Home /News /money /

Home Loan घ्यायचंय पण CIBIL स्कोर कमी आहे? काळजी करू नका अशी करा सुधारणा

Home Loan घ्यायचंय पण CIBIL स्कोर कमी आहे? काळजी करू नका अशी करा सुधारणा

तुमचा CIBIL स्कोर कमी असल्यास तुम्हाला गृहकर्ज (Home Loan) मिळवण्यात मोठी अडचण येऊ शकते. पण हा स्कोअर फक्त एक आकडा आहे आणि त्यात सुधारणा करता येऊ शकते.

    मुंबई, 19 एप्रिल : सध्याच्या काळात घरखरेदी, मुलांचं शिक्षण, आजारपण किंवा वैयक्तिक कारणांसाठी कर्ज (Loan) घेण्याकडे कल वाढला आहे. कोणत्याही कारणासाठी बँका किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यापूर्वी तुमचा सीबील स्कोअर (CIBIL Score) तपासला जातो. तुमच्या सीबील अहवालावर हे रेटिंग अवलंबून असतं. तुमचा कर्जाशी संबंधित गोष्टींचा एकूण इतिहास या अहवालावरून स्पष्ट होतो. जेव्हा तुम्ही एखाद्या वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊ इच्छिता तेव्हा ती संस्था कर्ज देण्यापूर्वी तुमच्या पतपात्रतेची (Creditworthiness) पडताळणी करते. यासाठी सीबील स्कोअर अर्थात क्रेडिट स्कोअर कसा आहे हे प्राधान्यानं पाहिलं जातं. सर्वसाधारणपणे सीबील स्कोअर हा 300 ते 900 दरम्यान असतो. त्यात 900 हा स्कोअर सर्वोत्तम मानला जातो. 300 ते 549 हा अगदीच कमी, तर 550 ते 700 हा स्कोअर मध्यम मानला जातो. सीबील स्कोअर 750 पेक्षा कमी असेल तर तात्काळ वैयक्तिक कर्ज घेण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. अशा स्थितीत सीबील स्कोअर लवकरात लवकरात कसा वाढवायचा (Improve) असा प्रश्न तुमच्यापुढे निर्माण होऊ शकतो. सीबील स्कोअर ही खरं तर आकडेवारी आहे. त्यामुळे काही गोष्टी प्रयत्नपूर्वक केल्या तर सीबील स्कोअर वाढण्यास मदत होते. सीबील स्कोअर वाढण्यासाठी करा या गोष्टी काही वेळा तुमचा कर्ज परतफेडीचा (Debt repayment) इतिहास चांगला असतो; पण काही गोष्टींमुळे तुमचा क्रेडिट स्कोअर कमी दिसतो. तुम्ही कर्जाची रक्कम वेळेत परत केली तरी संबंधित संस्थेच्या मानवी किंवा प्रशासकीय चुकांमुळे तुमचं कर्ज कायम दिसतं. त्यामुळे अशा चुका राहू नयेत याकरिता तुम्ही परतफेड प्रक्रियेकडे लक्ष देणं आवश्यक आहे. समजा अशा काही चुका असतील आणि त्या पटकन दुरुस्त झाल्या, तर तुमचा सीबील स्कोअर लगेच सुधारू शकतो. कर्जाचा हप्ता निश्चित तारखेला भरणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा निश्चित तारखेला ईएमआय (EMI) भरला गेला नाही तर ही गोष्ट क्रेडिट स्कोअरवर परिणाम करते. तसंच त्यासाठी तुम्हाला दंडदेखील भरावा लागतो. त्यामुळे यासाठी रिमाइंडर सेट करणं आवश्यक आहे. वेळच्या वेळी ईएमआय भरला तर सीबील स्कोअर निश्चितच वाढण्यास मदत होते. इन्शुरन्स संबंधित समस्या असल्यास तक्रार कुठे आणि कशी कराल? वाचा संपूर्ण प्रक्रिया जर तुम्ही क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरत असाल तर त्याची बिलं मुदतीत भरणं गरजेचं आहे. यामुळे तुमची