मुंबई, 30 मार्च : भारतातील 1.40 अब्ज लोकसंख्येपैकी काही व्यक्ती अशा आहेत की ज्यांना अतिशय दुर्मिळ आजारांनी ग्रासलेलं आहे. दुर्मिळ आजार असलेल्या मोजक्या लोकांमध्ये काही लहान बालकांचाही समावेश आहे. दुर्मिळ आजारांच्या उपचारांसाठी महागडी औषधं वापरावी लागतात. कधी-कधी तर ही औषधं दुसऱ्या देशातून आयात करावी लागतात. ही सर्व प्रक्रिया कमालीची खर्चिक असते. त्यामुळे अनेकांना गरज असूनही योग्य उपचार मिळत नाहीत. हैदराबादमधील एका जोडप्याची अशीच अवस्था झाली होती. त्यांना आपल्या मुलीच्या उपचारांसाठी होणारा खर्च परवडणारा नव्हता. अशा वेळी त्यांना काँग्रेसचे नेते शशी थरूर आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मदत केली आहे. या दोन नेत्यांनी केलेल्या मदतीमुळे निहारिका नावाच्या मुलीच्या उपचारांसाठी आवश्यक असलेल्या कर्करोगावरील औषधांवर सात लाख रुपयांचा जीएसटी सूट मिळाली आहे. 'तेलंगणा टुडे'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
निहारिका नावाच्या मुलीला हाय-रिस्क न्यूरोब्लास्टोमा (स्टेज IV) हा दुर्मिळ कॅन्सर झालेला आहे. या मुलीच्या पालकांनी शशी थरूर यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर थरूर यांनी निर्मला सीतारामन यांना एक विनंती पत्र लिहिलं होतं. या पत्राचे फोटो थरूर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. दुमिळ कॅन्सर असलेल्या निहारिकाच्या उपचारांसाठी 65 लाख रुपयांच्या इंजेक्शनची गरज आहे.
आता दुर्मिळ आजार असलेल्यांना स्वस्तात मिळणार उपचार! केंद्र सरकारची मोठी घोषणा
थरूर यांनी पत्रात नमूद केल्याप्रमाणे, निहारिकाच्या उपचारांसाठी आवश्यक असलेल्या डिनुटक्सिमॅब बीटा किंवा करझिबा या इंजेक्शनचा प्रत्येक डोस सध्या 10 लाख रुपये प्रति व्हायल या दरानं आयात केला जात आहे. उपचारांसाठी आवश्यक असलेले पैसे उभे करण्यासाठी मुलीच्या पालकांनी आपण केलेली बचत वापरली होती. त्यानंतर त्यांनी कर्ज काही कर्जही घेतलं आणि क्राउड-फंडिंगच्या माध्यमातून पैसेही जमा केले. पण, जेव्हा त्यांनी औषध आयात केले तेव्हा त्यांना जीएसटीसाठी अतिरिक्त सात लाख रुपये द्यावे लागणार होते. ही रक्कम त्यांना परवडणारी नव्हती.
निहारिकाच्या पालकांची अडचण ऐकल्यानंतर थरूर यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून मानवतावादी आधारावर जीएसटीमधून सूट देण्याची विनंती केली.
थरूर यांनी सांगितलं की, सुरुवातीला त्यांच्या पत्राला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. हे इंजेक्शन मुंबई विमानतळावर अडकलं होतं कारण कस्टम्स विभाग जीएसटी भरल्याशिवाय ते रिलीज करण्यास तयार नव्हता. त्यानंतर थरूर यांनी निर्मला यांना फोन केला आणि त्यांना या प्रकरणाची कल्पना दिली. एक लहान बाळ अर्थमंत्र्यांच्या अधिकाराचा वापर करण्यावर अवलंबून आहे. शिवाय सध्या कस्टम विभागाच्या ताब्यात असलेलं हे औषध नाशवंत आहे. ते लवकरच कालबाह्य होऊ शकतं, याची कल्पना थरूर यांनी निर्मला यांना दिली.
थरूर यांनी पुढे सांगितलं की, निर्मला सीतारामन यांनी सहानुभूतीपूर्ण निर्णय घेतला आणि पुढील अर्ध्या तासात त्यांच्या पीएस, सेर्निया भुतिया यांनी थरूर यांच्याशी संपर्क साधला. भुतिया यांनी थरूर यांना सांगितलं की, त्यांनी अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या अध्यक्षांशी संवाद साधला आहे. यानंतर अध्यक्ष विवेक जोहरी यांनी अधिक कागदपत्रांसाठी थरूर यांच्याशी संपर्क साधला आणि मंगळवारी निहारिकाच्या औषधांवर जीएसटी सूट मिळाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle