कोरोनाची दुसऱ्या लाटेचा कहर; 'गोल्डमन सॅश'ने भारताच्या विकासदराच्या अंदाजात केली घट

कोरोनाची दुसऱ्या लाटेचा कहर; 'गोल्डमन सॅश'ने भारताच्या विकासदराच्या अंदाजात केली घट

सध्या भारतात कोरोना संसर्गाची दुसरी लाट अनेक राज्यांत दिसत असून, ठिकठिकाणी लॉकडाउन (Lockdown), संचारबंदी किंवा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 एप्रिल: गेल्यावर्षीपासून जगभर थैमान घातलेल्या कोरोनामुळे सगळ्याच देशांच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं (Financial Crisis) मोडलं आहे. विकसित देशांनाही फटका बसला आहे; मात्र भारतासारख्या विकसनशील देशांना बसलेला फटका मात्र खूप मोठा आहे. तरीही काही महिन्यांपूर्वी कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचं प्रमाण घटल्यावर भारतीय अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येण्याच्या दिशेने वाटचाल करत होती. मात्र आता पुन्हा एकदा कोरोना संसर्गानं डोकं वर काढल्याने (Corona Second Wave) मंदीचं सावट आहे. भारताच्या विकास दरावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विपरीत परिणाम होईल, असा अंदाज गोल्डमन सॅश(Goldman Sachs)या वॉल स्ट्रीटच्या ब्रोकरेज कंपनीने वर्तवला आहे.

2021-22मध्ये भारताचा विकासदर10.9 टक्के असेल असा अंदाज गोल्डमन सॅशने यापूर्वी वर्तवला होता. आता मात्र सुधारित अंदाज संस्थेने जाहीर केला असून, त्यानुसार 2021-22 मध्ये भारताचा विकासदर 10.5 टक्के असेल, असं संस्थेने म्हटलं आहे. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

सध्या भारतात कोरोना संसर्गाची दुसरी लाट अनेक राज्यांत दिसत असून, ठिकठिकाणी लॉकडाउन (Lockdown), संचारबंदी किंवा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम उद्योग-व्यवसायांवर होणं साहजिक आहे. या पार्श्वभूमीवर सुनील कौल यांच्या नेतृत्वाखाली गोल्डमन सॅशच्या अर्थतज्ज्ञांनी एक विस्तृत निवेदन जारी केलं आहे. अनेक प्रमुख राज्यांनी कडक लॉकडाउन लागू केल्यामुळे आर्थिक स्थितीबद्दलची चिंता निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था आणि उत्पन्नात सुधारणाहोण्याबद्दल गुंतवणूकदारांना शंका आहे.

वाचा: कोरोनाचा उद्रेक, आयआयटी मुंबईतील 20 विद्यार्थ्याना कोरोना

2021मध्ये उत्पन्नात वाढ होण्याचा दर 27 टक्के असेल, असा अंदाज गोल्डमन सॅशने आधी वर्तवला होता. आता तो घटवून 24 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. लसीकरणाच्या प्रमाणात वाढ झाल्यावर, तसंच निर्बंध शिथिल झाल्यानंतर साधारण जुलैपासून अर्थव्यवस्थेवर  सकारात्मक परिणाम दिसू लागतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सध्याच्या परिस्थितीमुळे शेअर बाजारातही (Share Market)संकटकाळ आला आहे. निफ्टीमध्ये सोमवारी (12एप्रिल) 3.5टक्क्यांनी नुकसान झालं. जून तिमाहीच्या विकासदरात घट होण्याचा अंदाज गोल्डमन सॅशने वर्तवला आहे; मात्र त्याचा आकडा दिलेला नाही. या सगळ्या गोष्टींचा एकंदर परिणाम कमी असेल; कारण निर्बंध सगळ्या क्षेत्रांवर लादण्यात आलेले नाही, असा दिलासाही या निवेदनात देण्यात आला आहे.

मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसेसने (Moody's Investor Services) 13 एप्रिल रोजी सांगितलं, की भारतात आलेल्या कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे विकासदराच्या 13.7 टक्के या अनुमानावर परिणाम होणार आहे. कारण एकंदर आर्थिक व्यवहारांवर सद्यस्थितीचा परिणाम होणार आहे. दुसरी लाट रोखण्यासाठी एप्रिल अखेरीपर्यंत योजण्यात आलेल्या उपायांचा आर्थिक वाढीवर परिणाम होईल. परंतु, कोरोना रोखण्यासाठीचे उपाय आणि लसीकरणात वृद्धी झाल्यानंतर या परिस्थितीत सुधारणा होऊ शकेल, असा अंदाजवर्तवण्यात आला आहे.

First published: April 14, 2021, 6:09 PM IST
Tags:

ताज्या बातम्या