क्रेडिट हिस्ट्री अधिक बळकट होते. तसंच भविष्यात तुमचा सीबील स्कोअरही चांगला राहतो. क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज यासारखी असुरक्षित कर्ज आणि वाहन कर्ज, गृह कर्जासारख्या सुरक्षित कर्जाचं मिश्रण चांगलं असतं. जास्त सुरक्षित कर्ज असलेल्या व्यक्तीला वित्तीय संस्था कर्जासाठी प्राधान्य देतात. तसंच ब्युरो त्यांना चांगलं रेटिंग देतात. तुमच्याकडे सुरक्षित कर्जांच्या तुलनेत असुरक्षित कर्जांची संख्या जास्त असेल तर हे मिश्रण हेल्दी ठेवण्यासाठी तातडीनं असुरक्षित कर्ज फेडावं. जॉइंट अकाउंट होल्डर (Joint Account Holder) किंवा एखाद्या व्यक्तीला कर्जासाठी जामीनदार राहणं टाळा. समोरची व्यक्ती डिफॉल्ट झाल्यास त्याचा परिणाम तुमच्या सीबील स्कोअरवर होण्याची शक्यता असते. तुम्हाला आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक किंवा एसबीआय आदी आघाडीच्या बँकांकडून मुदत ठेवीवर सुरक्षित कार्ड मिळाल्यास आणि देय तारखेला शिल्लक परतफेड केल्यास तुमच्या सीबील स्कोअरमध्ये वाढ होईल. एकाच वेळी अनेक प्रकारची कर्जं घेणं टाळा. तुमच्याकडे कर्ज जास्त आणि फंड कमी अशी स्थिती निर्माण झाली तर अडचणी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे एका वेळी एकच कर्ज घ्या, ते मुदतीत परतफेड करा. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) निश्चित वाढेल. Bank Time: आजपासून बँकांच्या कामकाजाच्या वेळेत बदल, ग्राहकांना होईल फायदा नेहमी दीर्घ मुदतीचं कर्ज (Long Term Loan) घ्या. या कर्जावर ईएमआय कमी असतो आणि त्यामुळे परतफेड वेळेत होऊ शकते. तसंच तुम्ही स्वतःला डिफॉल्टर्सच्या लिस्टपासून दूर ठेवू शकता आणि तुमचा स्कोअरदेखील सुधारतो. तुम्ही तुमचा क्रेडिट रिपोर्ट वेळोवेळी तपासला पाहिजे. त्यात काही विसंगती किंवा त्रुटी नाहीत हे पाहिलं पाहिजे. आज अनेक कंपन्या क्रेडिट रिपोर्ट ऑनलाइन तपासण्याची सुविधा उपलब्ध करुन देत आहेत. या माध्यमातून तुम्ही हा रिपोर्ट पाहू शकता. तुम्हाला तुमच्या बँकेनं कार्डवर क्रेडिटची मर्यादा वाढवायला सांगितली किंवा तुम्ही बँकेकडं क्रेडिट वाढवण्याची मागणी करण्याबाबत विचार करत असाल तर तो योग्य आहे. कारण तुमच्या स्कोअरवर सकारात्मक प्रभाव पडण्यासाठी जास्त क्रेडिट मिळवणं आणि त्याचा वापर कमी ठेवणं ही सोपी युक्ती आहे. क्रेडिट स्कोअरमध्ये एका रात्रीत सुधारणा होणं शक्य नाही. क्रेडिट रिपोर्ट दुरुस्त करण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असते. त्यामुळे तुम्ही तुमचा क्रेडिट रिपोर्ट, वेगवेगळ्या क्रेडिट लाइन्स, खर्चाचं स्वरूप आणि कर्ज वेळेवर भरतोय ना या गोष्टींकडे लक्ष द्या. यामुळे कालांतराने तुमचा क्रेडिट स्कोअर वाढण्यास आणि क्रेडिट योग्यता सुधारण्यास मदत होईल. सीबील स्कोअर वाढवणं हे एक कठीण काम आहे. परंतु, शिस्त आणि नियोजनातून ते साध्य होऊ शकतं.
    First published:

    Tags: Home Loan

    पुढील बातम्या