मुंबई, 30 ऑगस्ट: भारतात अनेक लोक दररोज रेल्वेनं (Indian Railway) प्रवास करतात. परवडणारा दर आणि आरामदायी प्रवास यामुळं अनेक भारतीयांची प्रवासासाठी रेल्वे ही पहिली पसंती असते. भारतीय रेल्वेच्या मदतीनं लाखो लोक दररोज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. अनेक लोक आपल्याला कुठं जायचं असेल ट्रेनचं तिकीट बुकिंग आधीच करतात. सणासुदीच्या काळात तर ट्रेनमध्ये तिकीट मिळणं अवघड होऊन बसतं, त्यामुळे प्रवासी अनेक महिने आधीच तिकीट बुक करतात. मात्र काही वेळा काही कारणानं त्यांना तिकीट रद्द करावे लागतं. तिकीट रद्द करणं आणि त्यावरील जीएसटी (GST Charge on Ticket Cancellation) याविषयी अलीकडं बरीच अटकळ सुरू आहे. या सर्व बाबींची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. रेल्वे मंत्रालयानं सांगितलं की, 23 सप्टेंबर 2017 रोजी जारी केलेल्या सूचनांनुसार तिकीट रद्द करण्याच्या बाबतीत बुकिंगच्या वेळी आकारण्यात येणारी जीएसटीची एकूण रक्कम परत केली जाते.
तथापि, मंत्रालयानं असेही म्हटलं आहे की, रिफंड नियमांनुसार लागू कॅन्सलेशन/क्लर्केज शुल्क आणि कॅन्सलेशन/क्लर्केज शुल्कावरील जीएसटीची रक्कम रेल्वेनं कायम ठेवली आहे. हे फक्त एसी आणि फर्स्ट क्लासमध्ये लागू आहे. जीएसटी वित्त मंत्रालयाकडून गोळा केला जातो. नियम/तरतुदींमध्ये कोणताही बदल नाही.
3 ऑगस्ट रोजी वित्त मंत्रालयाच्या टॅक्स रिसर्च युनिटनं एक परिपत्रक जारी केले होते. त्यात म्हटलं आहे की बुकिंग तिकीट हा एक करार आहे ज्या अंतर्गत सेवा प्रदात्याद्वारे (IRCTC/भारतीय रेल्वे) ग्राहकांना सेवा प्रदान केली जाते. याच अधिसूचनेनुसार, फर्स्ट क्लास किंवा एसी कोचचे तिकीट रद्द केल्यावर 5% जीएसटी आकारला जाईल. तिकीट बुक करताना लागू होणारा हा जीएसटी दर आहे.
हेही वाचा- सणासुदीत गावी जाण्यासाठी रेल्वे तिकीट बुकिंग करताय? युजर आयडी रद्द तर झाले नाहीत याची करा खात्री
उदाहरणार्थ, फर्स्ट क्लास किंवा एसी कोचसाठी कॅन्सलेशन फी 240 रुपये आहे आणि बुकिंगच्या वेळी 5% GST लागू आहे. अशाप्रकारे, रद्द करताना एकूण रकमेतून 250 रुपये वजा केले जातात आणि उरलेली रक्कम प्रवाशांना परत केली जाते. त्याच वेळी, स्लीपर किंवा द्वितीय श्रेणीसाठी कोणताही जीएसटी लागू नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: GST, Indian railway, Railway