऊ शकत नाही. बँकेचे ग्राहक आता एक महिन्यापर्यंत दररोज जास्तीत जास्त 25 हजार रुपये बँकेतून काढू शकतात.

(हे वाचा-Loan Moratorium: सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी, वाचा कुणाला मिळू शकतो दिलासा)

ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

बँकेत असलेल्या ठेवींवर या आर्थिक संकटाचा काहीही परिणाम होणार नाही असं आश्वासन बँकेने ग्राहकांना दिलं आहे. बँकेचा लिक्विडिटी कव्हरेज रेशो 262 टक्के आहे त्यामुळे ठेवीदार, बाँडधारक, खातेदार आणि कर्जदारांची संपत्ती पूर्णपणे सुरक्षित आहे.

किती दिवस लागू असतील निर्बंध?

सध्यातरी आरबीआयने 30 दिवस म्हणजे 16 डिसेंबरपर्यंत बँकेवर निर्बंध लागू केले आहेत. तुम्हाला हे सांगू इच्छितो की DBS बँकेत लक्ष्मी विलास बँक विलीन करण्याची योजनाही सरकारने जाहीर केली आहे.

(संबंधित-लक्ष्मी विलास बँकेचे ग्राहक गोंधळात, सरकारच्या निर्बंधानंतर बँकेबाहेर गर्दी)

बँक बंद होऊ शकते का?

रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँक डीबीएस बँकेत विलीन करण्याची योजना तयार केली असून जर या योजनेला सरकारची मंजुरी मिळाली तर डीबीएस बँक या विलीनीकरणाला पाठिंबा देण्यासाठी डीबीआयएलमध्य 2500 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल.

ज्यांनी लक्ष्मी विलास बँकेचे शेअर घेतलेत त्यांचं काय?

रिझर्व्ह बँकेच्या योजनेनुसार लक्ष्मी विलास बँक डीबीएस बँकेत विलीन होईल. तज्ज्ञांच्या मते शेअरधारकांची गुंतवणूक शून्य होणार. याचाच अर्थ असा की बँकेची मालकी डीबीएस बँकेकडे जाणार तेही शून्य किमतीला. अशा परिस्थितीत शेअरधारकांना काहीच मिळणार नाही. त्यामुळे शेअरला लोअर सर्किट लागेल. (जेव्हा सगळेच शेअर विकतात तेव्हा लोअर सर्किट लागतं.)

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 18, 2020, 12:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading