नवी दिल्ली, 17 जानेवारी: कोरोना साथीच्या रोगादरम्यान लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे प्रत्येक क्षेत्रात मंदी होती. पण अशावेळी सोन्या-चांदीचे भाव दररोज आकाशाला भिडत होते. लॉकडाऊन उठवल्यानंतर अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असतानाही लोक सोन्याला सर्वात सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय मानत होते. ऑगस्टमध्ये सोन्याचांदीच्या किंमतींनी उच्चांक पातळी गाठली होती. यानंतर परिस्थिती आणखी सुधारल्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवणूकीचे इतर पर्यायही शोधण्यास सुरुवात केली.
याच पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूच्या लशीबाबत चांगली बातमी देखील आली. यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतींमध्ये वाढ झाली. ऑगस्ट 2020 पासून सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 7,000 रुपयांनी कमी झाले आहेत. तर चांदीचे दरही प्रतिकिलो 12,500 रुपयांनी कमी झाले आहेत. कोरोना संकटाच्या दरम्यान ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या दराने 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. याच कालावधीत चांदीने 77,840 रुपये प्रति किलोची उच्चांकी पातळी गाठली होती. शुक्रवारी 15 जानेवारी 2021 रोजी सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 48,690 रुपयांच्या पातळीवर पोहोचली. त्याचदिवशी चांदीचा दर प्रतिकिलो 65,157 रुपयांवर आला होता. गेल्या काही वर्षांपासून सोन्याच्या दराने मोठ मोठ्या इमारती चढल्या आहेत. मागील वर्षी म्हणजेच 2020 मध्ये सोन्याच्या दरात 28 टक्क्यांची वाढ झाली होती.
2021 मध्ये सोनं 60,000 रुपयांचा टप्पा पार करू शकतं
मागील वर्षांच्या तुलनेत यावर्षी सोन्याच्या दरात वाढ होणे अपेक्षित आहे. असं मानलं जातं आहे की, यावर्षी सोनं प्रति 10 ग्रॅम 60,000 रुपयांची पातळी ओलांडू शकतं. दुसर्या शब्दांत सांगायचं झालं तर, 50,000 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर सोन्यात गुंतवणूक करणं फायदेशीर ठरू शकतं. पण तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की, 2020 मध्ये कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या अनिश्चित आर्थिक वातावरणामुळे लोकांनी सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. त्यामुळे सोन्याच्या किमतीने उच्चांकी पातळी गाठली होती. पण सध्या कोरोना लशीच्या आगमनामुळे इतर आर्थिक हालचाली वाढल्या आहेत, त्यामुळे सोन्याच्या किंमतीतील घट नोंदवली जाऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.