मुंबई, 25 नोव्हेंबर : बचत आणि गुंतवणूक (Saving and Investment) हे दोन्ही शब्द आपण एकच आहेत अशा समजुतीने वापरतो. मात्र बचत आणि गुंतवणूक या दोन्ही अगदी वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्यात मोठा फरक आहे. हा फरक समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. बचत अर्थात ‘सेव्हिंग’म्हणजे आपले खर्च वगळून उरलेले पैसे अशा बँका, पोस्ट अशा सुरक्षित, कमी जोखमीच्या ठिकाणी आणि जिथून ते अगदी सहजपणे काढता येतील अशा ठिकाणी ठेवणं, तर आपण गुंतवलेल्या पैशांवर जास्तीत परतावा मिळावा या उद्देशाने थोडी जोखीम घेऊन गुंतवणूक अर्थात इन्व्हेस्टमेंट केली जाते. गुंतवणूक आणि बचत यातील फरक आणि गुंतवणूकीचे फायदे याविषयी जाणून घेऊया...
प्रत्येक व्यक्ती आपल्या भविष्यातील आर्थिक गरजांसाठी आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा बाजूला ठेवत असते. एखादी नोकरदार व्यक्ती दरमहा जो पगार मिळतो त्या रकमेतून महिन्याचा घरखर्च, भाडे किंवा घराचा कर्जाचा हप्ता असल्यास तो, मुलांचा खर्च असे जे काही खर्च असतील तर ते करून उरलेली रक्कम बँकेतील बचत खात्यात (Saving Account)ठेवत असेल तर ती बचत (Savings ) असते. तेच ती व्यक्ती या उरलेल्या पैशातून म्युच्युअल फंड, शेअर्स खरेदी करत असेल तर ती गुंतवणूक (Investment) ठरते.
गुंतवणूक करण्यामागे आपली संपत्ती वाढावी असा उद्देश असतो तर बचत करताना आपला पैसा सुरक्षित रहावा हा मुख्य हेतू असतो. गुंतवणूक आणि बचत यांच्यामधला फरकाचा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे जोखीम. आपण एखाद्या बचत खात्यामध्ये ठेवले, तर ते गमावण्याचा धोका हा अतिशय कमी असतो, मात्र त्यातून मिळणार परतावाही फार लक्षणीय नसतो. तेच एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवले तर त्याच्यातून खूप चांगला परतावा मिळण्याची शक्यता जास्त असली तरी तेवढ्याच प्रमाणामध्ये नुकसान होण्याची जोखीमसुद्धा असते.
Mutual Fund म्हणजे काय? जाणून घ्या म्युच्युअल फंडाविषयी महत्त्वाचं
बँकेतील (Banks) बचत खात्यातून खातेदाराला हवे तेव्हा केव्हाही आपले पैसे काढून घेता येतात. आता तर बहुतेक सर्वत्र एटीएम सेवा उपलब्ध झाली असल्यानं गरज पडल्यास रात्रीबेरात्रीसुद्धा पैसे काढून घेता येतात. बचत खात्यातील पैसे हे सुरक्षित (safe)असतात. त्यांना अंशतः किंवा पूर्णतः विमा संरक्षण असते. पण, बचत खात्यातील रकमेवर व्याज (Interest)मिळते मात्र ते अगदीच अल्प म्हणजे 3 ते 4 टक्के असते. त्यामुळे केवळ बचत करून दीर्घकालीन (Long Term)आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे शक्य नसते. बचतीमुळे अल्प कालीन (Short Term), मध्यम कालीन (Mid Term)उद्दिष्ट साध्य होऊ शकते. मात्र दीर्घकालीन आणि मोठ्या रकमेच्या उद्दिष्टासाठी गुंतवणूक करणे आवश्यक असते.
गुंतवणूक करताना त्यावर चांगला फायदा मिळवून त्यातून दीर्घ काळात संपत्ती निर्माण करणे (वेल्थ क्रिएशन- Wealth Creation)हा हेतू असतो. घर घेणे, मुलांचे लग्न, परदेश प्रवास, आजारपण, वृद्धापकाळी दरमहा निश्चित उत्पनाची सोय करणे अशा उद्दिष्टांसाठी दीर्घकाळ गुंतवणूक करण्याची गरज असते. त्यासाठी गुंतवणूक करताना चांगला परतावा देणाऱ्या पर्यायांचा वापर केला जातो. गुंतवणूक करताना भविष्यातील महागाईचा वाढता दर (Inflation) लक्षात घेणे महत्त्वाचे असते. कारण आता आपल्याला दरमहा पाच हजार रुपये घर खर्चासाठी लागत असेल तर आणखी 10 वर्षांनी त्यात 8 ते 10 टक्क्यांनी वाढ गृहीत धरून तेव्हा दरमहा पाच हजारपेक्षा जास्त रकमेची तरतूद करणे आवश्यक आहे. बचतीतून 3 ते 4 टक्के परतावा मिळत असल्याने 8 टक्क्याने वाढलेल्या महागाईचा सामना करणे त्या उत्पन्नातून शक्य नाही. तसेच त्यावेळी आपण सेवानिवृत्त झालो असल्याने दरमहा येणारे पगाराचे उत्पन्न नसणार याचा विचार करून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. याकरता आपल्या सध्याच्या उत्पन्नातून राहत असलेली शिल्लक लक्षात घेऊन म्युच्युअल फंड, रोखे , शेअर्स अशा 7 ते 8 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक परतावा देणाऱ्या विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक असते.
Explainer : चांगल्या क्रिप्टोकरन्सीचे गुणधर्म कोणते?
आपल्या शिल्लकीतून काही रक्कम बचत करणेही आवश्यक असते. बचत आणि गुंतवणूक यात संतुलन (Balance) राखल्यास आपली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण होऊ शकतात. गुंतवणूक करताना आपण जोखीम घेत असतो. म्युच्युअल फंड, रोखे , शेअर्स यामध्ये गुंतवणूक करताना चांगला फायदा मिळण्याची तसेच नुकसान होण्याचीही शक्यता असते. कारण म्युच्युअल फंड, रोखे , शेअर्स यातील परतावा वित्तीय बाजारांमध्ये होणाऱ्या चढ-उतारांवर अवलंबून असतो. त्यामुळे काही बचत केल्यास जोखीम कमी होऊन संतुलन राखले जाते. यासाठी आपल्या अल्पकालीन, दीर्घकालीन आर्थिक गरजांचा अभ्यास करून किती बचत करणे आवश्यक आहे, हे निश्चित करून त्यानुसार आपल्या उत्पन्नातील काही भाग बँक बचत खाती, मुदत ठेवी, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडन्ट फंड (PPF) यामध्ये गुंतवता येईल. या योजनांमध्ये जोखीम कमी आहे. त्यानंतर उरलेली रक्कम विविध गुंतवणूक पर्यायांमध्ये ठेवता येईल. यासाठी म्युच्युअल फंडाची निवड अगदी उत्तम ठरते. कारण यात दरमहा थोडी रक्कम गुंतवण्याचा एसआयपीचा पर्याय असतो. तसेच यात परतावाही चांगला मिळतो. तसेच यावर शेअर बाजार नियामक संस्था 'सिक्युरिटीज् अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीचे (SEBI) नियंत्रण असल्याने यात सुरक्षितताही असते.
ATM कार्डची मुदत संपल्यानंतर तुम्हाला नवं कार्ड मिळालं नाही तर काय करायचं?
गुंतवणूक करण्यासाठी बचतीच्या पैशांचा वापरही करता येतो. उदाहरणार्थ, आपण आपल्या बँकेच्या बचत खात्यात काही रक्कम साठवली असेल तर त्यातील काही रक्कम आपण एखाद्या म्युच्युअल फंडाच्या योजनेत गुंतवता येते. त्यामुळे बचत करणे चांगले असले तरी गुंतवणूक अत्यंत महत्त्वाची आहे. तरच तुम्ही सेवानिवृत्तीनंतर, वृद्धापकाळी उत्तम आयुष्य जगण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकाल. सर्व आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडू शकाल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Mutual Funds