नवी दिल्ली, 04 डिसेंबर : गुंतवणुकीबाबत (Investment) जागरूक झालेले लोक आता सर्रास म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक करण्याकडे वळत आहेत. कालावधी, अपेक्षा, गरज अशा निकषांवर आधारित हरप्रकारचे फंड बाजारात उपलब्ध असल्याने संपत्तीत (Wealth) वाढ करण्याचा हा मार्ग अगदी सहजसाध्य झाला आहे. मात्र यात काही प्रमाणात जोखीम असल्याने अनेक गुंतवणूकदार यात नेमकी किती रक्कम गुंतवावी याबाबत साशंक असतात? तर परतावा अधिक म्हणजे यात मोठी रक्कम गुंतवावी लागत असणार असाही अनेकांचा समज असतो. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज जाणून घेऊ या...
म्युच्युअल फंड हा घसघशीत फायदा देणारा आणि सुरक्षित पर्याय असल्याबाबत आता शिक्कामोर्तब झालं आहे. त्याचप्रमाणे आपल्या अपेक्षेप्रमाणे योजना निवडीचा वाव असल्यानं आणि परताव्यातील (Return) जोखीम कमी करण्याचीही संधी असते. तसेच फंड कंपन्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक सोयीस्कर पद्धत उपलब्ध करून देतात. एका प्रकारच्या फंडातून दुसऱ्या प्रकारच्या फंडात पैसे वळवण्याचीही लवचिकता यात मिळते. त्यामुळे आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात अगदी कमी वेळेत आणि विनाकटकट ही गुंतवणूक करता येते. या सगळ्या अनुकूल बाबींमुळे मुच्युअल फंड हा पसंतीचा गुंतवणूक पर्याय ठरत असला तरी प्रथमच यात गुंतवणूक करणाऱ्या किंवा अल्प उत्पन्न असलेल्या लोकांच्या मनात यातील गुंतवणुकीच्या रकमेबाबत गैरसमज असतात. शेअर बाजाराशी निगडीत आणि मोठमोठ्या कंपन्यांच्या या योजना असल्यानं यात मोठी गुंतवणूक करावी लागत असणार, असा अनेकांचा समज असतो. तसेच नेमकी किती रक्कम आपण म्युच्युअल फंडात गुंतवावी असाही प्रश्न अनेकांना पडतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या रकमेचीच गरज असते असे नाही. दरमहा अगदी 500 रुपयांपासून तर काही योजनांमध्ये अगदी 100 रुपयांपासून गुंतवणूक करता येते.
किमान एका योजनेत दरमहा 500 रुपयांची गुंतवणूक केल्यास वर्षाला 6 हजार रुपये गुंतवले जातात. तुम्ही कोणत्या योजनेत गुंतवणूक करत आहात, तुम्ही तुमच्या वयाच्या कोणत्या वर्षी गुंतवणूक सुरू केली आहे आणि किती वर्षे करणार आहात, यावर त्याचा परतावा अवलंबून असतो. तुम्हाला किती वर्षांनंतर, किती रक्कम हवी आहे, यावर गुंतवणूकीची रक्कम निश्चित केली जाते. त्यामुळे म्युच्युअल फंडात ठराविक इतकी रक्कम गुंतवणं योग्य असा काही मापदंड ठरलेला नाही. तुमच्या आर्थिक उद्दिष्टानुसार तुम्हाला शक्य तितकी रक्कम तुम्ही गुंतवू शकता. म्युच्युअल फंड कंपन्यांची याबाबतीत कोणतीही कमाल मर्यादा नसते.
