मुंबई, 4 फेब्रुवारी: आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. प्रत्येकजण हे स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी जीव तोडून मेहनत करतो. व्यवसाय किंवा पगारातून मिळालेल्या पैशातून काही पैशाची बचत करून त्यातून आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण कसं करता येईल यासाठी प्रयत्नशील असतो. म्हणून घर घेण्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करणं आवश्यक असतं. सध्या घर आणि जमिनींच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत प्रॉपर्टी खरेदी करताना विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही घर घेताना विशेष खबरदारी घेतली नाही तर तुम्ही मोठ्या अडचणीत येऊ शकता. ही अडचण आर्थिक किंवा कायदेशीरही असू शकते. घर घेताना तुम्ही गुंतवणूक म्हणून घेताय की राहण्यासाठी घेताय हेही पाहणं महत्त्वाचं आहे. आज आपण घर घेताना काय काळजी घ्यायला हवी, हे पाहणार आहोत.
बिल्डर:
फ्लॅट खरेदी करतेवेळी बिल्डर किंवा रियल इस्टेट डेव्हलपरविषयी नीट माहिती मिळवणं आवश्यक आहे. कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करतेवेळी ही महत्त्वाची गोष्ट असते. त्यामुळं फ्लॅट खरेदी करतेवेळी नेहमी प्रतिष्ठीत बिल्डरकडून घेण्याचा विचार करावा. बिल्डरचं ट्रॅक रेकॉर्ड नक्की चेक करावं.
प्रॉपर्टीची जागा:
तुम्ही जेव्हा जेव्हा कोणतीही जमीन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करता, तेव्हा ती कोणत्या ठिकाणी आहे याचा विचार करा. या ठिकाणाचा प्रॉपर्टीच्या भावावर मोठा परिणाम होतो. जर तुम्ही गुंतवणूकीच्या उद्देशानं प्रॉपर्टी खरेदी करत असाल तर अशाच ठिकाणी गुंतवणूक करा ज्यांचा विकास सुरु आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला भविष्यात चांगला मोबदला मिळेल अशाच प्रॉपर्टी खरेदी कराव्यात.
रेरामध्ये रजिस्ट्रेशन महत्त्वाचं:
घर खरेदी करतेवेळी बिल्डर रेरा अर्थात रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथोरिटीमध्ये नोंदणीकृत आहे की नाही हे आवश्य तपासा. जर तो रेरामध्ये रजिस्टर नसेल तर अशा बिल्डरकडून घर खरेदी करणं टाळा. नाहीतर तुम्हाला भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
पब्लिक ट्रान्सपोर्ट:
घर खरेदी करताना ज्या भागात ते आहे, तिथं पब्लिक ट्रान्सपोर्ट किती दूर आहे, हे नक्की पाहावं. रेल्वे, बस, ऑटो, मेट्रो अशा सार्वजनिक वाहनांची कनेक्टिव्हिटी नसेल तर गुंतवणूक टाळावी.
सुविधा:
घर किंवा जमीन खरेदी करतेवेळी काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष देणं महत्त्वाचं आहे. प्रॉपर्टीच्या भागात शाळा, हॉस्पिटल, शॉपिंग कॉम्लेक्स किती दूर आहेत याचा विचार करावा. तरच तुम्हाला भविष्यात चांगली किंमत मिळू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Home Loan