नवी दिल्ली,28 जानेवारी : एनपीएस (National Pension Scheme- NPS) अर्थात नॅशनल पेन्शन योजना पब्लिक प्रोव्हिडंट फंड (Public Provident Fund -PPF) योजनेच्या तुलनेत सरस ठरत आहे. सेवानिवृत्तीनंतरची तरतूद करण्यासाठी गुंतवणूकदार थोडी जोखीम घेऊन चांगला परतावा देणाऱ्या योजनांच्या शोधात असतात. त्यांच्यासाठी एनपीएस (NPS) उत्तम पर्याय ठरत आहे. एनपीएस योजना ही शेअर बाजाराशी निगडीत असते, काही प्रमाणात यातील गुंतवणूक डेब्ट आणि इक्विटी मोडमध्ये केली जाते. त्यामुळं पीपीएफच्या तुलनेत या योजनेत थोडी जोखीम असते; मात्र गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणुकीपैकी किती हिस्सा शेअर आणि कर्ज रोखे (Debt Investment) यात गुंतवावा याची निवड करण्याची मुभा असते. अनेक गुंतवणूकदार 75 टक्के गुंतवणूक शेअर्समध्ये करण्याची निवड करतात. जोखीम कमी करायची असेल तर 60 : 40 अशा प्रमाणात ही गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडला जातो.
कशाप्रकारे कराल वार्षिक दहा टक्के परताव्याची अपेक्षा?
एनपीएस योजनेत 60:40 या प्रमाणात इक्विटी आणि डेब्ट या प्रकारात गुंतवणूक केल्यास वार्षिक 12 टक्के परताव्याची अपेक्षा करता येते. कर्ज रोख्यांमध्ये आठ टक्के दरानं परतावा मिळतो. शेअर्समध्ये 60 टक्के गुंतवणुकीवर 30 वर्षात सात टक्के दरानं आणि कर्ज रोख्यांवर 3 टक्के दरानं असा एकूण दहा टक्के दरानं परतावा मिळतो.
40 टक्के गुंतवणुकीतून अॅन्युईटी खरेदी
निवृत्तीच्या वयात पोहोचल्यानंतर एनपीएस योजनेतील गुंतवणुकीपैकी 60 टक्के रक्कम काढता येते. उर्वरीत 40 टक्के रकमेतून अॅन्युईटी (Annuity) खरेदी करता येते. Annuity ची रक्कम पेन्शन स्वरूपात घेता येते. अशाप्रकारे निवृत्तीनंतरच्या पेन्शनची तरतूद करता येते. अॅन्युईटीवर साधारण सहा ते सात टक्के दरानं व्याज मिळते, त्यानुसार दरमहा मिळणाऱ्या रकमेचे प्रमाण ठरते.
हे वाचा - रेल्वेची नवी योजना! तुमच्या जास्तीच्या सामानाची होणार Home Delivery
यानुसार हिशेब केल्यास 30 वर्षे दरमहा 3 हजार रुपये गुंतवणूक केल्यास एकूण रकमेपैकी 40 टक्के म्हणजे 41 लाख 2 हजार 786 रुपयांची रक्कम जमा होते. म्हणजेच दररोज 100 रुपयांची बचत केल्यास हे उद्दिष्ट साध्य करता येईल. या रकमेतून अॅन्युईटी खरेदी केल्यास साधारण सहा टक्के दरानं दरमहा 13 हजार 676 रुपयांची पेन्शन (Pension) मिळू शकेल.