नवी दिल्ली, 14 डिसेंबर: प्राप्तीकर विभागाकडून नोटीस (Income Tax Notice) येणं कुणालाच आवडत नाही. कर भरणाऱ्या प्रत्येकालाच असं वाटतं की अशी नोटीस येऊ नये. इन्कम टॅक्स विवरणपत्र भरतानाच तुमची मिळकत दाखवताना जराशी चूक झाली तर मोठी अडचण निर्माण होते. प्राप्तीकर विभाग तुम्हाला नोटीस पाठवू शकतो. ज्या व्यक्तीला अशी नोटीस मिळते त्या व्यक्तीला प्राप्तीकर विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटवर जाऊन नोटिशीला उत्तर देण्याची सुविधा उपलब्ध आहे.
सामान्यपणे प्राप्तीकर भरताना कर वाचवण्यासाठी लोकं अर्ज भरतानाच चुका करतात. या चुका होतात कारण त्यांच्याकडे चुकीची माहिती असते. त्यामुळे स्वत: जादा नुकसान दाखवतात. त्यामुळे जाणूनबुजून नाही पण प्राप्तीकर विभागाला चुकीची माहिती दिली जाते. अशी चुकीची माहिती दिलेल्या कर भरणाऱ्या व्यक्तीला प्राप्तीकर विभाग नोटीस पाठवू शकतो. साधारणपणे कुठल्या पद्धतीच्या नोटीस येतात हे पाहूया.
सेक्शन 139(9) अंतर्गत
सदोष रिटर्न (defective return) भरल्याबद्दल सेक्शन 139(9) अंतर्गत नोटीस पाठवली जाते. एखाद्या आयटीआरमध्ये काही माहिती दिलेलीच नसेल किंवा ITR फॉर्ममध्ये भरलेली माहिती आयटी विभागाकडील आकडेवारीपेक्षा वेगळी असेल तर त्या आयटीआर (ITR) ला सदोष ITR म्हणतात. अशा वेळी 139 (9) अंतर्गत नोटीस करदात्याला येते आणि त्याला 15 दिवसांत त्या नोटिशीचं उत्तर द्यायचं असतं. तसं केलं नाही तर आयटीआर रद्द केला जातो.
कलम 143(1) अंतर्गत
ही एक इंटिमेशन नोटीस (Intimation Notice) असते. जादा कर भरला गेला तर करदात्याला पैसे परत केले जातात त्यासाठी इंटिमेशन नोटीस पाठवतात. तसंच जर एखाद्या करदात्याने त्याला लागू होत असलेल्या करापेक्षा कमी कर भरला तर त्याला टॅक्स लाएबलिटीजसंबंधी माहिती देण्यासाठी इंटिमेशन नोटीस पाठवली जाते.
हे वाचा-PF Balance: पीएफ बॅलन्स तपासणं झालं सोपं, मिस्ड कॉल देऊनही होईल काम
सेक्शन 143(1)(a) अंतर्गत
ही पण माहिती देण्यासाठीची नोटीस असते. करदात्याचा फॉर्म 16 आणि फॉर्म 16 A मध्ये भरलेली माहिती आणि त्याचं TDS सर्टिफिकेट यामध्ये जर इन्कम किंवा सूट (exemption or deductions) याबाबत कोणताच संबंध नसल्याचं लक्षात आलं तर ही नोटीस पाठवली जाते. याचा अर्थ असा की करदात्याने आयटीआरमध्ये भलतीच माहिती दिली आहे आणि त्याचं टीडीएस सर्टिफिकेट काहीतरी वेगळीच माहिती दाखवत आहे अशा वेळी ही नोटीस येते.
सेक्शन 142(1) अंतर्गत
आयटीआर तपासणाऱ्या अधिकाऱ्याला (Assessing Officer) करदात्याकडून ITR बाबत अतिरिक्त माहिती हवी असते तेव्हा ही नोटीस पाठवली जाते. जर करदात्याने एखाद्या वर्षी आयटीआर भरला नाही तर किंवा त्या आधीच्या वर्षांच्या आधारे आयटीआर भरण्याची सूचना करण्यासाठी तपासणारा अधिकारी आयटीआर भरण्याची मागणी करण्यासाठी ही नोटीस पाठवू शकतो. कलम 142(1) अंतर्गत आलेल्या नोटिशीचं उत्तर न दिल्यास 10,000 रुपये दंड आणि कायदेशीर कारवाईही केली जाऊ शकते.
हे वाचा-राज्यात या शहरात मिळतंय सर्वात महाग पेट्रोल, मुंबई-पुण्यात दर 109 रुपयांवर
कलम 156 अंतर्गत
या कलमांतर्गत प्राप्तीकर विभाग डिमांड नोटीस पाठवतो. या नोटिशीच्या माध्यमातून दंडाची किंवा कराची मागणी केली जाते. जो करदात्यानी भरायचा असतो. ही नोटीस मिळाल्यावर तुम्ही भरण्याची आवश्यकता असलेल्या दंडाची रक्कम तुम्हाला 30 दिवसांत भरणं गरजेचं असतं.
सेक्शन 143(2) अंतर्गत
ही केवळ माहिती देणारी नोटीस नाही ही नोटीस म्हणजे स्क्रुटिनी ऑर्डर आहे. म्हणजे करदात्याची चौकशी करण्याचा तो आदेश आहे. आयटीआरमध्ये मिळकत खूपच कमी दाखवलेली असेल आणि नुकसान प्रचंड दाखवलं असेल ज्यामुळे आर्थिक घोटाळा असल्याचा संशय आला असेल अशावेळीच प्राप्तीकर विभाग ही नोटीस पाठवतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Income tax, Money