नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : सोन्याच्या किंमतीत (Gold Prices) पुन्हा एकदा घसरण झाली आहे. एमसीएक्सवरील डिसेंबर महिन्यातील वायदा बाजारात सोन्याचे दर 0.5 टक्क्यांनी घसरून 50,386 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. मागील सत्रात सोन्याच्या भावात एक टक्क्याने वाढ झाली होती, म्हणजे जवळपास 500 रुपये वाढ होती. तर चांदी प्रति किलो किलो 1,900 ने महागली. 7 ऑगस्ट रोजी 56,200 रुपयांची विक्रमी उच्चांकी गाठल्यानंतर सोन्यामध्ये बरेच चढ-उतार झाले. या आठवड्याच्या सुरूवातीला सोने 50 हजारांखाली आले होते.
जागतिक बाजारपेठेत आज सोन्याच्या किंमती घसरण दिसून आली. स्पॉट गोल्डमध्ये सोन्याचे दर 0.1 टक्क्याने घसरून ते 1,896.03 डॉलर प्रति औंस झाले आहेत. तर, चांदी 0.2 टक्क्यांनी वधारली आहे.
गेल्या महिन्यात 6800 रुपयांपर्यंत स्वस्त झालं सोनं
गेल्या महिन्यात 7 ऑगस्ट रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी दहा ग्रॅमची किंमत 56 हजार 200 रुपये होती. त्याचबरोबर, गेल्या आठवड्यात शुक्रवारपर्यंत सोन्यानेही प्रति 10 ग्रॅम किमान 49,380 रुपये पातळी गाठली. म्हणजेच तेव्हापासून सोन्याच्या किंमती जवळपास 6,820 रुपयांनी खाली आल्या होत्या. सोन्याची खरेदी करण्यासाठी हा काळ जरी चांगला असला तरी सराफा बाजारात मागणी कमी असल्याने मोठ्या प्रमाणात सूट दिल्यानंतरही लोक पूर्वीप्रमाणे सोन्याकडे आकर्षित होत नाहीत.
सणासुदीच्या हंगामात सोन्याची विक्री कमी होईल का?
तज्ञांचे मत आहे की ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान सोन्याची मागणी साधारणपणे वाढते. सणासुदीच्या काळ हे त्याचे प्रमुख कारण आहे. दिवाळी जवळ आली की सोन्याच्या किंमतीत वाढ होते, मात्र कोरोनामुळे यावेळी लोक आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत, त्याचा थेट परिणाम सोन्याच्या मागणीवर होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.