नवी दिल्ली, 15 मे : देशभरात 17 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. तरी देखील सोन्या चांदीच्या किंमतीमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. एमसीएक्स एक्सचेंजवर शुक्रवारी सोन्याचे जुन महिन्याचे वायदा भाव 0.3 टक्क्यांनी वाढून 46,800 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. गेल्या महिन्यात सोन्याने प्रति तोळा 47,327 रुपयांवर जाऊन रेकॉर्ड रचला होता. आजची किंमतही त्या रेकॉर्डच्या अगदी जवळपास जाऊन पोहोचली आहे. शुक्रवारी एससीएक्स एक्सचेंजवर चांदीच्या वायदा किंमतीतही वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. चांदीच्या वायदा किंमतीमध्ये 615 प्रति किलोने वाढ झाली. परिणामी चांदीची वायदा किंमत 44,750 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
(हे वाचा-मोठी बातमी! शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार करणार या कायद्यात बदल)
सोन्याच्या स्पॉट किंमतीतही वाढ झाली आहे. स्पॉट सोन्याची किंमत 0.1 टक्क्यांनी वाढून 1,730 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे.
कशी ओळखाल सोन्याची शुद्धता?
सोन्यावर हॉलमार्कचे चिन्ह आणि 999, 916 किंवा 875 असे अंक लिहीलेले असतात. याच अंकांवरून सोन्याची शुद्धता लक्षात येते. हॉलमार्कच्या चिन्हाबरोबर 999 हा अंक असेल तर सोनं 24 कॅरेट असते. 999 चा अर्थ असा आहे की यामधील सोन्याची शुद्धता 99.9 टक्के आहे. 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेट सोन्यावर 916, 21 कॅरेट सोन्यावर 875 तर 18 कॅरेट सोन्यावर 750 हे अंक असतात.
स्वस्त सोने खरेदीसाठी मोदी सरकारची विशेष योजना
सॉव्हरेन गोल्ड बाँड 20 एप्रिल ते 2 सप्टेंबरपर्यंत एकूण सहा टप्प्यांमध्ये जारी करण्यात येणार आहेत. 20 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान हे गोल्ड बाँड खरेदी करण्याचा पहिला टप्पा पार पडला. तर यातील दुसऱ्या टप्प्याचा आज शेवटचा दिवस आहे. हा टप्पा 11 मे ते 15 मेपर्यंत होता याकरता प्रति ग्रॅम सोन्याची किंमत 4,590 रुपये ठरवण्यात आली आहे. म्हणजे या योजनेतून तुम्हाला प्रति तोळा 45900 किंमतीने सोने मिळेल. त्याचप्रमाणे ऑनलाइन पेमेंट केल्यास प्रत्येक बाँडमधील प्रति ग्रॅम सोन्यावर 50 रुपयांची सूट देण्यात आली आहे. म्हणजे ऑनलाइन अर्ज करून सोने खरेदी केल्यास प्रति ग्रॅम 4,540 रुपयांनी सोने खरेदी करता येईल. मात्र या दुसऱ्या टप्प्यातही तुम्हाला गोल्ड बाँड खरेदी करता आले नसतील तर तिसरा टप्पा जुन महिन्यामध्ये असणार आहे.
संपादन - जान्हवी भाटकर