आपलं उत्पन्न (Income), खर्च (Expenses), गुंतवणूकीचे अन्य पर्याय, त्यातील गुंतवणूक आणि तुम्हाला हवी असलेली रक्कम अशा सर्व बाबींचा विचार करून गुंतवणूकीची रक्कम निश्चित करा. प्रत्येक गुंतवणूकदार या सगळ्या गोष्टींचा विचार करून हातात शिल्लक राहणाऱ्या रकमेतून दरमहा किती गुंतवणूक करायची आहे याची किमान आणि कमाल रक्कम ठरवू शकतो. आपल्या उत्पन्नाच्या साधारण 20 टक्के रक्कम गुंतवावी, असा एक सर्वसाधारण नियम आहे. नवीन सुरुवात असेल तर म्युच्युअल फंडात यापैकी अगदी कमी गुंतवणूक करता येते आणि हळूहळू वाढवता येते.
हे वाचा - Green Peas: तुम्ही मटार भरपूर खाता ना? मग या गोष्टीही तुम्हाला माहीत असाव्यात
गुंतवणूक करताना त्यात वैविध्य (Diversification)असावे हा प्राथमिक नियम आहे. ही विविधता म्युच्युअल फंडात आपोआप मिळते. त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या वेगवेगळ्या गुंतवणूकीवर होणारा खर्च, वेळ वाचतो. म्युच्युअल फंडातच कमी जोखमीच्या, जास्त जोखमीच्या अशा विविध योजना असतात त्यामुळे आपण आपली जोखीम घेण्याची क्षमता ठरवून त्यानुसार आपल्याकडील शिल्लक रकमेची विभागणी करू शकतो. उदाहरणार्थ, दरमहा तुमच्याकडे पाच हजार रुपये शिल्लक रहात असतील आणि तुम्हाला जोखीम अजिबात नको आहे, परतावा कमी असला तरी चालणार आहे आणि तुम्हाला दीर्घकाळासाठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही पाच वेगवेगळ्या हायब्रीड फंडांची निवड करून त्यात दरमहा प्रत्येकी एक हजार रुपये गुंतवू शकता. यात इक्विटी फंड आणि डेट फंडाचे हे मिश्रण असते. सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी गोल्ड फंडांचाही पर्याय आहे.
हे वाचा - SBI Green Car Loan: इलेक्ट्रिक वाहनांसाठी एसबीआयकडून स्वस्त दरात कर्ज
आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी म्युच्युअल फंडात लवकर गुंतवणूक सुरू (Start Early) करणं महत्त्वाचं असतं. यामुळे कमीत कमी रक्कम (Minimum Amount) गुंतवूनही मोठी रक्कम निर्माण करता येते. नव्याने नोकरीला लागलेल्या तरुण मुला-मुलींकडे शिल्लक कमी असते, अशावेळी वेगवेगळ्या फंडांमध्ये दरमहा 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. या गुंतवणूकीत नियमितपणा असणे गरजेचे असते. कारण मध्येच गुंतवणूक थांबवली तर त्यातून मोठा तोटा होण्याची शक्यता असते. तसेच ही गुंतवणूक दीर्घकाळ करणेही अत्यावश्यक असते. म्युच्युअल फंडाचा कालावधी जितका दीर्घ तितका फायदा होण्याचे प्रमाण वाढते. अर्थात एक दिवस मुदतीचे ओव्हर नाईट डेट फंडही (Debt Fund)असतात. किमान तीन वर्षे गुंतवणूक करणे लाभदायी ठरते. बहुतांश फंडांचा लॉक इन कालावधी तीन वर्षांचा असतो. ठराविक कालावधीनंतर नियमितपणे आपल्या गुंतवणूकीचा आढावा घेणं गरजेचं असते. त्यानुसार त्यात बदल करणेही फायद्याचे ठरते.
थोडक्यात काय, तर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना अगदी दरमहा 500 रुपयांपासून सुरुवात करायला हरकत नाही, मात्र ती जितक्या लवकर सुरू करता येईल तितकी लवकर सुरू करा. त्यात नियमितपणा ठेवा आणि गुंतवणूक दीर्घकाळ करा. तुमचे मोठी संपत्ती निर्माण करण्याचे उद्दिष्ट नक्कीच साध्य होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business News, Mutual Funds