नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : सप्टेंबर महिन्यात विक्रमी स्तरावरून सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात खाली उतरले आहेत. मात्र पुन्हा एकदा ऑक्टोबरमध्ये सोन्याच्या दराचा ग्राफ वाढता आहे. शुक्रवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव (Gold Rates) वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तेजीनंतर देशांतर्गत बाजारात देखील सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्या व्यतिरिक्त चांदीमध्ये देखील वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे देशांतर्गत वायदे बाजार मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX - Multi-Commodity Exchange) वर देखील सोन्याचांदीचे दर वाढले आहेत.
MCX वर वाढले सोन्याचे दर
गोल्ड फ्यूचरची एमसीएक्सवर किंमत वाढली आहे. याठिकाणी सोन्याच्या दरात 650 रुपयांनी किंवा 1.3 टक्क्यांनी वाढ होत दर 50,817 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. त्याचप्रमाणे चांदीच्या किंमती देखील वाढल्या आहेत. MCX वर चांदीचे भाव 4 टक्के किंवा 2500 रुपयांनी वाढून 62,955 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. डॉलरमध्ये आलेली कमजोरी आणि अमेरिकन आर्थिक पॅकेजबाबत अनिश्चितता यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत
शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचांदीचे दर वधारले आहेत. बाजार बंद होताना सोने आणि चांदी या मौल्यवान धातुंची किंमत अनुक्रमे 1,910 डॉलर प्रति औंस आणि 24.27 डॉलर प्रति औंस होती.
देशांतर्गत बाजारातील सोन्याचे दर (Gold Price, 9th October 2020)
दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी 236 रुपये प्रति तोळाने सोन्याचे दर वाढले आहेत. यानंतर सोन्याचे दर 51,558 रुपये प्रति तोळा झाले आहेत. गुरुवारी सोन्याचे दर 51,322 रुपये झाले होते.
देशांतर्गत बाजारातील चांदीचे दर (Silver Price, 9th October 2020)
शुक्रवारी चांदीच्या किंमतीत देखील तेजी पाहायला मिळाली. चांदीचे दर प्रति किलो 376 रुपयांनी वाढून 62,775 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचले आहेत. गुरुवारी चांदीचे दर 62,399 रुपये प्रति किलोग्राम वर होते.
का वाढत आहेत सोन्याचांदीचे दर?
एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनिअर अनलिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते शुक्रवारी दिल्लीत सोन्याची स्पॉट प्राइज 236 रुपयांनी वाढली. डॉलरमध्ये आलेली कमजोरी, अमेरिकेतील आर्थिक पॅकेजबाबत अनिश्चितता त्याचप्रमाणे अमेरिकन अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता यामुळे सोन्याचे दर वाढले आहेत. तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात देखील तेजी आली आहे.