Home /News /money /

सरकारने सोन्यावरील आयात शुल्क वाढवलं; आता एका तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके हजार जास्त

सरकारने सोन्यावरील आयात शुल्क वाढवलं; आता एका तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके हजार जास्त

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

आता सोन्यावर नवीन कस्टम ड्युटी लागू केल्यामुळे भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅम 2 हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे, असं उद्योगतज्ज्ञांनी सांगितलं.

मुंबई 02 जुलै : सोन्याच्या दरात चढउतार होत असतात. गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यानंतर रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम सोन्याच्या आयातीवर झाल्याने दरवाढ झाली होती. सोन्याचे वाढते दर थोडे कमी होतील, अशी अपेक्षा असताना आता सरकारने सोन्याच्या आयातीवरील कस्टम ड्युटी वाढवली आहे. त्यामुळे सोन्याचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. सोन्याच्या वाढत्या आयातीमुळे (Gold imports) चालू खात्यातील तूट रोखण्यासाठी सरकारने गुरुवारी (30 जून 22) सोन्यावरील कस्टम ड्युटी 10.75% वरून 15% पर्यंत वाढवली आहे. सुधारित कस्टम ड्युटी 30 जूनपासून लागू झाली आहे. मे महिन्यात सोन्याची आयात मोठ्या प्रमाणात वाढून तब्बल 107 टनांवर पोहोचली होती, तर जूनमधील आयात लक्षणीय आहे, असं सरकारी अधिसूचनेत म्हटलंय. यामुळे सामान्य नागरिकांना मात्र सोनं चढ्या किमतीला विकत घ्यावं लागणार आहे. केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 5 टक्क्यांनी वाढवलं, सोन्याच्या किमतीवर काय परिणाम होणार? “सोन्याच्या आयातीत अचानक वाढ झाली आहे. मे महिन्यात एकूण तब्बल 107 टन सोन्याची आयात झाली असून, जूनमध्येही ही आयात लक्षणीय आहे. सोन्याच्या आयातीतील वाढीमुळे चालू खात्यातील तुटीवर ताण पडत आहे. त्यामुळे सोन्याच्या आयातीवर अंकुश लावण्यासाठी कस्टम ड्युटी (customs duty) सध्याच्या 10.75% वरून 15% पर्यंत वाढवण्यात आली आहे,”असं केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या (Finance Ministry) निवेदनात म्हटलं आहे. दरम्यान, कस्टम ड्युटीत वाढ झाल्याने येत्या काळात सोन्याच्या प्रतितोळ्यासाठी ग्राहकांना 2 हजार रुपये जादा मोजावे लागू शकतात. या संदर्भात टाईम्स नाऊ न्यूजने वृत्त दिलंय. सोन्यावरची कस्टम ड्युटी 7.5 टक्के होती ती आता वाढवून 12.5 टक्के करण्यात आली आहे. यात अ‍ॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सेस (Agriculture Infrastructure Development Cess (AIDC)) 2.5 टक्के लागू केला तर एकूणात सोन्यावरची कस्टम ड्युटी 15 टक्के होईल. दरम्यान, आता सोन्यावर नवीन कस्टम ड्युटी लागू केल्यामुळे भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅम 2 हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे, असं उद्योगतज्ज्ञांनी सांगितलं. कस्टम ड्युटी वाढवल्यामुळे ग्राहकांसाठी सोनं प्रतितोळे 2 हजार रुपयांनी महाग होईल, असं ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे (All India Gem and Jewellery Domestic Council) अध्यक्ष आशिष पेठे यांनी इकॉनॉमिक टाइम्सला सांगितलं. अर्थ मंत्रालयाने कस्टम ड्युटीसंदर्भात केलेल्या घोषणेनंतर मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवरील (MCX) रिटेल सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. MCXवर सोन्याची किंमत 1,433 रुपयांनी वाढून 51,950 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली. LPG Price: सिलेंडरच्या दरात आजपासून मोठी कपात; नवीन दरानुसार किती स्वस्त मिळेल सिलेंडर? सोने आणि इंधनाची आयात भारताच्या एकूण आयातीत मोठा वाटा उचलते. त्यामुळे अचानक आयातीत झालेल्या वाढीमुळे देशाच्या आर्थिक स्थितीवर मोठा आर्थिक दबाव येतो. कोरोनाकाळात (Corona) सोन्याच्या मागणीत मोठी घट झाली होती. परंतु आता परिस्थिती पूर्ववत होत असताना सोन्याची मागणीही पुन्हा वाढू लागली आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या (World Gold Council) मते, 2021 मध्ये, भारतातील सोन्याची आयात (India’s gold imports) गेल्या 10 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती. भारतातील सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात आयातीद्वारे पूर्ण केली जाते. त्यामुळे सध्या रुपयातील घसरण चालू खात्यातील तूट परिस्थितीसंदर्भात सरकारसाठी समस्या निर्माण करतेय. वाढती महागाई (higher inflation) आणि व्यापारातील असमतोल (trade imbalances) यामुळे शुक्रवारी रुपयाने विक्रमी नीचांकी किंमत नोंदवली.
First published:

Tags: Gold and silver, Gold price

पुढील बातम्या