नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : गुरुवारी सकाळी 11 वाजता (27th August 2020) जीएसटी काऊंसिल (GST Council)ची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये जीएसटी कंपेनसेशनवर (GST Compensation) चर्चा होणार आहे. दरम्यान या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) दुपारी 1 वाजता एक पत्रकार परिषद घेणार आहेत. केंद्र आणि राज्यांमध्ये जीएसटी कंपेनसेशनबाबत वाद सुरू आहेत. जीएसटी कायद्याअंतर्गत, 1 जुलै, 2017 पासून जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्या पाच वर्षात राज्यातील महसुलातील तोटा भरुन काढण्याची हमी दिलेली आहे. परंतु महसूल वाटपाच्या सध्याच्या सूत्रानुसार केंद्र सरकार राज्यांच्या जीएसटीचा हिस्सा देण्यास सक्षम नाही आहे.
महाग होऊ शकतात वस्तू
सीएनबीसी-टीव्ही 18 च्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही राज्ये जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत सिन गुड्सवरील उपकर वाढविण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्याची शक्यता आहे. सिन गुड्सवर सेस वाढवण्याची सूचना देणाऱ्या राज्यांमध्ये पंजाब, छत्तीसगड, बिहार, गोवा, दिल्ली ही राज्ये आहेत. असे झाल्यास सिगारेट, पान मसाला महाग होईल.
सध्याच्या जीएसटी रेट रचनेनुसार सिन गुड्स जसे की सिगारेट, पान मसाला आणि एरेटेड ड्रिंक्स या वस्तूंवर सेस आकारला जातो. सिन गुड्स व्यतिरिक्त कारसारख्या लक्झरी उत्पादनांवरही सेस लावला जातो.
(हे वाचा-या 23 धोकादायक अॅप्समुळे होतेय युजर्सचे खाते रिकामे, मोबाइलमधून करा डिलीट)
गेल्या महिन्यात अर्थ मंत्रालयाकडून असे सांगण्यात आले होते की, केंद्र सरकारने 2019-20 या आर्थिक वर्षाच्या जीएसटी भरपाईसाठी13,806 कोटी रुपयांचा शेवटचा हप्ता जाहीर केला आहे. राज्यांना नुकसान भरपाई देण्याच्या सूत्रावर काम करण्यासाठी जीएसटी परिषद जुलैमध्ये बैठक घेणार होती. तथापि, अद्याप ही बैठक झाली नाही. जीएसटी कायदा 2017 मध्ये दुरुस्ती करण्याबाबत चर्चा सुरू आहे.
जुलैमध्ये एवढे होते जीएसटी कलेक्शन
जुलै महिन्यात एकूण जीएसटी संकलन 87,422 कोटी रुपये होते. तर, जून 2020 मध्ये एकूण जीएसटी संकलन 90,917 कोटी रुपये होते. जुलैमधील 87,422 कोटी रुपये जीएसटी कलेक्शनमध्ये केंद्रीय जीएसटी (CGST) म्हणून 16,147 कोटी, राज्य जीएसटी (SGST) म्हणून 21,418 कोटी आणि आयजीएसटी म्हणून 42,592 कोटी रुपये समाविष्ट आहेत. अर्थ मंत्रालयाने सांगितले की, आयजीएसटीपैकी 20,324 कोटी रुपये माल आयातीद्वारे आणि 7,265 कोटी रुपये सेसद्वारे प्राप्त झाले आहेत.