नवी दिल्ली, 15 डिसेंबर : पूर्वी स्टेटस सिम्बॉल (Status Symbol) म्हणून वापरली जाणारी कार (Car) सध्याच्या काळात शहरी किंवा ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी गरज बनली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गाड्यांची विक्री झाली आहे. आता लाखो रुपयांची कार वापरायची म्हटलं की त्यासोबत इन्शुरन्स हा आलाच. कारचा इन्शुरन्स (car insurance) काढून घेणं ही अतिशय चांगली आणि गरजेची बाब आहे. मात्र, अनेकांना दरवर्षी कार इन्शुरन्स काढणं हे एक प्रकारचं ओझं वाटतं. काही ठराविक गोष्टींची काळजी घेऊन स्वस्तात कार इन्शुरन्स खरेदी (how to get cheap car insurance) करून अतिरिक्त ओझं टाळता येतं, हे अनेकांना माहिती नाही.
मोटार इन्शुरन्स पॉलिसीचे असतात दोन महत्त्वाचे भाग -
थर्ड-पार्टी लाएबिलिटी (Third-party liability) आणि डॅमेज कव्हर (Damage cover) असे मोटार इन्शुरन्स पॉलिसीचे (Motor Insurance Policy) दोन भाग असतात. थर्ड-पार्टी लाएबिलिटीमध्ये दुस-याच्या वाहनाला झालेल्या नुकसानीसाठी कव्हर मिळतं. हे घेणं बंधनकारकच आहे. ऑन-डॅमेज कव्हरमध्ये तुमच्या वाहनाला संरक्षण मिळतं. ही एक पर्यायी सुविधा आहे पण, बहुतेक लोक ती घेतात.
कार इन्शुरन्सचे प्रीमियम कशा प्रकारे कमी करता येतात?
विविध कंपन्यांच्या इन्शुरन्स पॉलीसींची तुलना करा -
नवीन किंवा वापरलेली कार खरेदी करण्यापूर्वी, इन्शुरन्सचा खर्च माहिती करून घ्यावा. गाडीची किंमत, दुरुस्तीचा खर्च, सेफ्टी रेकॉर्ड्स आणि कार चोरीची शक्यता लक्षात घेऊन कार इन्शुरन्सचा प्रीमियम (Car Insurance Premium) ठरवला जातो. अनेक इन्शुरन्स कंपन्या यामध्ये सूट देतात. त्यामुळे तुमचा प्रीमियम काहीसा कमी होऊ शकतो. म्हणून एकाच कंपनीचा इन्शुरन्स घेण्यापूर्वी अनेक कंपन्यांच्या कार इन्शुरन्स पॉलिसींची तुलना करावी.
इन्शुरन्स पॉलिसी वेळेवर रिन्यू करा -
सध्याच्या कार इन्शुरन्स पॉलिसीची मुदत संपल्यानंतर रिन्यू प्रक्रिया सुरू झाल्यावर बहुतेक कंपन्या अगोदर तुमच्या कारची पाहणी करतात. यासाठी प्रत्येक कंपनी वेगवेगळे शुल्क आकारते. यात वेळ आणि पैसा दोन्हीही खर्च होतो. त्यामुळे कार इन्शुरन्स पॉलिसी रिन्यू (Car insurance renewal) करण्याची प्रक्रिया आधीच्या पॉलिसीची मुदत संपण्यापूर्वी सुरू करावी. जेणेकरून सर्व्हेचा त्रास टळेल आणि त्यावरील शुल्कात नक्की बचत होईल.
नो क्लेम बोनसच्या (NCB) मदतीने कार इन्शुरन्स प्रीमियम कमी होतो. इन्शुरन्स रिन्यू करताना, आपल्या कारची इन्शुरन्स व्हॅल्यू किंवा इन्शुअर्ड डिक्लेयर्ड व्हॅल्यू (IDV) तपासली पाहिजे. प्रीमियम कमी करण्यासाठी हा एक अतिशय महत्त्वाचा पॅरामीटर आहे. आयडीव्हीच्या मदतीने इन्शुरन्स काढताना, तुम्हाला तुमच्या कारची रीसेल व्हॅल्यूदेखील समजते.
नो क्लेम बोनसमुळे प्रीमियम होतो कमी -
कार इन्शुरन्स एका वर्षासाठी असतो. त्यानंतर तो रिन्यू करावा लागतो. तुम्हाला दीर्घ मुदतीसाठी प्रीमियम भरावा लागतो कव्हरेज मात्र, वार्षिक आधारावर असतं. इन्शुरन्स कालावधीतील कोणत्याही एका वर्षात कोणताही क्लेम केलेला नसेल, तर तुम्ही त्या वर्षासाठी नो क्लेम बोनस (No claim bonus) घेऊ शकता. प्रीमियमच्या 20 ते 50 टक्क्यांपर्यंत नो क्लेम बोनस असू शकतो.
जुन्या कारचा एनसीबी नवीन कारमध्ये होतो ट्रान्सफर -
जर वर्षभरात तुम्ही कोणताही क्लेम केला नाही तर तुमच्याकडे नो-क्लेम बोनस शिल्लक असतो. नवीन कार खरेदी करताना तुम्ही हा बोनस ट्रान्सफर करू शकता. याशिवाय तुम्ही काळजीपूर्वक गाडी चालवल्यास रस्त्यावरील अपघात टळतील (Road Accidents) आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन (Traffic Rules) होणार नाही. परिणामी तुमचा इन्शुरन्स प्रीमियम कमी होण्यास मदत होईल.
अँटी-थेफ्ट डिव्हाईस लावल्यास प्रीमियम होतो कमी -
सेंट्रल लॉकिंग सिस्टीम किंवा अलार्मसारखे अँटी-थेफ्ट डिव्हाईस (Anti-theft device) इंस्टॉल केल्यास, इन्शुरन्स कंपनी तुम्हाला मोटार इन्शुरन्स पॉलिसीच्या ऑन-डॅमेज प्रीमियमवर 2.5 टक्क्यांपर्यंत सूट देऊ शकते. जास्तीत जास्त 500 रुपयांपर्यंत ही सूट असू शकते. याशिवाय जर तुम्ही ऑटोमोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया (AAI) किंवा वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनसारख्या संस्थेचे सदस्य असाल तर तुम्ही इन्शुरन्स कंपन्यांकडून प्रीमियममध्ये 5 टक्के (जास्तीत जास्त 200 रुपयांपर्यंत) सूट मिळवू शकता.
काही लहान-मोठ्या गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही सहजपणे कार इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमियम कमी करू शकता. यामुळे तुम्हाला त्याचा आर्थिक बोजाही वाटणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.